
पुरषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज, बाळकृष्ण कांबळे महाराज, सुवेल शेट्टे महाराज, मयुर गुरव महाराज, साई पाटील महाराज, अनिकेत वरके महाराज, सुषमा खरात महाराज, दिपा फडणवीस महाराज, अरविंद शिरळाकर महाराज, दादा महाराज, अजय घराडे महाराज यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असे ते म्हणाले. महाराष्ट्र हा साधुसंताचा आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन साधुंची हत्या देशाने पाहिली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, हिंदुत्वाचा पुढे घेऊन जाण्याचे काम आधात्मातून सर्व साधु संन्यासीजन करत आहेत. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे वरचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी हा बाळासाहेबांचा विचार होता, मात्र आता काहीजणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. साधुसंतांचे आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया, शिवसेना संतांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.