ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद
मुंबई : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. ‘डीजी ॲप’वर नोंदणी असणाऱ्या अभ्यागतांनाच आता मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
कामानिमित्त राज्यभरातील लोक मंत्रालयात धाव घेतात. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अभ्यागतांसह वकील, राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना गार्डन गेटजवळील खिडकीवर ऑफलाइन पास काढणे बंधनकारक आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी गार्डन गेट जवळ ऑफलाइन पाससाठी ९ खिडक्या, तर नवीन प्रशासकीय इमारतीत १ खिडकी अशा एकूण १० खिडक्यांवर ऑफलाइन पास उपलब्ध होतो. मात्र मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने १५ ऑगस्टपासून खिडक्यांवर ऑफलाइन पास देणे बंद करण्यात येणार आहे.
मंत्रालयात येणाऱ्या व्हीव्हीआयपींची सुरक्षा व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्च २०२५ मध्ये फेस डिटेक्शन व ‘डीजी ॲप’ प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे आता ऑफलाइन पास पद्धत बंद करण्यात येणार असून अभ्यागतांना आता ‘डीजी ॲप’ वरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे, असे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले. कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणाली अमलात आणली. या दोन्ही प्रणालीमुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे निकम यांनी सांगितले.
असा डाऊनलोड करा ‘डीजी ॲप’ : डीजी प्रवेश ॲॅप हे मोबाइल ॲॅप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲॅप या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाइलच्या प्रणालीनुसार अँड्राईडमध्ये प्ले स्टोअरवर, तर आयओएस ॲॅपल स्टोअरवर डीजी प्रवेश (digi pravesh) हे सर्च केल्यास हे ॲॅप विनामूल्य डाऊनलोड करता येते. या ॲॅपवर सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश मिळतो.