Saturday, August 2, 2025

रांगोळीचे किमयागार

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर


गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक पण आतून हळुवार...
कवी मंगेश पाडगांवकर, लेखक आरती प्रभू, क्रिकेटपटू सुनील गावसकर, रांगोळीकार गुणवंत मांजरेकर, चित्रकार अरुण दाभोळकर हे सगळे वेंगुर्ल्याचे सुपुत्र होत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण, डॉ. फारूक अब्दुल्ला, एन. टी. रामाराव, राज ठाकरे यांच्या मातोश्री गुणवंत मांजरेकर यांच्या लक्षवेधी रांगोळ्यांनी भिन्न विचारसरणीच्या या व्यक्तींच्या हृदयात स्थान मिळविले आहे. आईने दाराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांपासून ते रांगोळ्यांची प्रदर्शने, असा गुणवंत यांचा कलाप्रवास. १९७०-८० च्या दशकात त्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्यांच्या चर्चा प्रचंड गाजल्या होत्या. आचार्य अत्रे यांनी गुणवंत मांजरेकर यांच्या रांगोळ्या पाहून त्यांना ‘रंगावली सम्राट’ ही पदवी बहाल केली होती आणि तेव्हापासून लोक गुणवंत मांजरेकर यांना ‘रंगावली सम्राट’ किंवा ‘रांगोळी सम्राट’ म्हणूनच ओळखू लागले. मांजरेकर यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक रांगोळ्या काढल्या. त्यांत छत्रपती शिवाजी महाराज, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, त्याकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या त्यांनी काढलेल्या रांगोळ्या विशेष गाजल्या. त्यांच्या या रांगोळ्या दुरून पाहिल्या, तर त्या जमिनीवर कुंचला घेऊन काढलेली चित्रेच भासतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी काढलेल्या रांगोळ्यांची प्रदर्शने भरली होती.


गुणवंत मांजरेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात झाला. कलेचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले. त्यांचे वडील चित्रकार होते. त्यामुळे वडिलांची चित्रं काढण्याची कला त्यांनीही आत्मसात केली होती. गुणवंत मांजरेकर यांनी त्यांच्या लहानपणापासूनच अनेक चित्रे रेखाटली. ती चित्रे लोकांच्या पसंतीसही पडली. पण, त्यांना खरी ओळख मिळवून दिली, ती रांगोळीने! गुणवंत यांची आईसुद्धा घराबाहेर रांगोळी काढायची. ती रांगोळी पाहून आपणही अशी रांगोळी काढू शकतो, असे गुणवंत यांना मनोमन वाटले आणि मग रांगोळीच्या रंगात ते पुरते रंगून गेले. चित्रकला अवगत असल्यामुळे त्यांना रांगोळी काढणे फारसे कठीण गेले नसावे. त्यांची चित्रकला आणि रांगोळी कला इतकी एकरूप झाली की, त्यांच्या रांगोळीमधून जिवंत चित्रे आकार घेऊ लागली.


वेंगुर्ला या निसर्गरम्य गावात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या आई-वडिलांच्या पोटी गुणवंत मांजरेकर यांचा जन्म झाला. मांजरेकर यांचे अनुभव ऐकताना समोरच्या व्यक्तीला ते सहज आपलेसे करून टाकतात. तल्लख बुद्धी आणि जुन्या आठवणींचा संग्रह म्हणजे गुणवंत मांजरेकर. त्यांना कलेचा वारसा आईकडून आला, त्यांची आई शेतावर मजुरी करायची. सकाळीच उठून घर, अंगण शेणाने सारवायची आणि तुळशी वृंदावनाच्या सभोवताली रांगोळी काढायची. यापासूनच त्यांना बाळकडू मिळाले. दिवसभर ते घरी एकटे असायचे. विरंगुळा म्हणून ते दिवसभर आईने घातलेल्या रांगोळीसारखी रांगोळी अंगणात काढायचे. याच विरंगुळ्याचे कालांतराने कलेमध्ये रूपांतर झाले.
वेंगुर्ल्याच्या पाटकर विद्यालयामध्ये शिकत असताना मांजरेकरांचे १५ ऑगस्ट १९४७ रोजी पहिले रांगोळी प्रदर्शन भरविले होते. यानंतर दुसरे प्रदर्शन १९५१ मध्ये मुंबईमध्ये परळच्या सोशल सर्व्हिस लीगच्या हॉलमध्ये भरवले होते. आमदार पी. के. सावंत यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते झाले होते. यानंतर आजपर्यंत देशभरात मांजरेकरांनी सुमारे ५५० प्रदर्शने भरविली.


चित्रकार, छायाचित्रकार आदी कलाकारांना पैसा आणि मानसन्मान मिळतो, तसा तो रांगोळी कलाप्रकाराच्या वाट्याला येत नाही. पण प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजता येत नाही. दुर्दैवाने आजही ‘रांगोळी’ला कला आविष्कार म्हणून मान मिळालेला नाही. रांगोळी काढण्याला आजही सरकार दरबारी कलेचा दर्जा मिळालेला नाही. ‘रांगोळी’ला कलेचा दर्जा मिळावा म्हणून लढत नाही, तर मुळात रांगोळी ही कला जिवंत राहावी यासाठी धडपडत आहे असे त्यांचे म्हणणे असायचे.


भारत पेट्रोलियम या कंपनीत ते मुख्य देखभाल अधिकारी म्हणून नोकरी करीत होते. अनेक वेळा आयोजक न मिळाल्यामुळे ते स्वखर्चाने रांगोळी प्रदर्शन भरवत असत. लोकांचा प्रतिसाद पाहून हुरूप यायचा. तसेच प्रदर्शनादरम्यान आलेले अनुभव मनाला सुखावून जायचे. गणेशोत्सवाच्या काळात लालबाग, परळ परिसरात भाविकांची गर्दी लोटते, तशीच गर्दी दिवाळीत त्यांच्या रांगोळी प्रदर्शनास व्हायची. मांजरेकरांनी दादरच्या भंडारी हॉलमध्ये १९६४ मध्ये रांगोळी प्रदर्शन भरविले होते. लोकांची भली मोठी रांग अगदी रस्त्यावर पोहोचली होती. हॉलच्या गॅलरीतून ही रांग पाहात असताना एक व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसोबत रांगेत उभी असलेली त्यांना दिसली. त्यांनी तत्काळ स्वयंसेवकांस पाठवून त्यांना वर बोलावले. ती व्यक्ती म्हणजे दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे होते. ‘मार्मिक’ व्यंगचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यानंतर काही दिवसांनी बाळासाहेबांनी मांजरेकर यांची प्रबोधनकार यांच्याशी भेट घालून दिली.


शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी बाळासाहेबांनी त्यांना आवर्जून बोलावून घेतले होते; परंतु त्यावेळी ते जाऊ शकले नाहीत. दादरला एका विवाह सोहळ्यामध्ये एक महिला त्यांना भेटली. तिने तोंड भरून माझ्या रांगोळीची प्रशंसा केली. इतकेच नव्हे तर दरवर्षी आपल्या रांगोळीच्या प्रदर्शनाला आम्ही आवर्जून भेट देतो, अशी कौतुकाची पावतीच मला देऊन टाकली. या महिलेला मी प्रथमच पाहत होतो. त्यामुळे मी त्यांची चौकशी केली असता त्या उत्तरल्या, मी राज ठाकरे यांची आई.
देशाच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेले शरद पवार यांना मांजरेकरांबद्दल विलक्षण जिव्हाळा आहे. काही आयोजकांसमवेत रांगोळी प्रदर्शनाच्या निमित्ताने ते काश्मीरला जाणार असल्याचे त्यांना कळले. त्यांनी तत्काळ काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मांजरेकरांची माहिती दिली; परंतु आजही या कलेला शासन दरबारी प्रतिष्ठा मिळालेली नाही हे दुर्दैव. यामुळेच तरुण कलाकार या क्षेत्राकडे वळत नाहीत.


(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Comments
Add Comment