सुखावणारा ऋतुगंध

  111

तुझी माझी पहिली भेट म्हणजे
मृद्गंधाचे अनमोल दरवळते अत्तर
नाते तुझे नी माझे हृदयस्थ सुंदर
बहरत राहते माझ्या मनी निरंतर...


ग्रीष्माच्या धगीत पोळणारी धरित्री, मलूल झालेली हिरवाई, थांबलेला वारा आणि वर तप्त आग ओकणारा सूर्य आणि निरभ्र चकचकीत आकाश... आणि हे सगळे बदलणारा तो जादूई प्रहर येतोच... कुठून कसे कोण जाणे पण भराभर काळ्या मेघांचे सैन्य आभाळात दाखल होते. वीज या मेघांवर आसूड ओढते... जोरात नगारा घुमू लागतो. वारा उन्मादात चहुबाजूंनी सैरावैरा धावू लागतो. झाडांचे नृत्य सुरू होते आणि मग टिपीर तालात टपोर पाण्याच्या थेंबमाळा धरतीला भेटण्यासाठी आवेगाने येतात. मातीला त्यांचा स्पर्श होताच मृद्गंध उधळतो. हा पहिला दरवळ आपले अवघे तनमन वेढणारा असतो. ही वर्षा ऋतूची गंधाळ अवर्णनीय पहिली भेट असते.


मातीच्या सुपीक कुशीत बीज रुजते. हिरवाई चहू बाजूंनी बहरून येते. फुलांचा, धान्याचा (भुईमूग, चवळी, मूग इत्यादी.) ओल्या गवताचा, रान फुलांचाही ओलसर गंध मनात भरून राहतो. वर्षा ऋतूतला सगळ्यात गंधित महिना म्हणजे श्रावण. पारिजातकाच्या सुगंधी दरवळात वेढून राहणारा. केवडा, चाफा, कण्हेर, जास्वंद, कोरंटी, गुलबक्षी, गणेश वेल किती किती रंगांची आणि गंधाची उधळण करणारा हाच ऋतू असतो. कोवळ्या किरणांचा सोनरंग सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्याला खिळवून ठेवतो.


याच महिन्यात श्रावण सोमवार. हिरवी बिल्व दले, कापूर, धूप दरवळ प्रसन्नता वाढविणारे, मंगळागौर, श्रावण शुक्रवार, शनिवार, सोमवार अनेक सणांना पुरणाच्या आरत्या आणि साग्रसंगीत नैवेद्याचे ताट यांचा सुवास रसना चेताविणारा असतो.


भाद्रपद महिन्यात गौरी-गणपती, अनेक सुगंधी फुले, दुर्वा, मोदक, पंचखाद्य किती किती तरी दरवळ मन गुंतवून ठेवणारे असतात.
अश्विन महिन्यात झेंडू, शेवंती, सूर्यफूल इत्यादी रसरसून फुलतात. धान्याची कणसे डोलू लागतात. नवरात्र, दसरा सगळेच तृप्त सुंदर गंधात भरलेले असतात.
पावसाळा हा ऋतू सगळ्यांना सुखावणारा ऋतू आहे. कारण तो धरतीला तृप्त गंधित करतो. आकाशातले, निसर्गातले फळा-फुलांचे, भाज्यांचे अनेक रंग गंध मनाचा ठाव घेतात ते याच ऋतूत. समृद्धीबरोबर समाधान आणि सौंदर्य देतो. हे सगळे लक्षात ठेवून आपण पर्यावरण सांभाळले तर ना तो रुसणार किंवा ना अति बरसणार. छान सलग टपोरे थेंब घेऊन येईल आणि तृप्त करून जाईल. हो नां?
शेवटी कोणतेही नाते असो दोन्ही बाजूंनी काळजी घेतली, समजून घेतले तरच ते फुलते.
म्हणूनच पावसाला असे सांगावे वाटते.


ओढ लागावी तुझ्या वेळेवर येण्याची
पण पर्यावरणाची काळजी आम्हीं
घ्यायला हवी
तरच वर्षाऋतू गंधाळत राहील
मनभर त्याची विविध तालात
बरसेल नित थेंबमाळ नवी.


 
Comments
Add Comment

ध्यास मराठीतून शिकण्याचा

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर मी १३ वीत असताना आमच्या कोकजे सरांनी नेरळ येथील वेगवेगळ्या शाळांची ओळख करून दिली.

हरवलेलं माणूसपण

मोरपीस: पूजा काळे स्वामी तुम्ही पाहताय ना! काळ सोकावलायं, माणसातील माणूसपण हरवत चाललयं! देवळाबाहेरच्या परिसरात

शेतकरी बांधवांना वरदान ठरणारी 'सब्जी कोठी'

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे रक्षाबंधन हा बहीण-भावांच्या नात्याचा उत्सव. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून ती त्यास

सण आयलाय गो...

उदय खोत नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी दर्याराजाची पूजा करून नारळ अर्पण करून

हसरी शंभरी...

चारुहास पंडित : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्देवीण संवाद साधणारे ज्येष्ठ

सखी झाल्या उद्योजिका

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे मैत्री ही या जगातली एक सुंदर गोष्ट आहे. निखळ मैत्रीमुळे आयुष्य समृद्ध होतं. अशाच त्या