Sunday, August 24, 2025

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट वे ऑफ इंडियाला मेट्रोने पोहोचण्याचे मुंबईकरांचे, पर्यटकांचे स्वप्न येत्या काही वर्षांत पूर्ण होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान भुयारी मेट्रो-११ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे.

राज्य सरकारची परवानगी मिळताच या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी घेऊन भुयारी मेट्रो ११ च्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. ही भुयारी मेट्रो १७.५१ किमी लांबीची असणार असून या मेट्रो मार्गिकेमुळे शीव, वडाळा, शिवडी, भायखळा, भेंडी बाजारसारखे परिसर जोडले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

एमएमआरसीच्या प्रस्तावानुसार, या १७. ५१ किमी लांबीच्या मार्गिकेवर एकूण १४ मेट्रो स्थानकांचा समावेश असणार आहे. १४ पैकी १३ मेट्रो स्थानके भुयारी असणार असून एक स्थानक जमिनीवर असणार आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास यावरून सहा डब्यांच्या मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावेल.

तर या मार्गिकेवरून २०३१ मध्ये दिवसाला पाच लाख ८० हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज एमएमआरसीने व्यक्त केला. ही मेट्रो भविष्यामध्ये ठाण्यातील मेट्रोला जोडली जाणार आहे. गायमुख ते वडाळा मार्गावर ठाणे मेट्रो धावणार असून ही मेट्रो ठाण्यातील कापूरबावडी जंक्शनवरुन पुढे कल्याण आणि भिवंडीचीही कनेक्टीव्हीटी देणार आहे. या मेट्रोचचे जाळे अगदी कल्याण-डोंबिवलीपर्यंत सुखकर प्रवासाची हमी देणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment