
संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अवैध बांधकामविरुद्ध मोहीम पुन्हा सुरू केली आहे. आज दिल्ली गेट ते हर्सल टी पॉईंटपर्यंत ही धडक कारवाई करण्यात आली, यासाठी १५ जेसीबी, चार कोकलेन, पंधरा टिप्पर आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईला काही दुकानदारांनी सुरुवातीला विरोध केला खरा, परंतु कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर ते स्वतःहून अतिक्रमण काढण्यास तयार झाले.
सांभाजीनगरमध्ये दिवसागणिक वाढत चाललेल्या अवैध बांधकामाला अंकुश घालण्यासाठी आणि अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने कठोर भूमिका घेतली असून, "अतिक्रमण काढत नसल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा," असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
अतिक्रमण संबंधित खंडपीठाने अनेक याचिका फेटाळून लावल्या असून, अवैध बांधकाम तोंडण्यासाठी नोटीस देण्याची गरज नसल्याचेही म्हटले आहे. ज्यांची अधिकृत घरे रस्त्यात येत आहेत, त्यांना महानगरपालिकेकडून टीडीआर दिला जाणार आहे. तर व्यावसायिक बांधकामे हटवली जात आहेत.