हसरी शंभरी...

  12

चारुहास पंडित : प्रसिद्ध व्यंगचित्रकार


आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्देवीण संवाद साधणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी वयाची शंभरी पार केली. त्यांची ही हसरी इनिंग आपल्यासाठी प्रेरक म्हणायला हवी. शंभरीतले शि. द जुन्याबरोबर नवीन काळाशी नाळ जोडून आहेत. रंगरेषांमध्ये हयात घालवणारा हा माणूस आज एआयविषयी जाणून घेताना दिसतो, तेव्हा त्यांच्या तरुण मनाला मानाचा मुजरा करावासा वाटतो. ही ऊर्जा अशीच टिकून राहो.


ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी वयाची शंभरी पूर्ण करत ठोकलेले खणखणीत शतक साजरे करताना प्रत्येक चाहत्यांच्या मनात आनंद उचंबळून येणे स्वाभाविक आहे. यानिमित्ताने त्यांचा सत्कार, कौतुक होत आहे. पण हे सगळे सोहळे केवळ त्यांनी वयाची शंभरी गाठली म्हणून नव्हे, तर सकस हास्यचित्रकार म्हणून गाजवलेल्या कारकिर्दीसाठीही आहे. तेव्हा शंभरी आणि प्रदीर्घ कारकीर्द यांचा सहजसुंदर मिलाफ दाखवणारे हे व्यक्तिमत्त्व असेच आरोग्यसंपन्न राहो, ही कामना सर्वप्रथम कराविशी वाटते. शिदंच्या या शंभर वर्षांच्या आयुष्यात हास्यचित्रकार म्हणून केलेला प्रवास जवळपास ७५ वर्षांचा असून तो मराठी मासिकांच्या मुखपृष्ठांना नवीन वळण देणारा आहे. १९५२ मध्ये त्यांचे हास्यचित्र ‌‘मोहिनी‌’ मासिकाच्या मुखपृष्ठावर आले आणि प्रचंड गाजले, कारण तोपर्यंत दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवर सुंदर ललना वा देवादिकांची चित्रेच येत असल्यामुळे एकप्रकारचे साचलेपण आले होते. असे असताना तेथे एक व्यंगचित्रही येऊ शकते, हे शिदंनी दाखवले. अर्थात हे केवळ त्यांचेच श्रेय नसून ‌‘मोहिनी‌’चे संपादक अनंत अंतरकर यांचेही आहे, पण नंतर सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात सातत्य आणि गुणवत्ता हा खूप महत्त्वपूर्ण भाग राहिलेला दिसतो.


शिदंनी कारकीर्द सुरू केलेला काळ दीनानाथ दलालांच्या कमालीच्या प्रभावाचाही होता. दलालांचे कामच इतके सुंदर होते की, प्रत्येक नवीन चित्रकारावर त्यांचा प्रभाव असायचा. असे असताना त्यातून बाहेर पडत स्वतंत्र शैली निर्माण करण्याचे काम शिदंनी केले. त्यांची हीच शैली आजही ताजी-टवटवीत आहे. ती कालबाह्य झालेली नाही. अर्थात शिदं इथेच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या शैलीच्या मर्यादेतही अनेक प्रयोग केले. म्हणूनच एखादे चित्र शिदंचे आहे हे लगेच ओळखता येतेच, त्याचबरोबर त्यातून वेगळेपणही नजरेने टिपता येते. ग्राफीक अंगाने जाणारी चित्रे काढणे, साधे रंग वापरणे, प्रवाहात राहूनही चित्रांमध्ये वेगळेपण जपणे अशी त्यांच्या कामाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. मात्र हे करताना त्यांनी नेहमीच स्वतंत्र शैली टिकवून ठेवली, हे महत्त्वाचे.


त्यांची चित्रे बघताना नेहमीच एक आल्हाद जाणवतो. कामाचे हेदेखील एक वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांनी तांबडा वा पिवळा असे भडक रंग वापरले तरी डोळ्यांना खूपत नाहीत, कारण आसपास वापरलेल्या रंगांनी निर्माण केलेले वातावरण चित्र आल्हाददायक करते. त्यात कठोरपणा नावालाही राहत नाही. त्यांच्या चित्रातील आकारही साधे आहेत. इंग्रजीतला ‌‘सपलीफाईड‌’ हा चपखल शब्द यासाठी योग्य ठरेल. पण असे असले तरी चित्रातील प्रत्येक आकार आपले म्हणणे ठसठशीतपणे मांडत असतो. तो या अर्थाने की, त्यांनी चितारलेली कोणतीही फिगर ताठ, सरळ उभी असलेली दिसत नाही. त्यात एक लय असते. शिदंच्या चित्रातील ही लयही फार महत्त्वाची वाटते, कारण त्यामुळेच त्यांचे चित्र अत्यंत आकर्षक दिसते. खेरीज एखाद्याने चित्र कसे बघावे, या दृष्टीने त्यांनी चित्रांची मांडणी केलेली दिसते. म्हणजेच मुख्य विषय काय, तो चित्रात कशा पद्धतीने यायला हवा याचा विचार करूनच त्यांनी चित्र काढलेले असते. यामुळेच बघणाऱ्याला ते कसे पाहावे, याची दृष्टी मिळते.


चित्रांची नक्कल करणे, हुबेहुब चित्र साकारणे हे प्रकार या क्षेत्रात अगदी सर्रास घडतात. असे असताना शिदंच्या स्टाईलची कॉपी फारशी दिसत नाही, हेदेखील एक वैशिष्ट्य वा वेगळेपण म्हणावे लागेल. याचे कारण म्हणजे त्यांच्या चित्रांमध्ये असणारा सोपेपणा हेच खूप अवघड काम आहे! शेवटी हास्यचित्र म्हणजे कला आणि कल्पना यांचा संगम असतो. एखाद्याकडे नुसती कला असून उपयोग नसतो. एखाद्याकडे कल्पना आहे पण कला ती पोहोचवू शकत नसल्यास उपयोग नसतो. या दोन्हींचा समतोल साधला जातो तेव्हाच एक सकस कलाकृती तयार होते आणि अनेक वर्षे टिकून राहते. हा समतोल शिदंच्या चित्रांमध्ये पाहायला मिळतो. कल्पनाचित्रांमधून पूर्णपणे उमटलेले दिसते. म्हणूनच त्यांची चित्रे आजही लक्षवेधी ठरतात.


आज ते १०० वर्षांचे आहेत. या वयातही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन जपणे, ही बाब अत्यंत महत्त्वाची म्हणायला हवी. काही वर्षांपूर्वी मंगला गोडबोले यांनी रेडिओसाठी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळचे त्यांचे एक वाक्य फार सुंदर होते. ते म्हणाले होते की, ‌‘प्रसिद्धी, यश याच्या मागे पळण्याची काही आवश्यकता नसते. तुम्ही रमतगमत, कामाचा आनंद घेत गेला तरी ते मिळू शकते...‌’ त्यांचा हा दृष्टिकोन आजच्या पिढीने आत्मसात करायला हवा. व्यंगचित्रकारितेचा रस्ता चित्रकलेच्या माध्यमातून जातो, असेही ते म्हणतात. म्हणजेच चित्रकलेचा पाया भक्कम, मजबूत असेल तर तुम्ही उत्तम व्यंगचित्र साकारू शकता असे त्यांचे सांगणे आहे. तेव्हा चांगली चित्रकला जमत नाही म्हणून एखाद्याने व्यंगचित्रकलेकडे वळणे योग्य नाही, हा विचार समजून घ्यायला हवा. आज वयाच्या या टप्प्यावर शि. द कमी वेळा कुंचला हातात धरतात. पण कमाल ही की, शंभराव्या वर्षीही त्यांचा हात स्थिर आहे. ते चित्र काढू शकतात. अर्थातच आधी उल्लेख केल्याप्रमाणे यामागे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनच कारक आहे, असे म्हणावे लागेल.
शिदंना इतरांबद्दल वाईट बोलताना कधीच कोणी ऐकले नाही. पाठीमागे एखाद्याची टिंगल करणे वा त्याच्याबद्दल नकारात्मक बोलणे असे प्रकार कधीही घडत नाहीत. ते नवीन लोकांचे कौतुक करतात. त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करतात. हे कौतुक अगदी मनापासून असते. मितभाषी असले तरी ते थोडक्यात खूप काही बोलून जातात. त्यांच्या बोलण्यात नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचाच विचार असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते नवीन तंत्रज्ञानाला नाके मुरडत नाहीत. संगणकाचा जमाना सुरू झाला तेव्हा अनेक चित्रकार, व्यंगचित्रकारांनी नाराजी व्यक्त केलेली आपण पाहिली आहे. कागदावर काढलेले चित्र हीच खरी चित्रकला असल्याचे अनेकांनी बोलूनही दाखवले आहे. मात्र शि. द. इथेही वेगळे आहेत. संगणक हे एक टूल असून त्याचा टूल म्हणूनच वापर करा, त्याच्या आहारी जाऊ नका असे ते सांगतात. आज त्यांना एआयबद्दलही उत्सुकता आहे. त्यांनी यासंबंधीची माहिती घेतली आहे. वयाच्या शंभरीमध्ये एआयविषयक एखादा प्रश्न विचारला, तर ते थोडे नक्कीच बोलू शकतील. आपल्या क्षेत्रात त्याचा कसा उपयोग करून घेता येईल, हे सांगतील. ही बाबही अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल, कारण साठी-सत्तरीनंतरच अनेकांचा नवीन गोष्टींबद्दल जाणून घेण्यातला रस संपलेला असतो. मात्र शिदंनी वाढत्या वयातही उत्सुकता, नवे जाणून घेण्याची उर्मी कोमेजू दिलेली नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मानवी मेंदू खूप महत्त्वाचा आहे, असे ते म्हणतात. ‌‘एआय साधन म्हणून वापरा, माध्यम म्हणून वापरू नका‌’ हे वाक्य त्यांच्यातील ऊर्जेची प्रचिती देते. शि. द नावाचे गारुड रसिकांना असेच हसवत, शिकवत राहो. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Comments
Add Comment

सुखावणारा ऋतुगंध

तुझी माझी पहिली भेट म्हणजे मृद्गंधाचे अनमोल दरवळते अत्तर नाते तुझे नी माझे हृदयस्थ सुंदर बहरत राहते माझ्या मनी

सखी झाल्या उद्योजिका

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे मैत्री ही या जगातली एक सुंदर गोष्ट आहे. निखळ मैत्रीमुळे आयुष्य समृद्ध होतं. अशाच त्या

दर्पण झूठ ना बोले...

माेरपीस : पूजा काळे गोल, लंबगोल, चौकोनी, लाकडी, चांदीच्या फ्रेममध्ये बसवलेली, वस्तुस्थिती दर्शवणारी काच वस्तू

मातृत्वातून उद्योजकतेकडे झेप

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्यामुळे लहान बाळाला काहीही झाले की, घरातील

सर्प साक्षरता हवी!

डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक)  शहरीकरणामुळे आणि मानवाच्या अतिक्रमणामुळे सापांचे अस्तित्व धोक्यात आले

जगाचा तोल सावरणारी माणसे

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर व्यक्तिचित्रे हा मराठी साहित्यातील साहित्यप्रकार पु. ल. देशपांडे यांनी उभ्या केलेल्या