
विशेष : लता गुठे
बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होतो. आज सर्वच कलांचे रूप वेगळे भासत असले तरी त्याच्या पाऊलखुणा मात्र मूळ स्वरूपाशी नाते सांगणाऱ्या आहेत. आज आपण शिल्पकलेविषयी सविस्तर माहिती घेताना, प्रथम शिल्पकलेचा अर्थ व व्याप्ती याविषयी जाणून घेणार आहोत.
शिल्पकला ही भारतीय संस्कृतीची अती प्राचीन कला आहे. ही कला अनेक अंगाने व्यापक आणि विविधतेने समृद्ध अशी संस्कृती आहे. शिल्पकलेच्या माध्यमातून भारताने आपल्या धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडविले आहे. या कलेतून भारताच्या संस्कृतीचे प्रतिबिंब उमटवले आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही देशाच्या कानाकोपऱ्यात दिसून येते.
शिल्पकला ही दगड, धातू, लाकूड, माती अशा विविध घटकांपासून बनलेली, मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात साकारलेली कला आहे. शिल्पकलेमध्ये मंदिरे, स्तूप, गुहा, मूर्ती, भिंतीवरील कोरीव कामे, मंदिरावरील खांब, ध्वजस्तंभ, स्मारके इत्यादींचा समावेश होतो. शिल्पकला हे अतिशय आकर्षक व देखण्या स्वरूपात पाहायला मिळते.
भारतीय शिल्पकलेचा इतिहास हा सिंधू संस्कृतीपासून पाहावयास मिळतो. सिंधू संस्कृती (इ. स. पू. २५००-१५००) इतकी जुनी आहे. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील होत कामांमध्ये सापडलेल्या नर्तीकेची मूर्ती ब्राझील धातूपासून बनवलेल्या आढळतात. तसेच पुरुषांच्या योगी मुद्रा, पशुपक्षांच्या छोट्या-छोट्या आकृत्या, या खोदकामामध्ये मिळाल्या. त्या मुद्द्यांचं नैसर्गिक सौंदर्य लक्षवेधी आहे.
जगभरात प्रसिद्ध असलेली बौद्ध शिल्पकला ही पण भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना समजला जाते. त्यामध्ये अशोककालीन स्तुप हे बौद्ध शिल्पकलेचे महत्त्वाचे उदाहरण आहे. अशी स्तुपे सांची, भरहुत, अमरावती येथे आहेत.
स्तुपांच्या तोरणांवरील नक्षीकाम जैन आणि बौद्ध लोककथानकांना अनुसरून चित्रित केलेली आढळतात. तसेच गांधार शैलीत ग्रीक-रोमन शिल्पकलेचा प्रभाव दिसतो, तर मथुरा शैली भारतीय स्वरूपाची आहे. गांधार आणि मथुरा शिल्पशैली लोकप्रिय आहे. तिसऱ्या प्रकारची शिल्पशैली चंद्रगुप्ताच्या काळातील आहे. हा काळ शिल्पकलेचा सुवर्णकाळ मानला जातो. या शिल्पांमध्ये अनेक देव, देवतांच्या तसेच बुद्ध मूर्ती पाहायला मिळतात. यातून सौंदर्य, करुणा व भावनांची अभिव्यक्ती होते. यातील प्रसिद्ध मूर्ती सारनाथ येथील बुद्ध, उज्जैनची लक्ष्मी, अजिंठा-वेरूळ गुहांतील कोरीव शिल्पं आहेत.
दक्षिण भारतामध्ये शिल्पकलेला मोठ्या प्रमाणात चित्रित केलेले दिसते. दक्षिण भारतीय शिल्पकलेत चोल वंशातील कांस्य मूर्ती प्रसिद्ध आहे. आजही जागोजागी दिसणाऱ्या (विशेषतः नटराजाच्या सुंदर रेखीव मूर्ती आपलं लक्ष आकर्षित करून घेतात.) भारतीय शिल्पकलेचे आणखी एक उदाहरण म्हणजे, एरोला येथील कैलास मंदिर. या मंदिरावरील कोरीव काम अतिशय उच्च दर्जाचे आहे. मध्ययुगीन काळातील ही अतिशय लोकप्रिय मंदिरे म्हणजे, खजुराहोचे भव्य मंदिर. मंदिराच्या बाहेरील शिल्पातून कामकलेचे अप्रतिम चित्रण साकार केले आहे. कोणार्कचे सूर्य मंदिर, मधुरा, कांची, भुवनेश्वर येथील मंदिरे – शिल्प सौंदर्याची शिखरं आहेत. महाराष्ट्रातील नाशिकच्या जवळ असलेली पांडव लेणी, एलिफंटा, अजिंठा-वेरूळ, तसेच विविध ठिकाणी डोंगरांमध्ये कोरलेल्या लेण्या सर्वांचे लक्ष आकर्षित करतात.
मुघल आणि इस्लामी कालखंडातील वास्तुशिल्प म्हणजे आग्र्याचा ताजमहाल, हुमायूनचा मकबरा, कुतुबमिनार, दिल्लीचा लाल किल्ला या वास्तूमध्ये असलेल्या कमानी, संगमरवरी दगडामध्ये केलेले कोरीव काम आणि कोरलेल्या जाळ्यांमुळे या वास्तूंना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
आधुनिक भारतात शिल्पकलेचा वापर स्मारक तयार करण्यासाठी केला गेला. यामध्ये शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे, स्वातंत्र्यवीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, गांधीजी यांच्या स्मारकांमध्ये शिल्पकलेचा वापर होतो. सध्याच्या शिल्पकलमध्ये फाइबरग्लास, सिमेंट व आणखी वेगळ्या प्रकारचे मटेरियल वापरून त्यावर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स दिल्याचे पाहायला मिळते.
भारतीय शिल्पकलेची काही वैशिष्ट्ये सांगता येतात ती अशी... बहुतांश शिल्पे धार्मिक प्रेरणेने निर्माण झालेली असल्यामुळे त्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, मूर्तींमध्ये सौंदर्य, करुणा, वीरता यांची स्पष्ट अभिव्यक्ती होते. अशा भावमुद्रांमधून विविध रस प्रगट होतात. या मूर्तीमध्ये अत्यंत बारकाईने व कलात्मक पद्धतीने केलेले कोरीवकाम असते. अशा सूक्ष्मतेमुळे डोळ्यांतून, चेहऱ्यावरून विविध भाव प्रगट होतात. अनेक मूर्तींमधील मुद्रा, हत्यारे, वाहने यांचा सांकेतिक अर्थ त्यातून अधोरेखित होतो. शिल्पकलेतून वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण विकास होत असलेला जाणवतो.
शिल्पकलेचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळतो. हिंदू धर्मातील विविध देवता, अवतार, पुराणकथा यांचे चित्रण शिल्पकलेतून प्रदर्शित होते. बौद्ध धर्मात बुद्धाचे जीवन, जातक कथा, ध्यान मुद्रा दाखवलेल्या असतात. तसेच शिल्पकलेतून सामाजिक जीवनाचे दर्शन होते. तसेच नृत्य, संगीत, युद्ध, प्रेम, ग्रामजीवन, वन्यजीवन यांचे प्रतिबिंब हो म्हटलेले असते.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येते की, भारतीय शिल्पकला ही केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही, तर ती भारतीय जीवनपद्धतीचा आरसा आहे. तिच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन भारताची धार्मिक, सामाजिक, तात्त्विक आणि सांस्कृतिक समज प्राप्त होते. आजही ती आपल्याला अभिमानाची व गौरवाची जाणीव करून देते. भारतीय शिल्पकलेचा अभ्यास म्हणजे भारताच्या आत्म्याचा साक्षात्कारच होय असे म्हटले तर वावगे ठरू नये.