Tuesday, August 5, 2025

कोल्हापूरकरांनो तयार राहा! महादेवी हत्तीणींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आनंदवार्ता कुठल्याही क्षणी!

कोल्हापूरकरांनो तयार राहा! महादेवी हत्तीणींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आनंदवार्ता कुठल्याही क्षणी!

मुंबई : कोल्हापूरच्या जनतेसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महादेवी हत्तीणीच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून लवकरच कोल्हापुरकरांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. गेल्या १५ दिवसांपासून महादेवी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये परत आणण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. हत्तीणीच्या प्रेमात अख्खं कोल्हापूर पेटून उठलं आहे. कोल्हापूरकरांनी केवळ आंदोलनच नव्हे, तर जिओच्या पेट्रोल-डिझेल पंपांपासून ते टेलिकॉम सेवांपर्यंत बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या निर्णयावर आता कोल्हापूरच्या भावनांचा आदर केला गेला का? महादेवीला परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला का? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.



महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची थेट मध्यस्थी


महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर आज मुंबईच्या मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, "हत्तीण वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारचा नव्हता, तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा भाग होता." मात्र, कोल्हापूरकरांची भावना आणि आंदोलन लक्षात घेता, आता राज्य सरकार स्वतः पुढाकार घेऊन हत्तीणीला परत आणण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे महादेवी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेचा लढा आणि एकजूट आता यशाच्या मार्गावर असल्याचं संकेत या बैठकीतून मिळाला आहे. या बैठकीला अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर उपस्थित होते. प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने, नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.



सरकार सुप्रीम कोर्टात उतरणार


"माधुरी हत्तीण गेली ३४ वर्षे नांदणी मठात आहे. ती पुन्हा इथे परत यावी, ही आपली सामूहिक इच्छा आहे," अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, मठालाही स्वतंत्र याचिका दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय, हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार एक विशेष डॉक्टरांसह टीम स्थापन करणार असून, तिच्या आहार, निवास व आरोग्य व्यवस्था यासाठी आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. "राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि माधुरी हत्तीण परत यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका मांडणार आहे," अशी ग्वाहीही त्यांनी बैठकीत दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >