
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे गृहमंत्रीपद भूषविण्यच्या विक्रमाची शाह यांच्या नावे नोंद झाली आहे. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा सर्वाधिक काळ गृहमंत्री म्हणून विक्रम मोडला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाहांचे कौतुक केले आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ३० मे २०१९ रोजी शहा यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. शहा यांनी गृहमंत्री म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ९ जून २०२४ रोजी पूर्ण केला. १० जून २०२४ रोजी ते पुन्हा गृहमंत्री झाले आणि तेव्हापासून ते या पदावर आहेत. माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत एकूण २ हजार २५६ दिवस गृहमंत्रीपद भुषवले. अडवाणींनंतर काँग्रेस नेते गोविंद वल्लभ पंत हे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिलेले तिसरे आहेत.सरदार वल्लभभाई पटेल हे १ हजार २१८ दिवस देशाचे गृहमंत्री राहिले. योगायोगाने, शहा यांनी ५ ऑगस्ट रोजी सर्वात जास्त काळ गृहमंत्री राहण्याचा पराक्रम केला. गृहमंत्रालया व्यतिरिक्त अमित शाह देशाचे पहिले सहकार मंत्री देखील आहेत. यापूर्वी शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुजरातचे गृहमंत्री राहिले आहेत. अमित शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले.
शाह यांनी २०१९ मध्ये याच दिवशी त्यांनी संसदेत जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला,ज्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला. त्याच वेळी, समान नागरी संहिता देखील लागू करण्यात आली. शिवाय, त्यांनी तिहेरी तलाकबाबत मोठा निर्णय घेतला आणि तो बेकायदेशीर घोषित केला. यासोबतच त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली.एनडीए खासदारांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, अमित शाहा आता सर्वाधिक काळ देशाचे गृहमंत्रीपद भुषवणारे गृहमंत्री बनले आहेत. ५ ऑगस्ट हा एक ऐतिहासिक दिवस आहे, याच दिवशी जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले. एनडीए सरकारने खऱ्या अर्थाने संविधानाचे पालन केले आहे, असेही ते म्हणाले.