Sunday, August 3, 2025

भांडण - बालपणाचे विरजण!

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर


घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा मुलांना आयुष्यभर साथ देते. पण हेच जर घराच्या भिंती रोज कलहाचे, तणावाचे साक्षीदार ठरत असतील तर त्याचा सर्वात जास्त परिणाम मुलांवर होतो. पालकांमधील सततचे भांडण केवळ त्या क्षणापुरते अस्वस्थ करणारे नसते, तर ते मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासावर खोल परिणाम करणारे असते.


आई-वडिलांचे भांडण मुलांमध्ये नकारात्मक परिणाम दाखवू शकते. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य, वर्तन आणि सामाजिक वाढ धोक्यात येऊ शकते. मुले जर घरात लहानपणापासून भांडणं पाहत असतील तर ती आक्रमक, अस्वस्थ होऊ शकतात व ती सक्षम नाती तयार करण्यात कमी पडू शकतात.


मुलं ही स्वतःचा विचार करणं शिकण्याच्या अगोदर, जे काही पाहतात-ऐकतात त्यावरून शिकत असतात. घरात जर सतत वडील आणि आईमध्ये ओरडा-ओरड, परस्पर दोषारोप आणि कधी-कधी शारीरिक हिंसाही होत असेल, तर मूल त्यालाच “नॉर्मल” समजतं.


एका मानसोपचार तज्ज्ञांच्या केस स्टडीमध्ये असं आढळून आलं की, सात वर्षांच्या मोहनला सतत रागाच्या झटक्यांचे आणि हिंसक वर्तनाचे टोकाचे झुकाव दिसून येत होते. चौकशी केली असता समजले की, त्याच्या घरात रोज वडील आईवर ओरडत असतात, अनेकदा सामान फेकून देतात. मोहनला हे सर्व पाहून सतत एक असुरक्षितता वाटत होती. त्याने ही अस्वस्थता शाळेत इतर मुलांना मारून, आपल्याला दुखापत करून व्यक्त केली. मानसोपचारतज्ज्ञांच्या सत्रांनंतर हे लक्षात आलं की, त्याच्या आजूबाजूचं वातावरणच त्याच्या मानसिकतेसाठी घातक ठरत होतं.


भांडणांमध्ये वडील किंवा आई जर मुलासमोर दुसऱ्या जोडीदाराला अपशब्द वापरत असतील, अपमान करत असतील, तर मूल गोंधळतं. कारण ते दोघेही त्याच्यासाठी “आई” आणि “बाबा” असतात. या द्वंद्वात त्याचे भावनिक संतुलन डगमगते. सतत कलहात राहणाऱ्या घरांतील मुलांमध्ये “माझ्यात काहीच चांगलं नाही”, “माझ्यामुळे घरात भांडण होतात” अशा भावना खोलवर रुजतात. मुलंही स्वतःची किंमत कमी समजू लागतात.


दहावीत शिकणारी ममता ही अभ्यासात हुशार होती, पण शाळेतील स्नेहसंमेलनात सहभागी होण्याचं तिला कधीच धाडस झालं नाही. तिच्या शिक्षकांनी लक्ष दिलं आणि समुपदेशन केलं तेव्हा ती रडत म्हणाली, “मी काही केलं, तरी आई-बाबांचं भांडण थांबत नाही. मला वाटतं, मीच त्यांचं आयुष्य खराब केलं. त्यामुळे मला उत्साही वाटत नाही.” ही भावना म्हणजे आत्मसन्मानाच्या मुळांवर घातलेली कुऱ्हाड असते. आई-बाबांचं एकमेकांवर असलेलं द्वेषपूर्ण वागणं मुलांना स्वतःबद्दल चुकीच्या समजुती देतं-आपण नको असलेल्या घरात जन्मलोय, ही भावना एक मूल घेऊन वाढणं हे त्या मुलावर अन्यायच आहे.


आई-वडिलांच्या भांडणामुळे लहान मुले नेहमीपेक्षा त्यांना जास्त चिकटून राहू शकतात, तर किशोरवयीन मुले तीव्र दुःख किंवा राग दाखवू शकतात. यापैकी अनेक प्रतिक्रिया थोड्याच काळासाठी राहतात आणि तणावपूर्ण घटनांवरील सामान्य प्रतिक्रिया असतात. जर या प्रतिक्रिया दीर्घकाळ टिकल्या तर तुमच्या मुलाला तज्ज्ञांच्या मदतीची आवश्यकता असू शकते.


घर म्हणजे जिथून आत्मविश्वासाची बीजं पेरली जातात. आई-बाबांमधला सुसंवाद, सहकार्य, निर्णयक्षमतेची उदाहरणं पाहूनच मूल तेच जगाशी वागण्याचं शिकतं. जर सतत किचकिच, एकमेकांवर अविश्वास, बोलणं बंद, धमक्या-हेच वातावरण असेल, तर मुलांना समाजाशी कसे वागावे, याचा गोंधळ होतो. पालकांच्या विचार सरणीची, वागण्या-बोलण्याची व भावनिक प्रतिक्रियांची छाप मुलांच्या मनावर खोलवर बसते.


एका संशोधनानुसार, सतत भांडणाच्या वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये ‘Conflict Avoidance’ ची प्रवृत्ती वाढते, म्हणजे ते कोणत्याही मतभिन्नतेपासून पळ काढतात
किंवा त्याचं दुसरं टोक म्हणजे, ते अत्यंत आक्रमक होतात.


बारावीत शिकणारा अमित सतत मित्रांशी भांडण करायचा, कोणतीही टीका सहन न करता लगेच रागवायचा. त्याच्या पालकांमध्ये रोज मतभेद व्हायचे. त्याच्या मेंदूत “संवाद” म्हणजे “संघर्ष” हा चुकीचा विचार खोलवर रुजला होता. सुदैवाने, मानसोपचारतज्ज्ञ आणि शाळेच्या समुपदेशकांच्या सहाय्याने काही पालक हे समजून घेतात की, भांडणं होणं नैसर्गिक आहे, पण ते समोरासमोर संवादाने सुसंवादात रूपांतरित करता येतं आणि विशेषतः ते मुलांपुढे न करता, वेगळ्या जागी, थोड्या संयमानं केलं तर मूल असुरक्षित होत नाही.


जर एखादे पालक सहनशील, शांत व समजूतदार असतील, तर त्यांचे मूलही सहिष्णू, भावनिक व सामाजिक दृष्ट्या स्थिर असण्याची शक्यता जास्त असते. याउलट, जर पालक नेहमी रागावलेले, कठोर किंवा निष्काळजी असतील, तर मुलांमध्ये असुरक्षितता, रागीटपणा किंवा अतिलाजिरवाणेपणा दिसून येतो.


एका पालक जोडप्याने “परिवार समुपदेशन” घेतलं. त्यानंतर त्यांनी ठरवलं की वाद असले तरी त्याबाबत शांतपणे बोलायचं, एकमेकांवर ओरडायचं नाही आणि मुलांपुढे कोणताही मतभेद मांडायचा नाही. काही महिन्यांनंतर त्यांच्या मुलीच्या संवाद कौशल्यात, आत्मविश्वासात आणि अभ्यासात स्पष्ट सुधारणा दिसून आली. मतभेद होणं हे नैसर्गिक आहे, पण त्यात संवाद हवा-संघर्ष नव्हे. पालक जर सतत टीका, ताण-तणाव किंवा आदेश देत असतील तर तिथे मुलेही दबलेली, गोंधळलेली किंवा बंडखोर होण्याची शक्यता वाढते.


पालकांनी स्वतःची जबाबदारी केवळ पालन-पोषणापुरती न मानता, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावरही काम करणं आवश्यक आहे. मुलांशी संवाद साधा-जर त्यांनी काही विचारलं, तर त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे पण त्यांना दोष न देता बोलणं गरजेचं आहे. समुपदेशन घेण्यास अजिबात संकोच करू नका-ती कधी कधी एक नवीन सुरुवात ठरते. मूलं आरशासारखी असतात. ते आपल्या वर्तनाचं प्रतिबिंब असतात. आपण मुलांना देणं म्हणजे केवळ शाळा, कपडे आणि गॅजेट्स नव्हे, तर त्यांना प्रेम, स्थैर्य, आणि सुरक्षितता देणं अधिक महत्त्वाचं आहे. पालक म्हणून आपल्याला मतभेद असतील, वैयक्तिक निराशा किंवा राग असतील, तरी आपल्या मुलांच्या मनात शंका, भीती, न्यूनगंड पेरण्याचं काम आपण नकळत करू नये-हीच खरी जबाबदारी.


खरं तर मुलांची चांगली वाढ करणं म्हणजे फक्त त्यांच्या शरीराच्या पोषणावर लक्ष देणं इतकंच नसतं, तर त्यांच्या मानसिक वाढीचा आणि पोषणाचा विचार करणंही गरजेचं आहे. एक पालक म्हणून जर तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा सतत वाद होत असेल, तर त्याचे परिणाम तुमच्या मुलांवरही होतात. हे परिणाम किती नकारात्मक आणि गंभीर असू शकतात, ते आता आपण पाहणार आहोत.


Comments
Add Comment