
मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
मागील तीन लेखांमध्ये आपण त्राटकाविषयी जाणून घेतलं. त्राटक ही एक शुद्धिक्रिया आहेच पण त्याचबरोबर प्रत्याहार ही अष्टांग योगातील पायरी साधण्याचं ते एक साधनही आहे. लेख क्रमांक २८ मध्ये म्हटल्याप्रमाणे पतंजलींच्या योगातील आठ पायऱ्यांपैकी प्रत्याहार म्हणजे बहिरंगयोग आणि अंतरंगयोगाला जोडणारा सेतू आहे. प्रत्याहारानं पंचज्ञानेंद्रियं, पंचकर्मेंद्रियं यांच्यावर नियंत्रण आणता येतं. इंद्रियांमागे धावणाऱ्या मनाला इंद्रियांपासून जाणीवपूर्वक वेगळं करता येतं. बहिर्मुख असलेल्या मनाला अंतर्मुख करण्याची सुरुवात प्रत्याहार या पायरीने होते. प्रत्याहाराविषयी आणि प्रत्याहार साधण्याच्या साधनांविषयी सविस्तर जाणून घेतल्यावर आता अंतरंगयोगाच्या प्रदेशात आपण प्रवेश करणार आहोत.
प्रत्याहारानंतर धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंगं अथवा पायऱ्या अंतरंगयोगात मोडतात. यांपैकी धारणा या पायरीविषयी प्रस्तुत लेखात जाणून घेऊ.
धारणेच्या व्याख्या व स्वरूप :
पतंजलींनी धारणा या अंतरंगयोगातील अंगाची व्याख्या ‘देशबंधश्चित्तस्य धारणा’ अशी दिली आहे. याचा अर्थ ‘चित्ताला कोणत्यातरी एका स्थानावर बांधून ठेवल्याप्रमाणे स्थिर करणे म्हणजे धारणा होय.’ प्रत्याहाराच्या योगे मनाला इंद्रियांच्या मागे धावण्यापासून थांबवलं जातं आणि अंतर्मुख केलं जातं. अशा अंतर्मुख केलेल्या चित्तातील सर्व विचारप्रवाह एका जागी स्थिर करणं म्हणजे धारणा.
जागृत अवस्थेमध्ये विविध क्रिया शरीरानं करत असताना आपलं चित्त त्या त्या ज्ञानेन्द्रिय आणि कर्मेंद्रियांबरोबर सर्वत्र संचार करत असतं. जसे डोळे पाहत असताना मन डोळ्यांसहित असतं त्यामुळेच आपण डोळ्यांसमोरील वस्तू पाहू शकतो. हेच ऐकणं, स्पर्शानं एखादी गोष्ट जाणणं इत्यादी बाबतीतही दिसून येतं. तसेच मनाचं साहाय्य असल्याशिवाय आपण शारीरिक क्रियाही करू शकत नाही हा प्रत्येकाचा अनुभव आहे. थोडक्यात सांगायचं तर जागृत अवस्थेत पाच ज्ञानेन्द्रियं आणि कर्मेंद्रियं यांच्यासह मन सदैव संचार करत असतं. अशा सतत संचार करणाऱ्या चित्ताला जाणीवपूर्वक, प्रयत्नांनी शरीरातील एखाद्या भागावर अथवा आपल्याला इष्ट असणाऱ्या एखाद्या विषयावर केंद्रित करणं जणू बांधून ठेवणं म्हणजे धारणा.
महाभारतात द्रौपदी स्वयंवराच्या प्रसंगी अर्जुनानं माशाचं पाण्यातील प्रतिबिंब बघून बाणानं फिरत्या माशाच्या डोळ्याचा वेध घेतल्याची कथा आपल्याला माहीतच आहे. ही एक प्रकारची धारणाच होय. मात्र ही धारणा बाह्य विषयावर केली आहे म्हणजेच बहिर्मुख आहे.
अशीच धारणा जेव्हा सर्व इंद्रियं आवरून अंतर्मुख होऊन केली जाते केली जाते तेव्हा तिला पातंजलयोगानुसार धारणा म्हटले आहे. एकूण धारणा म्हणजे चहूबाजूला विखुरलेल्या विचारांनी युक्त असे मन, विचारांना एकाच विषयाकडे प्रवाहित करून बांधून ठेवणं.
अशारीतीने मनाला इष्ट विषयावर प्रयत्नपूर्वक केंद्रित करताना ठरवलेल्या इष्ट ध्येयवस्तूविषयी अनेक विचार सतत मनात डोकावतात. त्यांना रोखायचा प्रयत्न केला तर ते अधिक जोरानं परत परत येत राहतात. पण म्हणून त्यांना प्रतिबंध करू नये. त्यांच्याकडे लक्ष देता देताच मूळ धारणेच्या विषयाचं भान ठेवावं आणि मूळ विषयावरची धारणा चालू ठेवावी. सरावानं आणि सातत्यानं हे इतर विचार येणं आपोआपच थांबतं.
काही विद्वानांच्या मते धारणेचा विषय ओंकार, एखादी मूर्ती, वस्तू, फूल, चिन्ह इत्यादी कोणताही असू शकते. तर काही विद्वानांच्या मते आपल्या शरीरातीलच एखाद्या भागावर जसे हृदय किंवा भुवयांचा मध्यबिंदू यावर चित्त स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. प्राचीन काळातील टीकाकारांनी आपल्या इष्टदेवतेवर धारणा करावी असं म्हटलं आहे.
ध्येयवस्तू कोणतीही असो त्यावर चित्त स्थिर रहाणं हा धारणेचा मुख्य उद्देश आहे. धारणेचा सतत अभ्यास केल्यानं अशी स्थिती येते की धारणा सिद्ध झालेला मनुष्य जगातील सर्व नित्यनैमित्तिक व्यवहार करत असला तरी त्याचं चित्त मात्र ध्येयवस्तूवर नित्य स्थिर झालेलं असतं.
धारणेचे लाभ :
१. धारणेमुळे चित्ताची एकाग्रता पुष्कळ वाढते. याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे कोणत्याही विषयाचं आकलन, मग तो विषय अगदी सूक्ष्म असला तरीही
सहज होते.
२. मन अधिकाधिक स्थिर होतं त्यामुळे मनःशांतीचा अनुभव येऊ लागतो. धारणेच्या सरावाने चित्त जास्त वेळ एकाच विषयावर केंद्रित करणंही
शक्य होतं.
३. योगसाधकांच्या दृष्टीनं धारणेमध्ये स्थिर होणं ही ध्यानाची पूर्वावस्था असते. धारणेमध्ये दीर्घकाळ स्थिर झाल्यावर खरं तर ध्यान आपोआप लागते.