
लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल
विरार : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी यांच्याकडे ‘ईडी’कडून जप्त करण्यात आलेल्या अवैध मालमत्तेबाबत ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामाच्या तक्रारीनंतर मीरा-भाईंदर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासाच्या आधारे अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने सुद्धा याच प्रकरणात कारवाई सुरू केलेली आहे. आरक्षित जमिनीवर ४१ इमारती बांधणे आणि अवैधरीत्या विक्री करणे, याबाबत ईडीकडून सर्वप्रथम सीताराम गुप्ता आणि दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच वसई विरार महापालिकेचे उपसंचालक नगर रचनाकार वाय. एस. रेड्डी यांच्या वसई, मुंबई आणि हैदराबाद येथील निवासस्थानी १४ आणि १५ मे रोजी छापे टाकण्यात आले.
या कारवाईत रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरातून २३ कोटी २५ लाख ५० हजार ९०० रुपयाचे सोने आणि हिरेजडित दागिने, ८ कोटी ३ लाख १२ हजार रोख, १९ लाख ९५ हजार रोख अशाप्रकारे एकूण ३१ कोटी ४८ लाख ५७ हजार ९०० रुपयाचे घबाड जप्त करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आर्किटेक, अभियंता, एजंट यांच्याकडील दस्तावेज, मोबाइल, लॅपटॉप जप्त करण्यासोबतच त्यांच्या बँक व म्युच्युअल फंडच्या खात्यातील बारा कोटींहून अधिकची रक्कम गोठविण्याची कारवाई जुलैच्या पहिल्या आठवड्यात ईडीने केली आहे.
त्यानंतर पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसई येथील शासकीय निवासस्थानी छापा टाकल्यानंतर आता याच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी १ ऑगस्ट रोजी आचोळे पोलीस ठाण्यात वाय. एस. रेड्डी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ज्ञात उत्पन्नापेक्षा गैरमार्गाने जास्त मालमत्ता जमविल्या प्रकरणी रेड्डी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आणखी मोठे घबाड हाती लागणार?
वाय. एस. रेड्डी यांच्या घरातून रोख व दागिने मिळून जवळपास ३२ कोटी जप्त करण्यात आले आहेत. ईडीच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली तेव्हाच, रेड्डी यांच्याकडे अवैध मार्गाने जमवलेली बरीच ‘माया’ असून जप्त झालेली रक्कम खूप कमी असल्याच्या चर्चा पालिकेत रंगल्या होत्या.
ईडीने आपल्या तपासात रेड्डी यांना बांधकामास परवानगी देण्यासाठी प्रति चौरस फूट दहा रुपये याप्रमाणे लाच मिळत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका क्षेत्रात झालेली वैध, अवैध इमारतींच्या कामाचा ‘हिशोब’ही आता होणार आहे. ईडी सोबतच लाचलुचपत विभागाकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याने, रेड्डी आणि त्यांच्या ‘टीम’कडून आणखी मोठे घबाड तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.