Tuesday, August 5, 2025

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते.  दिल्लीतील आरएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते,  अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७९ वर्षांचे होते.


सत्यपाल मलिक यांनी गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.



सत्यपाल मालीक यांचा राजकीय प्रवास


सत्यपाल मलिक यांचा प्रवास सपामधून सुरु झाला होता, ते काही काळ भाजपमध्येही कार्यरत होते. मात्र, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्याने त्यांच्याकडे देशभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. सत्यपाल मलिक हे ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू काश्मीर राज्याचे शेवटचे राज्यपाल होते. त्यांच्या कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आले आणि जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि त्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. योगायोगाने, आज या निर्णयाचा सहावा वर्धापन दिन आहे आणि याच दिवशी सत्यपाल मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ऑक्टोबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत बिहारचे राज्यपाल होते. २१ मार्च २०१८ ते २८ मे २०१८ पर्यंत त्यांना ओडिशाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला. जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर, सत्यपाल मलिक यांची गोव्याचे १८ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ऑक्टोबर २०२२ पर्यंत मेघालयाचे २१ वे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले.



 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा