Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या १६ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार आहे. त्यानंतर कोल्हापुरात सीपीआर समोरील इमारतीमध्ये १८ ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.

पक्षकार, वकिलांपासून ते सर्वसामान्य ते राजकीय नेत्यांनी गेल्या ४२ वर्षांपासून दिलेल्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचची घोषणा करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी गेल्या साडेचार दशकांपासून लढा सुरू आहे. खंडपीठाची पहिली पायरी सर्किट बेंचच्या माध्यमातून झाली आहे.

त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्यांच्या मुंबईमधील चकरा पूर्णतः थांबणार आहेत. दरम्यान, सर्किट बेंचसाठी पहिल्या टप्प्यांमध्ये चार ते पाच न्यायमूर्तींची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चार न्यायमूर्तींचे कामकाज चालण्याची व्यवस्था सीपीआरसमोर कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे.

याशिवाय प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन प्रमुख आणि किमान ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल अशी शक्यता बार असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या कोल्हापूर शहरात शेंडा पार्कमध्ये खंडपीठासाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. खंडपीठासह निवासस्थाने सुद्धा यामध्ये प्रस्तावित आहेत. त्यामुळे जागा अंतिम झाल्यानंतर पुढील चार ते पाच वर्षात खंडपीठाची स्वत:ची वास्तू असणार आहे.

Comments
Add Comment