
दत्तात्रय भरणेंनी हाती घेतला कृषीमंत्री पदाचा पदभार
मुंबई: शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कृषिमंत्री भरणे यांनी आजपासून मंत्रालयातून कामकाजास सुरवात केली, त्यावेळी ते बोलत होते.
विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना रमी खेळत असलेल्या व्हिडीओमुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करत दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. आज दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. आज मी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, त्यामुळे मला हे खातं मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मी घेणार आहे, असंही पुढे भरणेंनी म्हटलं आहे.
"मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा"
कृषिमंत्री भरणे म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा विकासासाठी निर्णय घेण्यात येतील. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.