
मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा येथील नूर मंझिल ही चार मजली इमारत आज सोमवारी सकाळी अचानक कोसळली. ही इमारत फार जुनी आणि कमकुवत होती. मात्र, इमारत अचानक पडल्याने मोठा आवाज झाला. काही कळण्याच्या आतच हवेत धूर झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणीही यामध्ये जखमी झाले नाही. पोस्ट ऑफिसच्या शेजारी ही इमारत होती. दरम्यान रहदारीचा रस्ता असल्याकारणामुळे या परिसरातून अनेक लोकं ये जा करत असतात, घटनेदरम्यान देखील अशाचप्रकारे लोकं आपआपली काम करत असताना एकच मोठा आवाज आला आणि धुरळा उडाला. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मुंबईत चक्क पत्त्यासारखी पडली जुनी इमारत
इमारत ही जुनी होती, त्यामुळे याठिकाणी कोणी राहत नव्हते, यामुळे जखमी कोणीही झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या इमारतीच्या आजुबाजूला देखील काही इमारती आहेत. मात्र, त्यांचे काही नुकसान झाले नाही. मात्र कोसळलेल्या इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग हा रस्त्यावर पडला असल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. घटनेच्या वेळचे अनेक व्हिडीओही पुढे येताना दिसत आहेत.