
वैशाली गायकवाड
आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मूलभूत आधार आहे आणि हे आरोग्य नैसर्गिक पद्धतीने जपण्याचे व त्याचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींमध्ये डॉ. मेधा मेहेंदळे यांचे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते. त्या एक आयुर्वेद संशोधक, निसर्गोपचारतज्ज्ञ आणि तन्वी हर्बल्सच्या संस्थापिका आहेत. आयुर्वेद, वनौषधी संशोधन, समाजसेवा, उद्योजकता, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आजच्या या लेखामधून आपण मेधाताईंचा आपल्या सगळ्यांसाठी प्रेरक असणारा प्रवास जाणून घेणार आहोत.
उपजतच संशोधनात्मक वृत्ती लाभलेल्या मेधाताईंचा जन्म देसाई घराण्यात झाला. मेधाताईंचे वडील डॉ. सी. ग. देसाई हे उत्कृष्ट प्रोफेसर, संस्कृत पंडित, अध्यात्मिक लेखक आणि जगन्मित्र होते. शाळेत असल्यापासूनच विविध स्पर्धा, उपक्रम यामधून मेधाताईंच्या धाडस आणि नेतृत्वगुणांची चूणूक दिसत होती. त्यांच्या वडिलांकडे संस्कृत शिकण्यासाठी आयुर्वेदाचे विद्यार्थी येत त्यामुळे घरातूनच संस्कृत आणि आयुर्वेद विषयातील शब्द सतत कानावर पडत असल्याने त्यानी त्यांच्या जिज्ञासु वृत्तीने वनौषधी सत्त्वावर गहन संशोधन करून ‘हर्बल तन्वी पॅथी’ची निर्मिती केली. ही एक अद्वितीय उपचारपद्धती आहे, ज्यामध्ये वनस्पतींपासून सत्वरूपात मिळवलेले घटक चुटकीभर प्रमाणात घेऊन तयार केलेल्या टॅबलेट्सचा समावेश होतो. पारंपरिक वनौषधी पावडरच्या तुलनेत या टॅबलेट्स अधिक सघन (काँसंट्रेटेड) आणि परिणामकारक असून, त्यांचा परिणाम जलद व स्थिर असतो. त्यामुळे घराघरात या हर्बल तन्वी टॅबलेट्समुळे नैसर्गिक पद्धतीने आरोग्य उत्तम राहू लागले.
अनेक जटिल आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांवर प्रभावी उपाय मिळाले आहेत. डायबिटीस, बीपी, सांधेदुखी, गुडघेदुखी, वंध्यत्व (इन्फर्टिलिटी), पार्किन्सन्स, सोरायसिस, अस्थमा, केस व त्वचारोग, मुलांची उंची वाढवणे, अशा असंख्य तक्रारींवर तन्वी हर्बल्सचे उपचार लाभदायक ठरले आहेत. ही औषधे केवळ परिणामकारकच नाहीत, तर रासायनिक घटकांपासून मुक्त असल्यामुळे कोणत्याही दुष्परिणामाविना नैसर्गिक स्वास्थ्य टिकवतात. भारताबाहेर दुबई, मलेशिया, सिंगापूर, बहारीन, कॅनडा, अमेरिका, थायलंड इत्यादी देशातही प्रदर्शनात भाग घेऊन त्यानी तन्वी हर्बलचा प्रचार प्रसार जगभर केला आहे.
मेधाताईंच्या यजमानांचे वडील लहानपणीच गेल्याने त्यांच्या आईनेच नोकरी करून त्यांना वाढवले. त्यामुळे मेधाताईंनी दोन्ही मुलींवर लक्ष केंद्रीत करावे या भावनेतून त्यांनी मेधाताईंना व्यवसाय करण्यास काही काळ मनाई केली होती. मेधाताईंनी जिद्दीने स्वतःबरोबर मुलींनाही घडवले. त्यामुळे कालांतराने विरोधाचे रूपांतर सकारात्मक सहकार्यात परिवर्तित झाले. मेधाताईंच्या यजमानांनी देखील सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर तन्वी हर्बल्सला सहकार्य केले आहे.
डॉ. मेधाताई मेहेंदळे यांचं कार्य केवळ व्यवसायापुरतं मर्यादित न राहता सेवाभावी वृत्तीने ते ओतप्रोत भरलेले आहे. गेली ३० वर्षे तन्वी हर्बल क्लिनिक्समार्फत रुग्णांना मोफत तपासणीची सुविधा दिली जाते. त्याचबरोबर पंचकर्म व निसर्गोपचार उपचारांचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व केंद्रे अत्याधुनिक असून, महाराष्ट्रभर व ऑनलाईन स्वरूपात सेवा दिली जाते. औषधे क्लिनिक्समध्ये, केमिस्ट दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन व तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीच्या माध्यमातूनही उपलब्ध आहेत.
वैद्यकशास्त्रासोबतच त्यांनी एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही स्वतःचा ठसा उमटवला आहे. अनेक नवनवीन उद्योजकांना मार्गदर्शन विपुल लेखन, अनेक सांस्कृतिक संस्थांना स्पॉन्सरशिप देऊन त्यांना पाठबळ देणं, विविधांगी स्पर्धा उपक्रम राबविणे, जाहिरात व ब्रॅण्डिंग क्षेत्रातील त्यांचा उत्कृष्ट अनुभव व प्रयोग नवउद्योजकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. त्यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनी पुरस्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे माधुरी दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला महिला उद्योजिका पुरस्कार, उद्योगश्री हे विविध पुरस्कार त्यांच्या कामगिरीची पावतीच आहेत.
डॉ. मेहेंदळे यांच्या कार्याची साखळी त्यांच्याच कुटुंबातील पुढील पिढीनेही समर्थपणे चालवली आहे. त्यांच्या दोन्ही कन्या डॉ. मानसी व डॉ. रुचा, तसेच जावई डॉ. पुष्कराज धामणकर आणि प्रतीक पै तन्वी हर्बल्सची जबाबदारी आत्मीयतेने पार पाडत आहेत. डॉ. मानसी आणि डॉ. रुचा यांच्या क्लिनिक्समध्ये रुग्णांना मोफत तपासणी दिली जाते. याशिवाय आवश्यकतेप्रमाणे पंचकर्म उपचारही केले जातात. या डॉक्टर कन्या सोशल मीडियावर (इन्स्टाग्रामवर) रोज हेल्थ टिप्स शेअर करून सामान्य जनतेमध्ये आयुर्वेदाचा प्रसार करतात.
डॉ. मेहेंदळे या आनंद विश्व गुरुकुल या शाळेच्या संस्थापिका आणि माजी अध्यक्षा आहेत. त्यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी ‘डॉटर’ हा हिंदी चित्रपट, ‘गोजिरी’ व झूम झ्याम झॉम्बी हे मराठी चित्रपट आणि ‘आयुष्यमान भव’ ही टेलिफिल्म निर्मित करून समाजाला सशक्त संदेश दिला आहे. या सर्व कलाकृतींना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दर्शन घडवणारा ‘तन्वीचे आभाळ’ हा चरित्रग्रंथ प्रा. डॉ. शुभा चिटणीस यांनी लिहिला असून, तो वाचकप्रिय ठरला आहे. यात डॉ. मेहेंदळे यांच्या जीवनातील संघर्ष, संशोधन, आत्मीयता आणि ध्येयवेडे प्रयत्न यांचे दर्शन होते.
डॉ. मेहेंदळे आणि तन्वी संचालकांनी भारतासह परदेशातही मोफत व्याख्यानांद्वारे आयुर्वेद आणि निसर्गोपचाराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आयुर्वेद हा केवळ औषधोपचार नव्हे तर जीवनशैली असल्याचे त्या आवर्जून सांगतात. आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार हेच उद्दिष्ट समोर ठेवून त्यांची ४० ते ५० क्लिनिक्स व फ्री चेकअप कॅम्प रुग्णांसाठी सेवा पुरवत आहेत.
सुरुवातीला ‘वन वुमन शो’ असणाऱ्या तन्वी हर्बल्सच्या या रोपाचे रूपांतर वटवृक्षात करण्यासाठी आता संपूर्ण कुटुंबच तन्वीमय झाले आहे. भविष्यात महिलांनी देखील अधिकाधिक व्यवसायात येऊन स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मोलाचा सल्ला त्या समस्त महिलांना देतात.
डॉ. मेधाताई मेहेंदळे या आजच्या काळात आयुर्वेदाची पताका उंचावणाऱ्या, लोकांच्या आरोग्याची जबाबदारी मनापासून निभावणाऱ्या एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी विज्ञान, संशोधन, समाजसेवा, उद्योजकता आणि संस्कृती या साऱ्यांचा सुरेख संगम घडवून एक नवा पथदर्शी आदर्श घालून दिला आहे. या आठवड्यात येणाऱ्या रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून आयुर्वेदिक व नॅचरोपॅथी याचा अवलंब करून आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक पाऊल पुढे असणाऱ्या तन्वी हर्बल्सच्या या कुटुंबाप्रमाणेच आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध होऊ या! त्यांच्या कार्याचा प्रकाश आयुर्वेदाच्या आकाशात सदैव तेजस्वी राहो, हीच शुभेच्छा!