
वसई-विरार, अमरावती, रायगडमधील विविध पक्षांतील पदाधिकारीही भाजपामध्ये
धारशिव: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा,लोहारा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस समितीचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी शेकडो समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. वसई - विरार येथील उबाठा गट तसेच बविआच्या माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांबरोबरच रायगड, अमरावती जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार स्नेहा पंडीत - दुबे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माजी मंत्री व लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे १० माजी सदस्य, ११ माजी सभापती, सहा माजी नगराध्यक्ष, एक बाजार समिती सभापती, बाजार समितीचे १३ संचालक, पाच माजी उपनगराध्यक्ष, पाच माजी उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन संचालक तसेच १५ नगरसेवकांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला. अमरावतीतील अंजनगाव सुर्जीचे माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे यांचाही सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश झाला. दक्षिण रायगडच्या बापूसाहेब सोनगीरेंसह अनेकांनीही पक्षप्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली देश आणि राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वांवर विश्वास ठेवून आणि भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांनी प्रेरित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा मध्ये सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल आणि या परिसरातील कामे मार्गी लावण्यासाठी पक्ष तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
यावेळी बसवराज पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात भाजपाला १०० टक्के यश मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला.
उमरगा, लोहारा तालुक्यातून काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये जि. प. माजी अध्यक्ष राजेंद्र जगताप ,माजी सभापती किसनराव कांबळे, बाबुराव राठोड, तालुका काँग्रेस समिती अध्यक्ष सुभाष राजोळे, युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार , महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष संगिता कडगंचे, माजी सभापती पं.स. सचिन पाटील, माजी उपसभापती दगडू मोरे, दत्ता चिंचोळे , माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. विक्रम जिवनगे, न. पं. अध्यक्ष प्रेमलता टोपगे आदींचा समावेश आहे.
'उबाठा' चे नालासोपारा माजी जिल्हा प्रमुख पंकज देशमुख, माजी नगरसेवक व माजी उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, विभाग प्रमुख संतोष राणे, रवि राठोड, शाखा प्रमुख धनाजी पाटील, वसई येथील 'उबाठा' चे वसई शहर समन्वयक निलेश भानुशे, उप शहर प्रमुख प्रकाश देवळेकर आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.
अमरावती अंजनगाव सुर्जी च्या गौरव नेमाडे, निलेश आवंडकर,आकाश येऊल,उमेश दातीर यांसह अनेकांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला. दक्षिण रायगडमधील अनेक पक्षातील पदाधिका-यांनी ही भाजपात प्रवेश केला, त्यात राष्ट्रवादी विभागप्रमुख मुकुंद जांबरे न्हावे, गोरेगावचे शिवसेना शहरप्रमुख प्रदीप गोरेगावकर, म.न.से. विभागप्रमुख अमोल पवार, म.न.से.चे मंदार महामुंणकर, भिरा गावाचे काँग्रेसचे अनिकेत महामुंणकर, पन्हळघर शिवसेनेचे अनिल महाडिक आदींचा समावेश आहे .