Sunday, August 3, 2025

अर्थव्यवस्थेसाठी ‘हम दो हमारा एक’च पाहिजे!

अर्थव्यवस्थेसाठी ‘हम दो हमारा एक’च पाहिजे!

मोहित सोमण


रघुनाथ धोंडों कर्वे! देशातील लोकांनी विसरलेल्या नावापैकी आणखी एक नाव... त्यांच योगदान सुवर्ण अक्षरात लिहिण्याजोगे... भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ कर्वे हे भारतातील १९ व्या शतकातील पुढारलेले नाव. एक कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा घरातूनच चालून आला होता. त्याच सुमारास गोपाळ गणेश आगरकर, तत्पूर्वी विष्णूशास्त्री चिपळूणकर, नामदार गोपाळकृष्ण गोखले तसेच लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, न्यायमूर्ती रानडे अशा कित्येक नामावलीतील आणखी एक पुढारलेल्या पुरोगामी कोकणस्थ ब्राह्मणांपैकी एक नाव म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. आज इतिहास त्यांना विसरू शकेल पण त्यांचे काम पुढील २००० वर्षे अभ्यासातून शिकवले जाईल. वयाच्या १८ व्या वर्षी लोकसंख्याशास्त्राचा साक्षात्कार त्यांना झाल्याने त्यांना लोकसंख्या नियंत्रणासाठी जनआंदोलन उभारले केवळ इतकेच नाही, तर स्त्रियांचे अधिकार, स्त्रियांचे लैंगिक इच्छेचे स्वातंत्र्य, अर्भक मृत्यू प्रतिबंधक उपाययोजना, विचार स्वातंत्र्य, लोकसंख्याशास्त्रातून अर्थशास्त्र अशा अनेक विषयांचा साक्षात्कार झाल्याने त्यांनी जाहीरपणे त्या मागासलेल्या काळात भाषणे सुरू केली. त्यातून त्यांची महाविद्यालयातून हकालपट्टी करण्यात आली. तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. १९२१ साली त्यांनी मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी जाहीर जनजागृती सुरू केली. त्याच सुमारास योगायोगाने भारतात पहिल्यांदाच जनसंख्या घटली होती अर्थात ती प्लेग, इतर आजारपणे, टायफाईड, टीबी, दुष्काळ, आर्थिक मंदीतून उपासमार अशा विविध कारणांमुळे झाली. भारतात १९२१-१९३२ सालीच्या प्रथमच अपवादात्मक परिस्थितीत जनगणनेत लोकसंख्या घटली. अर्थात हा कर्मधर्मसहयोग म्हणावा लागेल. याच कालावधीत त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती सुरू केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भारतावर होऊ लागला. त्यांनी कारणमीमांसा दिलेल्या 'लोकसंख्या नियंत्रण' हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावर अजूनही आवश्यक जगजागृती नाही. पूर्वीच्या पिढीतील लोक सहज बोलतांना म्हणायचे ‘आमच्याकडे गरिबी होती, आम्ही ८ भावंडे होतो पण सुखी होतो' हेच वाक्य आणि हाच दृष्टिकोन किती अयोग्य होता हे कळायला भारताला पुढील कित्येक दशक गेली आणि हे कटू सत्य आहे. आठ भावंडं, त्यात कमावणारा एकटा, त्यातून येणारे अठराविश्व दारिद्र्य... त्यातून उद्भवलेले दुष्परिणाम हा झाला एक भाग... दुसरा भाग म्हणजे अर्थव्यवस्थेतील मूलभूत संसाधनावर येणारा ताण, वाढती रोगराई, घटणारे दरडोई उत्पन्न, घटणारे रोजगार, शहरांवर स्थलांतरातून वाढणारा ताण, घटणारा शेती उत्पादनांचा अपुरा पुरवठा, सार्वजनिक ताणतणाव, अस्वच्छता अशा शेकडो गोष्टी अमर्यादित लोकसंख्येमुळे निर्माण होतात. यासाठी कर्वे यांनी जनजागृती केली. तेव्हा त्यांना भारतातील किती लोकांनी गांभीर्याने घेतले असेल, हा वेगळा मुद्दा परंतु त्यांचे आताही साईट इफेक्ट आपल्याला जाणवत आहेत.


आपली लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. आणखी वाढतही आहे. आपण म्हणत आहोत की, देशाला पुढील ५ ते ७ वर्षांत तिसरी अर्थव्यवस्था बनवणार आहोत. पण पर्यावरणासह, घटत्या दरडोई उत्पन्नाचे काय? संसाधने ठरावीक ठिकाणी एकवटल्याने वाढत्या आर्थिक विषमतेचे काय? वाढत्या संसाधनावरील येणाऱ्या ताणाचे काय? वाढत्या कुपोषित बालकांचे काय? खरच आपण लोकसंख्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष करून आपण वास्तविक महाशक्ती होणार आहोत का? हा देखील कळीचा मुद्दा आहे.


अमेरिका, युरोपसारखे प्रगतशील देशांमागे लोकसंख्या नियंत्रण हे त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. जे आपल्याकडे नाही. आज दर मिनिटाला सरासरी सहा अपत्यांचा जन्म भारतात होतो. मृत्यू मात्र दिवसाला १ या गुणोत्तरात असल्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट हा गंभीर मुद्दा आजही आहे. त्यावर आपण आणखी काम करण्याची गरज आहे. तर आणखी शोकांतिका म्हणजे, ही अनेकदा वेगवेगळ्या पक्षांची नेतेमंडळी आणखी अपत्ये जन्मास घालण्याचे वादग्रस्त विधाने करत असतात. ही शिकवण काही नेते देत असल्याने, भर सभेत त्यावर लोक शिट्या आणि टाळ्यांनी सभेत प्रतिसाद देतात हे प्रचंड संतापजनक आहे. वास्तविक आपल्याला या गोष्टीवर खंत वाटली पाहिजे. हेच काम रघुनाथ कर्वे यांनी केले. आज जे कागदोपत्री हा होईना, ‘हम दो हमारे दो’चे तत्त्व आहे, तेही कर्वे यांचे योगदान आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली ज्यात संतती नियम आचार-विचार, आधुनिक कामशास्त्र, आधुनिक आहारशास्त्र, वैश्य व्यवसाय अशा प्रसिद्ध पुस्तकाचा समावेश आहे. केवळ अर्थव्यवस्थेसाठी नाही, तर आपण जो कर भरतो त्याबाबतही त्यांनी अनेक मार्गदर्शनपर पुस्तके लिहिली. जो कर आपण भरतो, तो केंद्र सरकार विकास निधीच्या माध्यमातून विविध राज्यांना वाटत असते. ज्यामध्ये लोकसंख्येचा निकषही मानला जातो. त्यामुळे जी राज्ये केवळ लोकसंख्येने कमी आहेत पण प्रगत आहेत, अशा राज्यांना निधी वाटपात मिळणारा दुजाभाव हा देखील देशासमोर प्रश्न आहे. या विषमतेलाही लोकसंख्या कारणीभूत आहेच. मात्र अशिक्षितता, लोकसंख्येचा विस्फोट, अशिक्षित नेतेमंडळी यामुळे उत्तरेकडील राज्ये मागास राहिली त्याचा फटका संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत असतो.


त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मूळही सामाजिक सुधारणेतच आहे हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे. रघुनाथ कर्वे यांनी आपले आयुष्य या कार्यासाठी खपवले, पण दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यांच्या नावाचे विस्मरण सुद्धा ठीक, पण किमान त्यांच्या कार्यातून समाजातील एक मोठा वर्ग अजूनही बोध घ्यायला तयार नाही. आजही ग्रामीण भाग जाउद्या शहरी भागातही ‘वंशाचा दिवा हवा’ नावाखाली पाच अपत्य जन्माला घातली जातात. विविध शहरांत, सध्या सरकार मोठ्या प्रमाणात विकासासाठी पायाभूत सुविधेवर लाखो कोटींचा निधीची भांडवली गुंतवणूक करत आहे. पण तीही लोकसंख्येच्या तुलनेत कमीच पडणार. ती किती काळ पुरणार? यातून सरकारचीच नाही तर सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की, लोकसंख्या नियंत्रित करणे. आता हम दो हमारा एक केल्यासच ही अर्थव्यवस्था किमान जागतिक स्पर्धेत टिकून राहील. अन्यथा नुसत्या संकल्पाने काही होणार नाही. नाही तर सगळं आयुष्य मुंबईच्या लोकल ट्रेनचे धक्के खातच काढावे लागते हे वास्तव आहे. त्यातही कितीही ट्रेन वाढवल्या तरी त्या वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाढते स्थलांतरित लोंढेदेखील या गोष्टीलाही जबाबदार आहेत.


यामुळेच त्यांचे स्मरण करून हा लेख लिहिणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे रघुनाथ कर्वे यांचे योगदान आपण विसरलो असलो तरी त्यांनी सांगितलेला संतती नियमनाचा सिद्धांत पाळल्यास आपण भारतासाठीच नाही, तर जगभरासाठीही चांगली हॉस्पिटॅलिटी देऊ शकू.

Comments
Add Comment