संस्कृतीचा गोडवा

  40

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


श्रावण महिन्यात पाठोपाठ सणांची चंगळच सुरू असते. सण उत्सव समारंभाचे पवित्र मांगल्य संस्कृती जपणारा धार्मिक पूजा प्रार्थना उपवास असणारा असा हा एकूणच श्रावण महिना. सर्वांचा लोकप्रिय आणि आवडता. या महिन्यात हसरा नाचरा श्रावण वसुंधरेला सुखावतो. हिरव्या रंगाची सृष्टीने जणू हिरवी शालू नेसल्यासारखी भासते. श्रावणातील मंगळवार हा नवविवाहातांसाठी आनंदाचा वार असतो. यावेळी अनेक ठिकाणी मंगळागौरीची पूजा करून रात्री मंगळागौरीचे खेळ खेळले जातात. मंगळागौरीची ही किमयाच न्यारी असते. पूर्वीच्या काळात मुलींची वयाच्या १५, १६ व्या वर्षी लग्न होत असत. त्यामुळे सासूच्या धाकाखाली असणाऱ्या नवविवाहितेला, माहेरवाशीनींना माहेराहून भाऊरायाला घ्यायला पाठवतात. हा दिवस माहेरवाशीन मुलींसाठी खास असतो. श्रावण मासात येणारे मंगळागौर हे असे निमित्त होते की, या माध्यमातून मुलींनी आपला ताण, जबाबदाऱ्या विसरून आपल्या मनातील ज्या काही भावना असतील त्या मंगळागौरीच्या गाण्यांमधून त्या व्यक्त करत असत. या गीतांमधून सासर आणि माहेरचा नातेसंबंधांवर आधारित ओढा किती आहे हे गाण्यांद्वारे त्या व्यक्त होत असत.


मंगळागौरीचे फेर धरताना अनेक पारंपरिक गाणी म्हटली जातात. यामध्ये झिम्मा फुगडी, झोके, बस फुगडी, तीन हाताची फुगडी, आक्का बाईचा कोंबडा, एक लिंबू झेलुबाई तो लिंबू झेलू, किसबाई किस दोडका किस, पोरी पिंगा गं, झिम्मा, रुणझुणत्या पाखरा जारे माझ्या माहेरा, घालघाल पिंगा वाऱ्या असे खेळ व सुरेल गाण्यांनी हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. गोड गीतांच्या या नृत्यांनी सारा माहोलच धमालमस्तीचा होऊन जातो. पारंपरिक खेळ व लयबद्ध अर्थपूर्ण गाणी म्हणताना सहज दिवस निघून जातो. श्रावण मासातील माहेरवाशींनीसाठी हा एक अवर्णनीय सोहळाच असतो. या खेळामध्ये महिला उखाणा, गाणी, बालपणीचे किस्से एकमेकींना सांगतात.
“हिरवा पोपट जंगलात,
बाईला दिले कोकणात.
बाईला मुरारी कोण जातं
बाईला मुरारी बंधुराज! “
मग सासरी जाऊन तो बंधू तिला घेऊन येतो आणि मग तिची मंगळागौर साजरी केली जाते. तिची माहेरी मंगळागौर झाल्यावर सासरी जाताना गाणं म्हटलं जातं
नणंदा-भावजया दोघी जणी,
खेळत होत्या छप्पापाणी
खेळता खेळता झगडा झाला, भावजये वरी डाव आला
रुसून बसली गाईच्या गोठ्यात
सासुरवाशी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी घरासी
येईना कैसी |
यामध्ये प्रत्येकजण सासू-सासरे, दीर, ननंद, जाऊ सगळे जाऊन सुद्धा तिचा रुसवा काही निघत नाही. कोण म्हणतं घर, गाडी, सोनं, शेती सारं देऊ पण ती कोणालाच दाद देत नाही.
पती गेले समजावयाला, उठा उठा राणीसाहेब चला घराला
लाल चाबूक देतो तुम्हांला, उठली गं उठली गजबजून
पदर घेतला सावरून, ओचा घेतला सावरून
कापत कापत आली घरासी
यादवराया राणी घरासी
आली कैसी
शेवटी पती आल्यावरच ती त्याचे ऐकते. तिचा रुसवा काढला जातो. म्हणजे एकूणच स्त्रीला संपत्तीचे काही मोह नाहीयं केवळ तिचे आपल्या पतीवर असलेलं प्रेम, निष्ठा या गाण्यातून बरंच काही सांगून जातं.
या सर्व गीतातून एक एक कथा उलगडत जाते. आणि ती सत्यकथा आजही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. ११० प्रकारचे खेळ, २१ प्रकारच्या फुगड्या, सहा अगोट्या पागोट्या प्रकारामध्ये करवंटी, गोफ, टिपऱ्या, साळुंकी, घोडाहार, सासू सुनेचे भांडण, लाटा बाई लाटा, आठडं गेलं गठुडं केलं, अडवळघूम बाई पडवळ घुम, बाई घागर घुमू दे, आया नो या गं बायांनो, सुप सुप सुपल्या, काटवथी कणा, नाच गं घूमा, ऐलमा पैलमा गणेश देवा, कारल्याचा वेल लाव गं सुनबाई अशी विविध प्रकारची गाणी, फुगड्या
म्हटल्या जातात.
असे हे मंगळागौरीचे खेळ पहाटेचा कोंबडा आरवेपर्यंत खेळले जातात.
माहेरवाशीनी सासरी जाण्याआधी मंगळागौरीची छोटेखानी आरती करून नैवेद्य दाखवला जातो. अशा तऱ्हेने माहेरवाशीनींचा मंगळागौर हा पारंपरिक सण साजरा केला जातो. हल्ली बऱ्याच शहरांमध्ये महिलांनी एकत्र जमून मंगळागौर मंडळे स्थापन केली आहेत. त्या खेळांची पद्धतशीर आखणी व सारव करून व्यावसायिक तत्त्वावर मंगळागौर खेळ खेळले जातात. पण या व्यावसायिक मंडळाचे कार्यक्रमही संपूर्ण रात्रभर सुरू राहतील, असे नसतात. या खेळांना व त्यानिमित्ताने संस्कृतीजतनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी काही ठिकाणी अशा व्यावसायिक हौशी मंडळांच्या मंगळागौर खेळांच्या स्पर्धाही घेतल्या जातात. काळ बदलला, स्वरूप बदलले तरी ही परंपरा टिकवली जातेय, हेही नसे थोडके. असो, कालाय तस्मै नम:!


Comments
Add Comment

गणपतीची अनेकविध रूपं

डॉ. अंबरीष खरे : ज्येष्ठ अभ्यासक सध्या अवघे समाजमन गणेशोत्सवाच्या तयारीत गर्क आहेत. लवकरच नेहमीच्या उत्साहात

असा झाला गणेशाचा जन्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे हिंदू संस्कृतीत गणपती या देवतेला सर्वोच्च मान असून गणपती हा विघ्नहर्ता

‘तुमको ना भूल पाएंगे.’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सुमारे ९९ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या श्रीष्टीनाथ

सर्वेपि सुखिनः सन्तु।

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य

मुलांना चांगल्या सवयी कशा लावाल?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी किंवा संस्कार दिल्यास भविष्यात हीच मुलं

प्रथम तुला वंदितो...

मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने होते. असा हा पवित्र, मंगलमय,