Saturday, August 2, 2025

दर्पण झूठ ना बोले...

दर्पण झूठ ना बोले...

माेरपीस : पूजा काळे


गोल, लंबगोल, चौकोनी, लाकडी, चांदीच्या फ्रेममध्ये बसवलेली, वस्तुस्थिती दर्शवणारी काच वस्तू ज्याला आपण आरसा वा दर्पण म्हणतो. आरसा आपल्या छबीची ओळख करून देत असल्याने ‘दर्पण झूठ ना बोले’चा वाक्प्रचार प्रचलित झाला असावा. आरशात प्रकाश किरण परावर्तित होतात, आपलं रूपडं दाखवतात. पारदर्शी आरसा त्याच्या गुणधर्मानुसार असण्याच्या, दिसण्याच्या वेळा बदलतो. मानवी मनाचं सारस्थ्य करणारी आरशाची परंपरा आधुनिकतेशी हात मिळवते. खऱ्या रूपाचं दर्शन घडवणाऱ्या पारदर्शी आरशापुढे खोट्याची दुनिया फिकी पडते. म्हणूनचं सांग दर्पणा मी कशी दिसते? प्रश्नाचं उत्तर सापडता सापडत नाही. मन आणि आरशाचा पूर्वापार असलेला संबंध हवा तसा खुलताना दिसत नाही. आपली मनोवस्था जशी असते, त्यानुसार आरशातील बिंब दिसू लागते. वरवर नटून-थटून साजक्षृंगार केला पण मन नाराज असेल तर समोर आरसा असून देखील सुंदर, आनंदी दिसण्याची सुतराम शक्यता नाही. हुबेहूब प्रतिबिंब दाखवतो आरसा. आपण जसे असतो अगदी तसंच दाखवतो तो. चेहरा खोटं बोलतो तसा आरसा खोटं वागतो. पाऱ्याच्या आच्छादनात लपेटून घेतो स्वत:ला. मुखवट्यावर मुखवटे चढवले जातात, मढवले जातात. रूपाच्या रूपड्याला भावत खोट्या प्रतिमेला आरसा तीट लावतो. नितळ आवर्तनात सापडलेला मनारसा पाहिलाय का कुणी? रंगीत तुकड्यात जोडलाय का कुणी? निष्ठावंत असणाऱ्यांनी खऱ्याखोट्याची फिकीर का बाळगावी? आरशाला दोष देण्याऐवजी स्वत:ची चूक स्वत: सुधारावी. खोट्या प्रतिमेमागे माणसं नाहक धावतात आणि क्षमतेपेक्षा अधिक अपेक्षा आरशाला चूर करतात.
लहानपणापासूनचं छोटी बाहुली घेऊन नाचत, मुरडत आरशात पाहण्याचा छंद होता मला. आपण कसे दिसतो यापेक्षा आरशातून अल्लड रूप पाहण्याची मजा वेगळी होती. दोन वेण्यांवर लगडलेला गजरा, हातात खेळणी, अंगावर ओढणी साराचं मजेचा भाग होता. मोठी होईस्तोवर आरसा अंगवळणी पडला. छान दिसतो याची ओळख पटवत, मनातल्या मनात चांदण शिंपित जाणारा आरसा शाळा- कॉलेजच्या दिवसात आनंद वेचू लागला. वधू होण्याच्या दिवसात अंगभर तारुण्य चेतवत स्वप्नील चांदण्यात खेळवत राहिला. पुढे वाढत्या वयाबरोबर आरशाची पक्वता वाढली. अनुभवाअंती पोक्त दिसू लागलेल्या आरशाला टाळलेलं बरं म्हणत मी त्यापासून लांब झाले. कधीकधी तर स्वत:चं रूप आरशात पाहायची भीती वाटायची. आपण कुरूपतेकडे झुकल्याचे संकेत तर हा आरसा देत नाही ना? तारा जुळलेल्या आरशाची संगत नकोशी का वाटते? मला पडलेले अनेक प्रश्न.


भ्रमिष्टावस्थेतला रुग्ण आधी स्वतःशी आणि मग आरशाशी का बोलू लागतो? समोर दुसरी व्यक्ती आहे असे समजून हावभाव करतो. यासारख्या दयनीय अवस्था आरसा भासवू लागतो. अशावेळी हे जग कायम सोडून गेलेल्या मैत्रिणीच्या शेवटच्या कवितेतील अंतिम ओळी खूपशा बोलक्या वाटू लागतात...
आरशातलं प्रतिबिंब स्मितहास्याचे भासे,
वयाच्या रेषा कडवट होत आहे.
अवखळ काळ्या चंदेरी बटा मज खुणावताना,
वय वर्ष सरले माझे मला ते सांगू पाहे |
स्त्रीजन्माची गणना होताना,
शोषणाला मी डावलून निघाले.
माझे मला आज स्वीकारताना,
वय वर्ष सरले माझे मला ते सांगू पाहे |
ध्यासाचा सोडून विळखा,
सत्याची कास धरताना परतून एकदा,
वय वर्ष सरले माझे
मला ते सांगू पाहे... |


विचाराअंती व. पुं चा एक मुद्दा मला पटतो. बघा तुम्हालाही पटतोय का! व. पु. म्हणतात, “आपला चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. त्याच्या इतका विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कुणी नाही. आपण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहताना क्रोध, द्वेष, मत्सर, स्पर्धा, हेवा ही सगळी रूप अफरातफर न करता पाहायची. मन तपासावं. यात बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट दिसतील. यात कोणी कोणी जागा अडवलीय ते पाहायचं.” दरदिवशी हा सुयोग्य विचार घेऊन मी उठते. आरशात बघून हसते. शृंगार करताना त्याच्या पुढ्यात उभी राहते. छानसा पेहराव केला की तोच मला मी छान असल्याची पावती देतो, माझी कळी खुलते. पिकलेले केस लपवण्याच्या प्रयत्नात तो म्हणातो, “वय वाढलं तरी मनाने तरुण राहा.” दुःखी चेहऱ्याने त्याच्यासमोर गेलेले आवडत नाही त्याला. त्यावर लगेच त्याचं उत्तर... सुखाचे क्षण डोळ्यांसमोर आण. भारलेले क्षण आठवताना मनी आनंद भरतो. आजकाल सर्वत्र माझ्या आनंदाची चर्चा चालते, त्याचं गुपित विचारलं जातं. दर्पण झूठ ना बोले...! पण मी का सांगू! माझी मन की बात! माझ्या बालमनावर अधिराज्य गाजवणारा माझा प्रिय आरसाचं आहे म्हणून.

Comments
Add Comment