
मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. रोमहर्षक ६ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.
गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर
ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या चौथ्या कसोटीनंतर भारत चौथ्या स्थानावर होता. पण ओव्हल कसोटीतील विजयामुळे त्यांनी थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान, भारताकडून पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.
गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२५-२७ च्या सायकलमध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकले, २ गमावले आणि १ सामना अनिर्णित राहिला.
भारताची गुण टक्केवारी ४६.६७% आहे.
WTC च्या नियमांनुसार, प्रत्येक विजयासाठी १२ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण, टाय (tie) झालेल्या सामन्यासाठी ६ गुण, तर पराभवासाठी ० गुण मिळतात. भारताच्या विजयामुळे त्यांच्या गुणसंख्येत मोठी वाढ झाली आहे.