मोअर इक्वल्सना धडा

  17

जॉर्ज ऑरवेल या लेखकाची अॅनिमल फार्म प्रसिद्ध कादंबरी आहे. त्यात डुकरांना शक्तीशाली होताना पाहून एक वाक्य प्रसिद्ध आहे ते म्हणजे इन पोलिटिक्स ऑल मेन आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. अशाच मोअर इक्वल्सनी सध्या राजकारणात धुमाकूळ घातला आहे. ते प्रत्येक राज्यात आहेत तसेच प्रत्येक पक्षात आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकचे एकेकाळचे खासदार प्रज्वल रेवण्णा लैंगिक बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यामुळे राजकारणातील सत्तेच्या दारातून कितीही पाशवीकांड करण्यात माणसे कशी कसूर करत नाहीत याचे आणखी एक उदाहरण भारतीयांच्या समोर आले. प्रज्वल हा हसन या कर्नाटकातील मतदारसंघाचा खासदार होता. त्याचे महिलांचा लैंगिक छळ करण्याचे हे प्रकरण समोर आले आणि रेवण्णा याला जन्मठेप झाली, पण या निमित्ताने राजकीय पक्ष आपल्या अशा कृत्यांसाठी राजकारणातील पदांचा कसा दुरुपयोग करतात आणि त्यासाठी कुणाच्याही पायाशी कशी लोळण घेतात हे समोर आले. रेवण्णा याच्याकडे सत्ता आली ती कुटुंबातील अमर्याद सत्तेमुळे आणि त्यातून त्याचा अहंकार वाढला. मग घरात काम करणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषणाचे प्रकार सुरू झाले आणि त्यामुळे त्याचे मनोधैर्य वाढले. त्यातच देवैगौडा यांनी भाजपशी जवळीक साधली आणि मग मोदी यांच्या वळचणीखाली ते अनिर्बंध सत्ता उपभोगू लागले. प्रज्वल रेवण्णा यात उदय आणि अस्ताची कहाणी भारतीय मनाला विचार करायला लावणारी आहे.


जेडीएस म्हणजे जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षाचा एकमेव खासदार असलेल्या प्रज्वल याला २०१९ नंतर पक्षातून निलंबित करण्यात आले आणि महिलांवर लैगिक अत्याचार प्रकरणात त्याच्यावर विविध आरोप झाल्यावर एसआयटीने त्यांची चौकशी केली. त्यात तो दोषी आढळला आणि आता तर विशेष सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रज्वल याने न्यायालयात युक्तीवाद करताना असे म्हटले की, मला कमी शिक्षा व्हावी कारण मी बीई आहे आणि महाविद्यायात सतत मी टॉपर राहत असे, पण याचा अर्थ असा नाही की शिक्षणात टॉपर राहिला की, न्यायालय त्याच्या लैंगिक गुन्ह्याबद्दल दया दाखवेल. तेच प्रज्वल प्रकरणात घडले आणि महिलांवरील बलात्कार आणि फक्त एक नाही तर अन्य कित्येक प्रकरणे आहेत की ज्यात प्रज्वल आरोपी आहे आणि अनेक महिला त्यात बळी पडल्या आहे. त्यामुळे प्रज्वल याच्याबाबतीत न्यायालयाने कसलीही लेनिअन्सी दाखवली नाही आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामुळे राजकारणात आपण कितीही मोठ्या घराण्याचे वारसदार असलो तरीही गुन्हा तो गुन्हाच आणि त्यामुळे त्याला सोडता कामा नये असा दंडक ज्या आपल्या पूर्वसुरीनी घालून दिला आहे त्याचे पालन न्यायालयाने केले असे दिसते. या प्रकरणाचा राजकीय फायदा घेणार नाही तर ते राजकीय पक्षच नाही. अर्थात काँग्रेसने या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रज्वल रेवण्णा याच्या काकांना म्हणजे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी युती काँग्रेसनेच केली होती. कर्नाटक सरकारने मदत केल्यानेच प्रज्वल रेवण्णा मध्यंतरी जर्मनीला पळून गेला होता. प्रज्वल यांच्या लैगिक शोषणासंबंधी केलेल्या आरोपांची चौकशी स्थापन केलेल्या प्रकरणी त्याला एसआयटीने अटक केली आणि त्यांच्यावर खटला चालवून त्यांना शिक्षा ठोठावली, पण राजकारणात सत्तेतून पैसा आणि त्यातून अमर्याद सत्तेचा वापर आणि मग कुणावरही अत्याचार करण्यास राजकारण्यांचे चेलेचपाटे कसे मोकळे होतात याचे उदाहरण समोर आले.


प्रज्वल याला शिक्षा झाली. पण त्यानिमित्ताने आणखी एक सत्तेतील घराणे अमर्याद सत्तेने कसे माजोरी झाले होते आणि त्याला न्यायालयाने कसा लगाम घातला आहे हे सिद्ध झाले. प्रज्वल रेवण्णा याचे नाव एकेकाळी कर्नाटकातील उगवता तारा असे घेतले जात होते. आता त्याचे रूपांतर रसातळाला गेलेल्या राजकीय नेत्यात झालेे. त्याचा उदय जसा नाट्यपूर्ण होता तसेच पतनही नाट्यपूर्ण आहे. कुटुंबातील सत्तेचा वापर करून राजकारणात अनिर्बंध सत्ता उपभोगताना घराणी कशी पतन पावतात याचे प्रज्वल रेवण्णा उत्तम उदाहरण आहे. कर्नाटक महिला आयोगाने विनंती केल्यावरून त्याच्याविरोधात एसआयटी नेमली आणि तिचा झटपट निकालही लागला. स्वतःला मोअर इक्वल समजणाऱ्या राजकारण्यांची आणि त्या बळावर अनिर्बंध सत्तेचा गैरवापर करण्याची अशी असंख्य उदाहरणे सापडतील. त्यांना प्रज्वल रेवण्णा प्रकरण हा एक धडा आहे. आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटणार यात काही शंका नाही. एकूणच देशातील सत्तेच्या जोरावर महिलांचे लैगिक शोषण करणाऱ्या राजकीय नेत्यांना हे प्रकरण म्हणजे एक सणसणीत चपराक आहे असे म्हणता येईल. ज्या महिलेने तक्रार केली तिच्या धैर्याला सलाम करावा लागेल कारण तिने इतके मोठे कुटुंब आणि माजी पंतप्रधानाचा नातू असलेल्या प्रज्वलपुढे हार मानली नाही आणि ती न्यायाची लढाई लढत राहिली. त्यामुळे प्रज्वलला शिक्षा होऊ शकली हे आपण विसरता कामा नये. प्रज्वल याचे आयुष्य तर बरबाद झालेच आहे आणि आता कुणी त्याला वाचवेल अशी शक्यता दिसत नाही. तसे झाले तर भारतीय लोकशाहीचे ते सुदैव असेल, पण प्रज्वल याला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायव्यवस्थेला आणि त्या महिलेला सलाम. जिने ठाम राहून आपले आरोप कायम ठेवले आणि त्यामुळे प्रज्वल आज कायमसाठी तुरुंगात गेला आहे. पेन ड्राईव्हचा वापर हसनमध्ये प्रज्वलने केला होता आणि तोच त्याच्या अंगलट आला. कारण महिलांचे लैंगिक शोषणाचे त्याने व्हिडिओ काढले होते आणि ते सर्क्युलेटही केले. पण न्यायालयात त्याचे काळे कारनामे समोर आले आणि त्याच्याविरोधात अनेक पुरावे गोळा करण्यात आले. प्रज्वल प्रकरणाने राजकारणात मोअर इक्वल्सना शिक्षा होऊ शकते आणि तेही गजाआड जातात हा संदेश देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

बोटावर निभावलं!

‘जीवावर बेतलेलं अखेर बोटावर निभावलं' म्हणून राज्याचे नूतन क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी रात्री

अजेंडा फसला!

‘दहशतवादाला कुठलाही धर्म नाही, कुठलाही रंग नाही', अशी टिप्पणी करत मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास

‘लाडक्यां’चा घोटाळा

राज्यात लोकप्रिय आणि गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या एनकेन कारणाने वादात आहे. ही सरकारी योजना केवळ

माँ तुझे सलाम...

पहलगाम या काश्मिरातील निसर्गरम्य स्थळी भारतातील पर्यटक फिरायला गेले असताना कसलाही अपराध नसताना त्यांचे शिरकाण

‘दिव्या’ विजेती

भारतात उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर सारे चित्र पालटले आणि महिलांची सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या

शाळांच्या इमारतींचा धोका

बालकांना कळत्या वयापासूनच शालेय जीवनाशी समरस व्हावे लागते. एकेकाळी उजवा हात डाव्या कानाला लागल्याशिवाय