सखी झाल्या उद्योजिका

  14

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे


मैत्री ही या जगातली एक सुंदर गोष्ट आहे. निखळ मैत्रीमुळे आयुष्य समृद्ध होतं. अशाच त्या दोघींच्या मैत्रीने त्यांना यशस्वी उद्योजिका म्हणून घडवले. ही गोष्ट आहे शौरवी मलिक आणि मेघना नारायण यांची, त्यांच्या स्लर्प फार्मची.


लंडनमध्ये एका दिवाळी पार्टीत शौरवी आणि मेघनाची भेट झाली. परदेशात त्यांची मैत्री घट्ट झाली. मेघना बंगळूरुमध्ये वाढली. ती राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू होती. तिला ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी ऱ्होड्स शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर तिने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. पुढे मॅककिन्से या नामांकित कंपनीमध्ये सात वर्षे काम केले. शौरवी नवी दिल्लीत लहानाची मोठी झाली. केंब्रिज विद्यापीठात तिने अर्थशास्त्राचा अभ्यास केला. जेपी मॉर्गनसारख्या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये तिने काम केले. ती लंडनमधील सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन ग्रुपच्या ग्रुप होल्डिंग एंटिटीमध्ये गुंतवणूक व्यवस्थापक देखील होती.


शौरवी आणि मेघना यांच्यामध्ये विविध उद्योजकीय कल्पना यांच्याविषयी नेहमी चर्चा व्हायच्या. मात्र त्या तेवढ्यापुरत्याच असत. या दोघींच्या चर्चेचा अजून एक विषय असायचा तो म्हणजे मुलांचा. दोघींना मुले असल्याने त्यांचे संगोपन करताना येणाऱ्या अडचणी यावर नेहमी चर्चा व्हायची. आपली मुलं अरबट चरबट काहीतरी खात असतात असा तक्रारीचा सूर देखील त्या चर्चेत असे. मुलांनी काय खाल्लं पाहिजे या समस्येवरील उपाय शोधताना त्यांना जो उपाय सापडला त्यातून निर्माण झाला स्लर्प फार्म नावाचा उद्योग.
पालक म्हणून त्यांना मुलांसाठी आवश्यक अशा पौष्टिक खाद्य पर्यायांची कमतरता भासली. ते त्याबद्दल काहीतरी करू इच्छित होते. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांच्या लक्षात आले की बहुतेक सुपरमार्केटच्या शेल्फमध्ये फक्त मुलांसाठी गहू किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ असतात. त्यामध्ये मेद आणि साखरेचे प्रमाण जास्त होते जे अगदी आरोग्यास अपायकारक होते. तेव्हा त्यांनी स्लर्प फार्म सुरू केला. या दोघींना मदत करायला उमंग भट्टाचार्यदेखील आला. फोटोग्राफी, ग्राफिक डिझाइन आणि व्हिडीओ आर्टमध्ये १५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या उमंगने स्लर्प फार्मला विशिष्ट ओळख मिळवून दिली.


त्यांनी पहिल्यांदा मुलांसाठी सेंद्रिय फळे आणि भाज्यांची प्युरी बनवली. मात्र त्यांना खूप कमी मागणी होती. हळूहळू त्यांनी लहान मुलांसाठी निरोगी, चविष्ट आणि झटपट बनवता येईल असा नाश्ता आणि जेवणाचा पर्याय दिला. त्यांच्या उत्पादनात प्रिझर्व्हेटिव्हज, कृत्रिम रंग किंवा फ्लेवर्स, ट्रान्स फॅट्स किंवा स्टेबिलायझर्स अशा आरोग्यास बाधक घटक त्यात सामील नसतात असा त्यांचा दावा आहे.


शौरवी आणि मेघना यांनी प्रत्येक उत्पादन श्रेणीसाठी व्यंजन विकास, व्यावसायिक वाढ आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी तज्ज्ञांची मदत घेतली आहे. “आम्ही विशिष्ट उत्पादने बनवत नाही, आम्ही चांगल्या दर्जाचे घटक वापरतो. उदाहरणार्थ, तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत बाजरीची किंमत प्रति किलो जास्त असते. आमचे खरेदीदार हे दररोजचे पालक आहेत, जे त्यांच्या मुलांसाठी त्रासमुक्त, निरोगी आणि पौष्टिक अन्न उत्पादने शोधत आहेत. त्यांना आरोग्याची काळजी आहे. ते स्लर्प फार्म निवडतात कारण आमच्या उत्पादनांमध्ये रिफाइंड पीठ, ट्रान्स-फॅट, जास्त मीठ आणि साखर, रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हज नसतात,” असं मेघना म्हणतात.


स्लर्प फार्मच्या उत्पादन श्रेणीमध्ये सेंद्रिय धान्य, खिचडी मिक्स, बाजरी, ओट, दलिया, बाजरी पॅनकेक्स आणि वॅफल मिक्स, केळी आणि चॉकलेट चिप पॅनकेक्स, बाजरी डोसा, बीटरूट ओट्स डोसा आणि बरेच काही समाविष्ट आहे. याशिवाय रागी आणि ज्वारीसारख्या भरड धान्यापासून बनवलेले तारेच्या आकाराचे मंची आणि पफ देखील उपलब्ध आहेत, जे चवदार आहेत. बेकिंग रेंजमध्ये विविध प्रकारचे केक मिक्सदेखील समाविष्ट आहेत.


स्लर्प फार्मला एलाज किचन किंवा ऑर्गेनिक्ससारखे बनण्याची आकांक्षा आहे. स्लर्प फार्मची उलाढाल काही कोटींमध्ये होत आहे. या दोघींचा असा विश्वास आहे की, ब्रँड आणि टिकाऊ उत्पादने तयार करण्याचा प्रवास खूप लांब आहे. या प्रवासासाठी उत्तम टीम असणे आवश्यक आहे. एकट्याने हे काम करणे कठीण आहे. एक अन्न कंपनी म्हणून, स्लर्प फार्मला कोरोना काळात आणि त्यानंतरच्या लॉकडाऊन दरम्यान काम करण्याची परवानगी देण्यात आली. आव्हान अनेक होते. लॉजिस्टिक्स अनिश्चित होते. सुरुवातीला अनेक व्यत्यय आले. त्यांनी कच्चा माल, पॅकेजिंग आणि क्रेडिटसारख्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या परिणामांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि ते कमी करण्यासाठी कठोर परिश्रम केले. अल्पावधीत वस्तूंचा पुरवठा करणे हे आव्हानात्मक होते. या काळात स्लर्पने प्रत्यक्षात तिप्पट वाढ पाहिली. स्लर्पचे उत्पादन आणि ब्रँड कोविड-१९ मुळे प्रभावित झाले नाही. हा कंपनीचा भरभराटीचा काळ होता.


ट्रॅक्सएन डॉट कॉम या वेबसाईटनुसार स्लर्प फार्मकडे आज १०० हून अधिक कामगार कार्यरत आहेत, तर कंपनीची ५०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल आहे.
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. एकमेकांच्या सहाय्याने मैत्रीसोबत आयुष्य कसे समृद्ध करायचे याचे शौरवी आणि मेघना या उत्तम उदाहरण आहेत.

Comments
Add Comment

हसरी शंभरी...

चारुहास पंडित : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्देवीण संवाद साधणारे ज्येष्ठ

सुखावणारा ऋतुगंध

तुझी माझी पहिली भेट म्हणजे मृद्गंधाचे अनमोल दरवळते अत्तर नाते तुझे नी माझे हृदयस्थ सुंदर बहरत राहते माझ्या मनी

दर्पण झूठ ना बोले...

माेरपीस : पूजा काळे गोल, लंबगोल, चौकोनी, लाकडी, चांदीच्या फ्रेममध्ये बसवलेली, वस्तुस्थिती दर्शवणारी काच वस्तू

मातृत्वातून उद्योजकतेकडे झेप

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्यामुळे लहान बाळाला काहीही झाले की, घरातील

सर्प साक्षरता हवी!

डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक)  शहरीकरणामुळे आणि मानवाच्या अतिक्रमणामुळे सापांचे अस्तित्व धोक्यात आले

जगाचा तोल सावरणारी माणसे

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर व्यक्तिचित्रे हा मराठी साहित्यातील साहित्यप्रकार पु. ल. देशपांडे यांनी उभ्या केलेल्या