
मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षारक्षकच महिलांच्या जीवावर उठले आहेत . मुंबई लोकल मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
मुंबईतील लोकल ट्रेनच्या महिला डब्यात पोलिस कॉन्स्टेबलला मद्यधुंद अवस्थेत एका महिला प्रवाशाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बोरिवली-वसई स्लो लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे . आरोपी कॉन्स्टेबलचे नाव अमोल किशोर सपकाळे असे आहे, जो मीरा भाईंदर आणि वसई-विरार पोलिस आयुक्तालयात तैनात आहे.
दरम्यान कॉन्स्टेबल सपकाळे मीरा रोड स्टेशनवर महिला डब्यात चढला . प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे नाटक करत त्याने काही महिला प्रवाशांना मागून जाणूनबुजून त्यांना स्पर्श केला. हे महिलांच्या लक्षात आल्या नंतर एका महिलेने चोरून त्या पोलीस कॉन्स्टेबल चा व्हिडिओ काढला .
सदर आरोपी महिला प्रवाशांकडे घाणेरड्या नजरेने पाहत होता, त्यांना अस्वस्थ करत होता, असा आरोप उपस्थित महिलांनी केला . त्याचे हे वर्तन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही महिलांचे मोबाईल फोनही हिसकावून त्याने घेतले. अखेर काही महिलांनी त्याला नायगाव स्टेशन वर डब्यातून खाली उतरवले आणि स्टेशन मास्टरकडे तक्रार दाखल केली.
माहिती मिळताच वसई रोड रेल्वे पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सपकाळे याला ताब्यात घेतले. एका प्रवाशाने केलेल्या तक्रारीवरून त्यांनी महिलांच्या विनयभंगाचा आणि त्यांना धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
एका कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्याच्या धक्कादायक वर्तनामुळे प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे आणि ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.