Monday, August 4, 2025

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


आंतरजातीय विवाहाला ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो . याचेच एक उदाहरण खेड तालुक्यातील खरपुडी गावात पाहायला मिळालं आहे . मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला . लग्नानंतर दोघेही खरपुडी (ता. खेड ) येथे राहत होते. मात्र त्यांच्या लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता. याच रागातून रविवारी सायंकाळी प्राजक्ताच्या आई आणि भावांनी जमावासह गावात येऊन विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचे अपहरण करून तिला घेऊन गेले .


या प्रकरणी प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण १५ जणांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे . पोलिसांनी प्राजक्ता सुखरुप असून लवकरचं तिची सूटका केली जाईल, असा दावा केलाय.


मात्र 'माझ्या पत्नीचा जीव धोक्यात असून, तिचं काही बरं वाईट केलं जाईल'. अशी भीती जखमी पती विश्वनाथ गोसावीने व्यक्त केलीये. गेल्या वर्षभरात प्राजक्ताच्या कुटुंबीयांकडून आम्हाला वारंवार धमकी देण्यात येत होती . आम्ही उच्च कुटुंबातील आहोत , तुम्हाला जिवंत ठेवणार नाही आम्ही तुम्हाला ठार मारू, अशाप्रकारे धमकी ते देत होते . याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनला तक्रार केली होती . वारंवार खेड पोलिसांना याबाबत कळवलं होतं, त्यांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र ठोस काही झालं नाही, अखेर माझ्या पत्नीचं अपहरण झालं. अशी आपबिती विश्वनाथने मांडली आहे.


ही घटना केवळ एका प्रेमविवाहाचा प्रश्न नसून, समाजातील जातीय तेढ आणि जुनाट मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. प्राजक्ताला जबरदस्तीने पळवून नेल्याची बाब तिच्या इच्छेविरुद्ध असल्याचे संकेत मिळत असून यामुळे कायद्यानेदेखील हा गंभीर गुन्हा ठरतो. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी खरपुडी गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांनाही शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment