
सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे
नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे समुद्रदेवतेस अर्पण, आणि गोड पदार्थांनी घरातील आनंद द्विगुणित करण्याचा दिवस. अशा वेळी आपल्या कोकणात बनणारा एक खास पदार्थ म्हणजे सात कप्पे घावन. नारळ, गूळ आणि वेलचीच्या संगमातून तयार होणारे हे घावन, सात थरांत घडी घालून बनवले जाते जणू गोडीच्या सात कुंडल्या! प्रत्येक थर गोडसर आठवणींसारखा जपून ठेवावा असा.
साहित्य : तांदळाचे पीठ : २ वाटी
गूळ : दीड वाटी
किसलेला ओला नारळ : २ वाटी
वेलची पूड : अर्धा टीस्पून
सुकामेवा भरड, पाणी : आवश्यकतेनुसार
तूप किंवा तेल : भाजण्यासाठी
कृती :
१. घावनसाठी पीठ तयार करणे: तांदळाचे पीठ पाणी घालून डोशाच्या पिठासारखे भिजवून ठेवा. हे पीठ एकसंध आणि थोडे सैलसर असावे.
२. गोड सारण (पुरण) तयार करणे :
एका कढईत गूळ, किसलेला नारळ, सुक्या मेव्याची भरड आणि वेलची पूड घालून मध्यम आचेवर गरम करा. सतत हलवत राहा, जेणेकरून गूळ सगळ्या नारळात मुरेल. मिश्रण कोरडे होईपर्यंत परतून घ्या. पुरण तयार आहे.
३. घावन तयार करणे :
गरम तव्यावर थोडे तेल/तूप घालून पसरवा.
त्यावर एक पातळ घावन पिठाचे थर पसरवा (डोशासारखे), झाकण ठेवून एक बाजू भाजा. भाजले की, त्यावर २ चमचे गोड सारण ठेवा आणि अर्धचंद्राकार घडी घाला.
४. सात कप्प्यांची प्रक्रिया :
अर्ध्या भागावर पुन्हा थोडे पीठ पसरवा, आणि त्यावर सारण ठेवा. हे नवीन थर, आधीच्या घावनावर पलटवा. पुन्हा रिकाम्या बाजूवर पीठ पसरवा, त्यावर सारण ठेवा. हेच सात वेळा करा. प्रत्येक वेळेस अर्ध्या भागावर पीठ व सारण घालून पलटवणे.
प्रत्येक थरावर थोडे तूप बाजूंनी सोडत राहा, जेणेकरून सगळे थर छान खरपूस होतील.
टीप : तवा नॉनस्टिक असेल तर उत्तम, आणि मध्यम आचेवर भाजल्यास कुरकुरीत घावन मिळेल.
सात वेळा ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर “सात कप्पे घावन” तयार!
कसे वाढाल : गरम गरम घावन नारळाच्या चटणीसोबत किंवा तसंच खाल्लं तरी अप्रतिम लागते.