Thursday, October 23, 2025
Happy Diwali

प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

प्रवीण ठाकूर यांचा  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

रायगडमध्ये काँग्रेसला मोठा झटका

अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात काँग्रेसला गळती लागल्याचे म्हटले जात आहे. मागील काही महिन्यांपासून काँग्रेसचे नेते, पदाधिकारी पक्षातून बाहेर पडत आहेत. रायगड जिल्ह्यातही दिवंगत काँग्रेस नेते मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रवीण ठाकूर यांनी अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अलिबाग येथे प्रवीण ठाकूर यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसमध्ये प्रवीण ठाकूर नाराज होते. माझ्या वडिलांवर, मधुकर ठाकूर यांच्यावर पक्षाने अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला होता. काँग्रेस पक्षाकडून जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे ठरवले आहे अशी माहिती प्रवीण ठाकूर यांनी दिली. अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या रायगड दौरा शनिवारी होता. माणगाव येथे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंगचा नामकरण व उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘माणगाव भूमीत, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची एक अद्यावत अशी नर्सिंग कॉलेजची इमारत उभी झाली, आणि त्या इमारतीचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षणाचे दालन उभे झाले आहे ही आनंदाची बाब आहे. येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान कसे मिळेल ते पाहावे, या नर्सिंग कॉलेजला खासदार सुनील तटकरे यांच्या आईचे नाव दिले आहे, त्यांच्या आईच्या नावाला साजेसे काम येथून व्हावे’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment