Saturday, August 2, 2025

हजरजबाबीपणा हवा !

हजरजबाबीपणा हवा !

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


नेमकेची बोलावे |
तत्काळची प्रतिवचन द्यावे |
कदापी रागासी न यावे |
क्षमारूपे |
- दासबोध


मुखदुर्बळ असणे, घुम्यासारखे दुसऱ्याचे बोलणे ऐकून घेणे हे आजच्या युगात परवडण्यासारखे नाही. माणसाकडे बोलण्याचे चातुर्य असले पाहिजे. “बोलणाऱ्याची टरफले विकली जातात, पण न बोलणाऱ्याचे शेंगदाणे पडून राहतात” अशी एक म्हण आहे. याचा अर्थ आपण रागारागाने किंवा तावातावाने बोलावे असं नाही, पण कोणी आपला अपमान केल्यास किंवा उपमर्द केल्यास आपण तत्काळ आपली बाजू मांडली पाहिजे. “प्रसंगी सामर्थ्य चुकू नये” असे समर्थ म्हणतात.


वेळ निघून गेल्यावर मनात झुरत राहणे किंवा आपण असे बोलायला पाहिजे होते, असा विचार करीत बसणे हे दुबळ्या मनाचे लक्षण आहे. यातून न्यूनगंड बळावतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास खुंटतो, विद्यार्थ्याने हजरजबाबी असले पाहिजे, त्याची बुद्धी तल्लख असायला हवी.


जगप्रसिद्ध फलंदाज सुनील गावसकर पाकिस्तानला गेले होते. तेथे त्याला पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका नुरजहा भेटली नूरजहाला गावसकरची ओळख करून देताना इम्रान खान म्हणाला-आप है सुनील गावसकर क्रिकेट की जगत का एक चमत्कार. त्यावर नूरजहान खवचटपणे म्हणाली-क्रिकेट की दुनिया का मै एक ही चमत्कार जानती हुं और वो है इम्रान खान. त्यानंतर इमरानने गावसकरला नुरजहाची ओळख करून देताना इम्रान खान म्हणाला आप है प्रसिद्ध गायिका नुरजहा संगीत की दुनिया का चमत्कार. त्यावर गावसकर तत्काळ म्हणाले संगीत की दुनिया का मै एकही चमत्कार जानता हुं और वो है लता मंगेशकरजी.


आजच्या युगात प्रत्येकाचे बोलणे आपण निमुटपणे ऐकून घेत राहिलो, तर आपला निभाव लागणार नाही. आचार्य अत्रे हजरजबाबीपणाबद्दल प्रसिद्ध होते. एकदा दैनिक मराठा कार्यालयासमोर एक गाढव मरून पडले होते. सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना फोन केला व रागाने म्हणाले- “तुम्हा लोकांचे लक्ष आहे की नाही इथे दोन दिवस झाले एक गाढव मरून पडले आहे” त्यावर संतापून अधिकाऱ्याने विचारले तुमच्या घरासमोर गाढव मेले आहे हे तुम्ही मला कशाला सांगताय? त्यावर आचार्य अत्रे शांतपणे म्हणाले कोणी गेले की त्याच्या नातेवाइकांना कळवावे अशी आपल्याकडे पद्धत आहे. तो फोन आचार्य अत्रेंचा आहे हे कळताच त्या अधिकाऱ्याने ते गाढव तेथून लगेच हलवले.


तात्पर्य माणसाने भांडकुदळ नसावे, पण मुखदुर्बलही नसावे.
“हजरजबाबीपणा म्हणजेच प्रसंगानुरूप तत्काळ, समंजस आणि प्रभावी उत्तर देण्याची कला!”


जगात यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान, कष्ट आणि हुशारी पुरेसे नाही; प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
हजरजबाबी माणूस कोणत्याही कठीण प्रसंगी स्वतःला योग्य रीतीने सावरू शकतो. यामुळे त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि आकर्षण येते.


उदाहरण १: स्वामी विवेकानंद
शिकागोमध्ये धर्मसंसदेत बोलताना सर्व वक्ते आपल्या धर्माचे गुणगान करत होते; परंतु स्वामी विवेकानंद यांनी “My dear sisters and brothers of America” या शब्दांनी सुरुवात केली.


हे ऐकताच श्रोते टाळ्यांच्या कडकडाटांत उभे राहिले. हीच होती त्यांची हजरजबाबी आणि प्रभावी सुरुवात. त्यांनी कोणतीही प्रतिकूलता न घेता आपले विचार संयमाने आणि आत्मविश्वासाने मांडले.


उदाहरण २ : बिरबल आणि बादशहा अकबर
एकदा बादशहाने बिरबलला विचारले, “बिरबल, तू रोज दरबारात इतका हुशार उत्तर देतोस, पण जर एक दिवस मी तुला बोलूही दिलं नाही तर?”
बिरबल हसून म्हणाला, “महाराज, मग त्या दिवशी मी तुमचं ऐकून शिकेन!”
किती सुंदर उत्तर-ना विरोध, ना घाबरटपणा. हजरजबाबीपणा म्हणजेच अशी समजूतदार, प्रसंगाला साजेशी प्रतिक्रिया.
हजरजबाबीपणा ही फक्त बुद्धीची नव्हे तर अनुभव, आत्मविश्वास आणि मन:शांतीची देणगी आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात, मुलाखती असोत, व्यासपीठावरची भाषणे असोत की दैनंदिन जीवन -हजरजबाबीपणाच आपल्याला वेगळी ओळख देतो.
परंतु प्रमाणाच्या बाहेर टोमणे मारण्यातील हजरजबाबीपणा केव्हाही योग्य नाही. सध्या आपल्याला दूरदर्शनवर पक्षाच्या भांडणात दिसून येतो. अशामुळे आपलेच हसे होते.

Comments
Add Comment