Wednesday, August 6, 2025

एकनाथ शिंदे यांनी घेतली नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, शिवसेना-मनसेच्या युतीवरुन दिली 'ही' प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांनी घेतली नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, शिवसेना-मनसेच्या युतीवरुन दिली 'ही' प्रतिक्रिया

नवी दिल्ली: नवी दिल्ली दौऱ्यावर असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद सांधताना शिवसेना-मनसेच्या युतीवरुन त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन  भेट घेतली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी मोदींना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले, तसेच मोदीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलांनी आधी 'ऑपरेशन सिंदूर' आणि आता 'ऑपरेशन महादेव' यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल त्यांना शिवशंकराची प्रतिमा देखील भेट केली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.


तसेच शिवसेना - भाजप युती ही एनडीए अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनची असून आता या युतीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना एनडीए उमेदवाराला पूर्णपणे समर्थन देईल असेही त्यांनी या भेटीत पंतप्रधानाना सांगितले.  त्यांनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय पटलावर घडणाऱ्या शिवसेना मनसेच्या युतीवरून ठाकरे बंधूंना टोलाही लगावला.



उबाठाला लगावला टोला


बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही चाललोय, मात्र काहीजण १० जनपथकडे गेले. बाळासाहेबांना कधीही आवडलं नाही त्या गोष्टी ते करत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला.  तसेच, शिवसेना-मनसेच्या युतीवरुन "जनता कामाच्या जोरावर मतदान करते, नावावर नाही" अशी बोचरी टीका ठाकरे बंधूंवर केली.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आघाडी आणि युती करण्याचा अधिकार आहे, मात्र काहीजण विश्वास गमावल्यामुळे दोन दगडावर पाय ठेवून काम करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी उबाठाला लगावला. लोक कामावर मते देतात. जे कामं करतात त्यांना लोक मते देतात. घरी बसणाऱ्यांना लोक घरी बसवतात, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना ते मूग गिळून बसले, कारण त्यांनी हिंदुत्व सोडले, अशी खरमरीत टीका त्यांनी उबाठावर केली. लष्कराच्या शौर्यावर शंका घेणे, भारताची आणि पंतप्रधानांची विदेशात बदनामी करणे, पाकिस्तानाची भाषा बोलणे हे देशप्रेम नाही तर पाकिस्तान प्रेम आहे, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.


 

 

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा