येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम)आज मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आज सर्वसामान्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करून आहे. बेस्टचा जन्म इ. स. १८७३ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला. आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्टने वाडी बंदर येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले. त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीज पुरवठा करण्याची जवाबदारी आली. १९२६ पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडाआधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित आली.
बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठच्याही भागात जायला सध्या बेस्टची सेवा उपलबध आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्ट पूरक सेवा पुरवत आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे 'बेस्ट'. आता महानगरपालिकेच्या अखत्यारित असूनही, बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो. बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये 'बॉम्बे ट्रामवे १८७४' नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हिने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणाऱ्या ट्राम धावू लागल्या व नंतर जास्त गर्दी होत असल्याने १९२० मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली.
बेस्टची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई. असत कारण ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला. सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या. पहिली "लिमिटेड" बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली. दुसऱ्या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७च्या दिवशी "बेस्ट" मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली. कालांतराने बॉम्बेचे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट"चे नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले. त्याचेच नाव पुढे बेस्ट म्हणून जनमानसात रुळले. घोड्याने ओढणाऱ्या ट्रामपासून डिझेल-इलेक्ट्रिक हायब्रीड एसी बस ते प्रदूषणमुक्त इलेक्ट्रीक बसपर्यंत, इतर कोणत्याही वाहतूक संस्थेने दिल्या नसतील इतक्या विविध प्रकारच्या बसेस व तितक्याच प्रकारच्या वाहतूक सेवा बेस्टने मुंबईकरांना आजवर दिल्या आहेत. एकीकडे आपण वर्धापनदिन साजरा करत असताना आज बेस्ट ही खरोखरच बेस्ट राहिली आहे का असा प्रश्न पडतो. कारण याच बेस्टला आता उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. कारण बेस्टचे हळू हळू होत चाललेले खासगीकरण.
एकेकाळी सुवर्ण युग पाहिलेल्या बेस्ट आज मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या खोल गर्तेत रुतली गेली आहे. आज बेस्ट उपक्रमाचा तोटा हा साधारण बारा हजार करोडच्या आसपास गेला आहे. आज बेस्टमध्ये कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. बेस्टला कायमस्वरूपी महाव्यवस्थापक नाहीत गेल्या दोन ते तीन वर्षांतच तीन ते चार महाव्यवस्थापक होऊन गेले ते बेस्टला उपक्रमाला या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही मनापासून काम करत नाहीत त्यांना विशेष ममत्व नसल्यानेच आला दिवस ढकलण्याचे ते काम करतात. दुसरीकडे मुंबई महापालिका प्रशासनाकडूनही बेस्टकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. बेस्ट मुंबई महानगरपालिकेचा अविभाज्य अंग असतानाही बेस्टकडून सापत्नीक वागणूक मुंबई महापालिकेकडून दिली जात आहे. कोणाची मागणी नसताना एका महाव्यवस्थापकाने बस भाडे कमी केले आणि त्याची प्रतिपूर्ती पालिका देणार असे सांगून बेस्टला मोठ्या नुकसानीत आणले मात्र पालिकेने प्रतिपूर्ती तर केली नाही उलट यामुळे बेस्ट मोठ्या तोट्याच्या गाळ्यात रुतून बसली. ज्यामुळे आजही बेस्टला सावरणे मुश्किल होऊन बसले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या अनेक समस्या आहेत मात्र आज कोणालाच त्याकडे पाहावयास वेळ नाही. त्यामुळे जुन्या जाणत्या व विशेष करून बेस्टवर प्रेम करणाऱ्या व बेस्ट टिकून राहावी अशी मनापासून इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना मात्र आज मनापासून बेस्टची ही अशी अवस्था पाहून मनापासून खंत वाटते व एक चांगली संस्था रसातळाला जाताना पाहून त्यांना दुःख होते. बेस्टला अखंड विद्युत पुरवठा सुरू करणारा विद्युत विभागही आता तोट्यात जाऊ लागला आहे. एकेकाळी हाच विद्युत पुरवठा विभाग बेस्टच्या परिवहन उपक्रमाला पूरक ठरून तग देऊन राहिला होता म्हणून आज इतकी वर्षे बेस्टचा वाहतूक विभाग हा अखंडपणे सुरू राहिला मात्र आता सर्व बाजूंनी आर्थिक कोंडी झाल्याने बेस्टच्या परिवहन विभागाला उतरती कळा लागली आहे. बेस्टचे कर्मचारी हे दिवसेंदिवस कमी होत आहेत बेस्टमध्ये खासगीकरणाचा प्रवेश झाल्यानंतर आता संपूर्णपणे बेस्टची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे.
बेस्ट एकेकाळी ४ हजार ८०० स्वमालकीच्या बस गाड्या होत्या आज ती संख्या ३८० वर आली आहे. येणाऱ्या काळात त्यांची संख्या शून्य होईल. त्याला लागणारा कामगार वर्ग ही बेस्टचा होता. सध्या बेस्ट बस व बसचालक हे कंत्राटदारांकडील आहे व वाहक हे बेस्टकडील आहे. येणाऱ्या काळात बेस्ट वाहक हे सुद्धा कंत्रादाराकडील असतील. नोकरीची कोणतीही शाश्वती नसल्याने त्यांच्याकडून मनासारखे काम होईलच असे नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाचे भवितव्यही अंधारात आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पांसाठी लाखो कोटी रुपये दिले तेच राज्य सरकार बेस्टसाठी हात आखडता घेत आहे.
राज्य सरकारकडून मदत केली जाते मात्र तीही तोकडी असते. येणाऱ्या काळात मेट्रोही बेस्ट परिवहन सेवेसमोर मोठे आव्हान निर्माण करणार आहे. त्यामुळे हा उपक्रम टिकेल याची शाश्वती नाही तर दुसरीकडे रिलायन्स टाटा या विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्याही शहरी भागात आल्याने बेस्टपुढे त्यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे, तर दुसरीकडे वर्षोनुवर्षे इमाने इतबारे सेवा केलेल्या निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांचा प्रश्नही बेस्ट समोर आहे. आजही जवळजवळ दोन हजार निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना ८०० ते १००० करोड रुपये देण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी आज बेस्टकडे पैसे नाही. आपल्याच पैशासाठी कर्मचाऱ्यांना नाईलाजाने न्यायालयात जाऊन दाद मागावी लागत आहे.
बेस्टने कामगार संघटनांबरोबर केलेल्या करारानुसार बेस्टचा बस ताफा हा ३ हजार ३३७ पर्यंत ठेवणे अबाधित होते मात्र आज ३०० बस गाड्या आलेल्या असतानाही बेस्टकडे बस गाड्या घेण्यासाठी पैसे नाहीत इतकी आर्थिक कोंडी बेस्टने आतापर्यंत कधीच पाहिली नव्हती. एकेकाळी ४२ हजार असलेला आज कर्मचारीवर्ग २४ हजारावर आला आहे. ४५ लाख असलेला प्रवासी आज ३० लाखांवर आला. महिन्याभरापूर्वी केलेल्या बस भाडेवाढीमुळे उत्पन्न जरी वाढलेले असले तरी बेस्टला तारून नेण्यास तो थोडाफार आधार ठरू शकेल. समस्या अनेक असल्या तरी उपाय एकच आहे तो म्हणजे मुंबई पालिकेकडून सोबतच राज्य शासनाकडून भरीव आर्थिक मदत . तरच हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा उपक्रम टिकू शकेल. बेस्ट दिनानिमित्त तूर्तास तरी एव्हढेच. बेस्ट दिनानिमित्त शुभेच्छा.
- अल्पेश म्हात्रे