Saturday, August 2, 2025

विजय माणुसकीचा

विजय माणुसकीचा

कथा : रमेश तांबे


आराधना स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बालमित्र क्रीडा मंडळ असा क्रिकेटचा सामना अगदीच रंगतदार अवस्थेत पोहोचला होता. मर्यादित षटकांच्या सामन्यात दहा षटकात बालमित्र मंडळाने अकराच्या सरासरीने एकशे दहा धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे एक मोठेच आव्हान आराधना संघासमोर उभे होते. त्यात सुरुवातीचे तीन गडी त्यांनी केवळ पंचवीस धावातच गमावले होते. त्यामुळे हा सामना बालमित्र मंडळ सहज जिंकेल अशी अटकळ प्रेक्षकांनी मनात बांधली होती.


समुद्राच्या कडेला वसलेले हे छोटेखानी मैदान तसे खेळण्याच्या योग्यतेचे मुळीच नव्हते. मैदानातली जमीन दगड-धोंड्यांनी खाचखळग्यांनी परिपूर्ण होती. दोन मोठी झाडे मैदानात दिमाखात उभी होती. तरी प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा उत्साह मात्र त्याने कमी होत नव्हता. प्रत्येक सामन्याला अशीच तुफान गर्दी व्हायची. प्रत्येक संघाचे पाठीराखे ढोल-ताशे घेऊनच सामना बघायला यायचे. प्रत्येक धावेला, चौकार- षटकारला ढोल-ताशांचा गजर व्हायचा आणि पाठीराख्यांच्या उत्साहाला उधाण यायचे.


आराधना स्पोर्ट्स क्लब आणि बालमित्र क्रीडा मंडळ हे तसे तुल्यबळ संघ होते, पण आजचा दिवस बालमित्र मंडळाचा होता. धावांचा डोंगर उभा करून त्यांनी आराधना संघाचे तब्बल तीन खेळाडू पंचवीस धावातच गारद केले होते. त्यामुळे त्यांचे पाठीराखे उत्साहात, तर आराधना संघाच्या पाठीराख्यांवर निराशेचे ढग दाटून आले होते. आता मैदानात सुशील आणि सुनील ही आराधना संघाची जोडी खेळत होती. दोघेही कसलेले फलंदाज होते. त्यांनी धावफलक हलता ठेवला. पाच षटकात पन्नास धावांची गरज असताना सुशील धावचित झाला अन् पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकला.


आता नवीन खेळाडू विजय आपली बॅट उंचावतच मैदानात उतरला. आल्या आल्या त्याने दोन चौकार ठोकले आणि तिसऱ्याच चेंडूवर झेलबाद झाला. धावफलक पुढे सरकत होता, पण एका बाजूने फलंदाज बाददेखील होत होते. शेवटची दोन षटके उरली असताना बावीस धावांची गरज होती आणि शेवटची जोडी मैदानात खेळत होती. त्यात आराधना संघाचा कसलेला फलंदाज सुनील होताच. त्याच्या सोबतीला गोलंदाजी करणारा विपुल होता. त्यामुळे शेवटची दोन षटके खेळून संघाला विजयी करणे हे सुनीलचे काम होते. त्याने ती जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतलीसुद्धा होती.


नववे षटक सुरू झाले. सुनील फलंदाजी करत होता. आता चेंडू फटकावयाचाच या हेतूने तो फलंदाजी करू लागला. दोन चौकार अन् एक धाव काढून शेवटच्या षटकात खेळण्यासाठी पुन्हा सुनीलच गोलंदाजांसमोर उभा राहिला. आता शेवटच्या षटकात तेरा धावांची गरज होती. सुनीलने एकट्याने संघाला विजयाच्या जवळ आणले होते. त्यामुळे सुनील सुनील असा जयघोष मैदानात सुरू होता. दोन्ही संघाला जिंकण्यासाठी समान संधी होती. म्हणून दोन्हीकडचे ढोल-ताशे जोरजोरात वाजत होते. पाठीराख्यांचा उत्साह अगदी टीपेला पोहोचला होता.


पहिल्या चेंडूवर धाव निघाली नाही. दुसरा चेंडू दूरवर गेला नाही म्हणून सुनीलने धाव घेतलीच नाही. आता शेवटचे चार चेंडू शिल्लक होते. पण त्यानंतर सुनीलने सलग तीन चौकार ठोकून बारा धावा वसूल केल्या. दोन्ही संघ बरोबरीच्या धावसंख्येवर पोहोचले. आता एक चेंडू, एक धाव आणि एक गडी बाद करावयाचा असे समीकरण बनले. दोन्ही संघांना समान संधी होती. पण सुनीलमुळे आराधना संघाचे पारडे थोडेसे त्यांच्या बाजूने झुकले होते. आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजाने धाव घेतली. सुनीलने आपली बॅट जोरात फिरवली पण तो चेंडू सीमारेषेपार जाण्याऐवजी समोर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या डोक्यात बसला आणि तो धपकन खाली पडला. सुनील ती धाव पूर्ण करू शकत होता. सुनील धावला पण धाव पूर्ण करण्यासाठी नाही तर त्या खाली पडलेल्या जखमी खेळाडूला बघण्यासाठी!


त्याने चटकन त्याला उचलले आणि धावतच मैदानाबाहेर आणले. मग संयोजक त्याला दवाखान्यात घेऊन गेले. खरे तर शेवटची धाव पूर्ण करून सुनील आपल्या संघाला विजयी करू शकत होता. तब्बल पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस पटकावू शकत होता.


पण त्याने आपल्या संघाच्या विजयापेक्षाही खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवत ती धावपूर्ण न करता त्या जखमी खेळाडूला मदत केली. खरंच या प्रसंगामुळे मैदानात उपस्थित असलेल्या शेकडो प्रेक्षकांनी सुनीलची वाहवा केली. त्याचे आभार मानले. पण या प्रसंगामुळे हा सामना पुढे कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला.

Comments
Add Comment