Tuesday, August 5, 2025

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि ऑपरेशन महादेवच्या (Operation Mahadev) यशानंतर पीएम मोदी यांचे सर्वांनी अभिनंदन करत सत्कार केला. यावेळी 'भारत माता की जय', 'हर हर महादेव'चा जयघोष आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये पीएम मोदींचे स्वागत करण्यात आले. सोशल मिडियावर याचा व्हिडीओ समोर आला आहे.



“हर हर महादेव” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांचा जयघोष


जून २०२४ मध्ये मोदी सरकारच्यास्थापनेनंतर संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीच्या खासदारांची ही दुसरी बैठक ठरली. बैठकीची सुरुवात “हर हर महादेव” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांनी जल्लोषात झाली. भाजपसह मित्र पक्षांचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करताना उत्साहात सहभागी झाले. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’च्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल पीएम मोदींच्या नेतृत्त्वाचं विशेष कौतुक करण्यात आलं. वातावरणात आनंद, अभिमान आणि उत्सवाचे रंग मिसळले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीएम मोदींच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान केला, तर पीएम मोदींनी सर्वांचे मन:पूर्वक आभार मानत नम्रतेने स्वीकार केला.



भारताचं 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'ऑपरेशन महादेव'द्वारे यशस्वी


२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या क्रूर हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. या दहशतवादी कृत्याचा भारताने शांतपणे नव्हे, तर जशास तसं उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. या मोहिमेद्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अनेक हवाई तळ लक्ष्य करत त्यांचं संपूर्णपणे खात्मा केला. भारताच्या अत्याधुनिक लष्करी क्षमतेसमोर पाकिस्तानला नतमस्तक व्हावं लागलं. यानंतरही भारत थांबला नाही, ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत देशांतर्गत आणि सीमेलगत लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर अचूक कारवाई करत त्यांचा खात्मा केला.





पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेली NDAची ही बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली. अधिवेशनात विरोधकांनी सरकारला अनेक मुद्द्यांवरून चांगलेच घेरले आहे. निवडणूक आयोगाचे कथित पक्षपाती वर्तन, पहलगाम येथील दहशतवादी हल्ला, तसेच त्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ यावरून विरोधक सरकारवर तीव्र टीका करत आहेत. या सर्व मुद्यांवर संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधक वारंवार गोंधळ घालत असून, त्यामुळे कामकाज वारंवार ठप्प होत आहे. सरकारकडून मुद्द्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात असतानाही, सभागृहात गोंधळाचे वातावरण कायम आहे.

Comments
Add Comment