
लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची चमक दाखवत शानदार शतक झळकावले . हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक होते, आणि त्यापैकी चार शतके त्याने इंग्लंडविरुद्धच केली आहेत. या शतकासह जायसवालने माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा विक्रम मोडीत काढला, तसेच टीम इंडियानेही एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
जायसवालने रवी शास्त्रींना मागे टाकले
२३ वर्षांपेक्षा कमी वयात सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत यशस्वी जायसवालने रवी शास्त्रींना मागे टाकले आहे. शास्त्रींच्या नावावर २३ वर्षांपेक्षा कमी वयात ५ कसोटी शतके होती, तर जायसवालने आता ६ शतके पूर्ण केली आहेत.
जागतिक स्तरावर, २३ वर्षांपेक्षा कमी वयात कसोटी शतक झळकावणाऱ्या सलामीवीरांमध्ये जायसवालने दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज ग्रेम स्मिथने या वयात ७ शतके झळकावली होती, जो या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
टीम इंडियाने रचला खास विक्रम
या मालिकेत भारतीय संघानेही एक विशेष विक्रम प्रस्थापित केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत भारतीय फलंदाजांनी एकूण १२ शतके झळकावली आहेत. कसोटी मालिकेतील भारतीय संघासाठी हा एक नवा विक्रम आहे. यापूर्वी, एका कसोटी मालिकेत भारताने इतकी शतके कधीच केली नव्हती.