
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
शाळेतून माझी मुलगी घरी आली आणि मला दोन्ही हात पुढे करून म्हणाली,
“हे बघ माझ्याकडे काय आहे?” मी कौतुकाने पाहू लागले. दोन्ही हातभर वेगवेगळ्या रंगीबेरंगी रिबिनी तिने बांधलेल्या होत्या. मी विचारले, “हे काय गं?” तर म्हणाली, “आज फ्रेंडशिप डे आहे. त्यामुळे माझ्या मैत्रिणींनी बांधल्यात.” मी म्हटले, “अगं बाई, एवढ्या मैत्रिणी का तुझ्या?”
माझा कोचत स्वर बहुतेक तिला कळला नाही ती ‘हो’ म्हणाली. संध्याकाळी परत माझ्याजवळ आली आणि म्हणाली, “आई, या सगळ्या रिबिनी काढून देशील का?” त्या रिबिनींची संख्या साधारण पन्नास-साठ तरी असावी. मी तिला म्हटले, “थांब, थांब जरा कात्री घेऊन येते.” तर वैतागून म्हणाली, “आई कात्रीने कापायची नसतात हे फ्रेंडशिप बँड. मग मैत्री तुटते. याच्या गाठी सोडवायच्या असतात.”
मग काय मुलीच्या समाधानासाठी मी गाठी सोडवत राहिले तासभर! त्यानंतर सगळ्या रिबिनी बराच वेळ प्रेमाने हाताळल्यावर तिने मस्त एका चॉकलेटच्या रंगीत डब्यात भरून कपाटात ठेवून दिल्या सर्वात वर.
मनात विचार आला... आमच्या लहानपणी अशा रंगीबेरंगी रिबिनी नव्हत्याच हातावर बांधण्यासाठी तरी आमची मैत्री टिकायची हो. ‘फ्रेंडशिप डे’ नावाचा प्रकारही नव्हता त्यामुळे आमच्यासाठी मैत्री दिन हा रोजचाच असायचा! तेव्हा ‘मैत्री’ ही गोष्टसुद्धा अजिबातच माहीत नव्हती; परंतु शाळेत असायचो तेव्हा आम्ही सगळ्या वर्गातल्या मुली एकत्र एकमेकांसोबत राहण्याची, एकत्र खेळण्याची, एकत्र खाण्यापिण्याची पद्धत चालत आली होती.
थोडसे मोठे झाल्यावर म्हणजे आठवी-नववीत गेल्यावर कळू लागलं की आपल्याला सगळ्याच वर्गातल्या मुली आवडत नाहीत. काही आवडतात किंवा सोसायटीत खेळताना सगळ्या मुलींबरोबर आपले पटतेच असेही नाही. काहींबरोबर खूप छान जमते आणि मग कळले की ज्यांच्याबरोबर आपल्याला डबा खाताना, खेळताना गप्पा मारताना आनंद होतो त्या आपल्या मैत्रिणी. बाकी मग अशाच!
कॉलेजमध्ये असताना मात्र ‘मैत्री’ ही संकल्पना व्यवस्थित कळली. त्या वयात खऱ्या अर्थाने मैत्रिणींची गरज भासू लागली होती. आपल्या वाढदिवसाला कोणीतरी घट्ट मिठी मारून ‘हॅपी बर्थडे’ म्हणतो तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो हे लक्षात येऊ लागले होते. आपल्याला कुठे जायचे असेल, तर आपली मैत्रीण तासंनतास आपली वाट पाहते, हे लक्षात येऊ लागले होते. तिच्याशी बोलल्याशिवाय आपला दिवस चांगला जात नाही हे लक्षात येऊ लागले होते. आणखीही काही गोष्टी आणि तेव्हा मैत्री या शब्दाची खरी व्याख्या लक्षात आली!
आणखी मोठे झाल्यावर म्हणजे कॉलेज शिक्षण संपल्यावर घरामध्ये येता-जाता ओरडणारी आई किंवा मारणारे बाबा वेगळेच वागू लागले हे लक्षात येऊ लागले. म्हणजे आई अगदी खांद्यावर हात ठेवून ‘चल, आपण फेरफटका मारायला जाऊ या.’ किंवा बाजारात गेल्यावर, ‘काय गं राणी, कोणती भाजी विकत घेऊ?’ अशी विचारायला लागली. मला तर आठवतंय की आई मी दहावी-बारावीत असताना तासंनतास लायब्ररीतून वाचायला आणलेले कोणतेतरी पुस्तक घेऊन बाजूला बसायची. तिचे डोळे अर्धवट मिटलेले असायचे. मग ती बसून का राहायची? तर रात्री कोणती मैत्रीण सोबत असणार म्हणा? म्हणून तीच आमची मैत्रीण व्हायची आणि आम्हाला सोबत करायची! बाबासुद्धा पैसे देऊन ‘तुझ्या आवडीच्या वस्तू आण’, असे सांगू लागले किंवा दुकानात गेल्यावर ‘तुला आवडलाय ना हा ड्रेस मग घे तो, तुला नसेल आवडला तर नको घेऊस.’ असे म्हणू लागले होते. अशा तऱ्हेने आई-वडील अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागू लागल्याचे लक्षात आले. लहान-मोठ्या गोष्टीत आपली मतं लादण्याचे त्यांनी कमी केल्याचे लक्षात आले. आमच्यातले हे मैत्रीचं नाते निर्माण झाल्यामुळे शत्रू वाटणारे आई-वडील जवळचे वाटू लागले.
नोकरीला लागल्यावर तर वेगळ्याच मैत्रिणींची त्यात भर पडली. इथे शाळा-कॉलेजमध्ये समवयस्क मैत्रिणी होत्या; परंतु इथे आपल्यापेक्षा बारा-पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या मैत्रिणी मिळाल्या. हळूहळू दहा-पंधरा वर्षे माझी नोकरी झाल्यावर माझ्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी लहान असलेल्या मैत्रिणीही मिळाल्या. सांगायची गंमत म्हणजे तीन पिढ्यांच्या आम्ही मैत्रिणी तरीही आमच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली. मग कोणता सिनेमा पाहायचा असो, पाणीपुरी खायची असो नाहीतर एखादी वैचारिक भूमिका घ्यायची असो. बऱ्याचदा आमच्यात एकमत व्हायचे!
अलीकडे सहलीच्या निमित्ताने भारतात आणि विदेशातही फिरायला सुरुवात केली आहे. अशा वेळेस तर चार पिढ्यांच्या लोकांबरोबर एकत्रितपणे प्रवास करावा लागतो. तरीही एकत्र प्रवासात सगळ्यांशी अशी काही मैत्री झाली की आम्ही सर्व एकत्र येऊन परत वेगवेगळ्या भागांत प्रवास करू लागलो. अशाच एका प्रवासात माझी रूम पार्टनर अमेरिकेत राहणारी होती. अगदी एकमेकांच्या घरी जाऊन मुक्काम करावा इतकी गाढ मैत्री आमच्यात झाली. चित्रपटसृष्टीला कोणतेही विषय वर्ज नाही. त्यामुळे ‘मैत्री’ या विषयावरचे अनेक चित्रपट मला आज आठवत आहेत. अगदी अलीकडच्या काळातलं ‘दोस्ती’ चित्रपटातील ‘जिंदगी जिंदगी...’ हे गाणं, ‘धडाकेबाज’ चित्रपटातील ‘ही दोस्ती तुटायची नाय...’, ज्या चित्रपटाने इतिहास घडवला त्या शोले चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे...’ किंवा ‘छिछोरे’ चित्रपटातील ‘वो दिन भी क्या दिन थे’ ही सगळी गाणी वर्षानुवर्ष शाळा कॉलेजमधील मुलं एकत्र भेटली की हमखास गातात आणि ती गात असताना त्यांच्या डोळ्यांसमोर चित्रपटातील दृश्य नव्हे, तर आपण एकमेकांसोबत घालवलेले दिवस तरळतात. ‘मैत्री’ या विषयावर कितीही लिहिले तरी कमीच!
खरी मैत्री काय असते हे मी माझ्या एका कथेतून दाखवून दिलेले आहे. या मैत्रीखातर एक जण आपली किडनी देऊन दुसऱ्याला जीवनदान देतो, असे दाखवले आहे. चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये जर मित्र-मैत्रिणी नसतील तर...? हा विचारसुद्धा हादरवून टाकणार आहे. मैत्री माणसाला खूप काही देऊन जाते आणि म्हणूनच प्रत्येकाची मैत्री टिकून राहू अशी अपेक्षा या ‘मैत्रीदिना’च्या दिवशी व्यक्त करते आणि ‘सलामत रहे दोस्ताना हमारा...’ अशी प्रार्थना माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीसाठी म्हणजे ‘रजनी कुलकर्णी’साठी व्यक्त करते!