Saturday, August 2, 2025

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

जीवनगंध : पूनम राणे


मे महिन्याचे दिवस होते. शाळेला सुट्टी असल्याने सुशील आपल्या आईसोबत गावी गेला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने फारच उकाडा वाढला होता. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. मध्येच वीजही जात होती. या असह्य उकाड्यात सुशीलला घरी बसणं आवडत नव्हते. तो गावात फेरफटका मारायचा.


एके दिवशी गावात फेरफटका मारत असताना त्याने पाहिले की, पोपट विकणारा विक्या काही पिंजरे आणि पोपट घेऊन, “पोपट घ्या... पोपट...” असे जोराने ओरडत होता. सुशीलने ते ऐकले. आवाजाच्या दिशेने सुशील उड्या मारतच निघाला. एका पिंजऱ्यात पाच ते सहा पोपट पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. “काका... काका... म्हणून तो पोपट विकणाऱ्याच्या मागे जाऊन म्हणाला, “काका तुम्ही माझ्या घरी चला...” मला माझ्या आईला सांगून पोपट व पिंजरा विकत घ्यायचा आहे. पोपट विक्रेत्याला फार आनंद झाला.


पोपट विक्रेता आनंदाने सुशीलच्या घराकडे निघाला. त्याने उड्या मारतच जोराने “आई... आई ...” अगं, बघ माझ्यासोबत कुणाला घेऊन आलोय. “आपल्याला या काकांकडून पोपट आणि एक पिंजरा विकत घ्यायचा आहे आणि पोपटाला आपल्याला आपल्या मुंबईच्या घरी घेऊन जायचं आहे असे सुशील आईला म्हणाला.”


गावातील चार-पाच मुलांना त्याने आवाज देऊन आपल्या घरी बोलावून घेतलं. आम्ही की नाही पोपट विकत घेणार आहोत! मुंबईला घेऊन जाण्यासाठी.. आपल्या मित्रांना तो
सांगू लागला.


सुशीलचा आवाज ऐकून घाईघाईनेच त्याची आई बाहेर आली. अंगणात पोपट विक्रेत्याकडे चार-पाच पोपट आणि पिंजरे होते आणि ते पाहायला आजूबाजूची चार-पाच मुले जमली होती. कुतूहलाने ती सारी मुले पिंजऱ्यातील पोपटांना निरखून पाहत होती. आईला पाहताच सुशील धावतच जाऊन आईला बिलगला. आई मला पोपट पाहिजे, म्हणून हट्ट करू लागला. आजूबाजूच्या माणसांना पाहताच पिंजऱ्यात पोपटांनी आक्रोश सुरू केला. आईनेही पोपट विक्रेत्याकडून एक पोपट व पिंजरा विकत घ्यायचे ठरवले. पोपट आणि पिंजरा मिळून पोपट विक्रेत्याने पाचशे रुपये किंमत सांगितली.


एकाच पिंजऱ्यात पाच-सहा पोपट ठेवले होते. त्यामुळे इतर पिंजरे रिकामीच होते. एका पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढताना त्याच्या इतर मित्रांना फार वाईट वाटत होते. त्या पोपटालाही बाहेर येऊ नये असे वाटत होते. आपण आपल्या बांधवांपासून दुरावणार याचं दुःख त्या पोपटाच्या चेहऱ्यावर दिसत होते. पोपट विक्रेत्याने पोपटाला हाताने पकडून बाहेर काढलं आणि जोरात पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला. त्यावेळी पिंजऱ्यात असलेल्या पोपटांचा जोराचा आक्रोश सुरू झाला. आईला मात्र हे दृश्य पाहून फार वाईट वाटत होते; परंतु आता आपण आपल्या मुलाला समजावण्याच्या पलीकडे आहोत. हे तिला चांगलेच समजले होते. अनुभवातून आपला मुलगा शिकेल याची तिला खात्री होती. त्यामुळे तिने त्या पोपटाला विकत घ्यायचे मनाशी ठरवले.


पोपट विक्रेता पैसे घेऊन निघून गेला. पोपटाला पिंजऱ्यात बंदिस्त करून त्याला पेरू, मिरची, पाणी आणि त्याला आवडणाऱ्या वस्तूंची व्यवस्था त्याच्यासाठी करण्यात आली. सुशील पिंजऱ्याला सोडून कुठेही जाईनासा झाला.


पोपट आता पिंजऱ्यात बंदिस्त झाला होता. त्याला आवडणारा पेरू, मिरची पाणी तो काहीच खात नव्हता. पिंजऱ्याच्या दांडीवरून इकडून तिकडे सतत जोरजोराचा आक्रोश करत हिंडत होता. आपण एकटे पडलो आहोत, याची त्याला जाणीव होत होती. त्याला त्याचे स्वातंत्र्य हवे होते. तो आपल्या आई-वडील, भावंडांपासून दूर झाला होता. दिवसभर त्यांने काहीही खाल्लं नव्हतं. पिंजऱ्यात ठेवलेल्या वस्तू जशाच्या तशा होत्या. संध्याकाळी तो मलूल होऊन पडला होता. त्याचा आवाज बंद झाला होता.
“आई... आई... असा जोराचा आवाज सुशीलने दिला.


आई पळतच बाहेर आली. त्याने आईला पिंजऱ्याकडे बोट करून दाखवले. तो काहीच बोलला नाही. आईने सुशीलला जवळ घेतले व म्हणाली. ‘‘बेटा, तू जसा मला प्राणाहून प्रिय आहेस. तसेच पशुपक्ष्यांचे नाते असते. तो आपल्या आईपासून दुरावला आहे. त्याला त्याच्या आईची, भावंडांची आठवण येत आहे. आठवणीने तो व्याकुळ झाला आहे. त्याला अन्नपाणी काहीच गोड वाटत नाही. ’’


बेटा, ‘‘तुला माझ्यापासून कोणी दूर केलं तर...! आणि हे बघ पशुपक्षांचे संरक्षण व अन्न पाण्याची जबाबदारी निसर्गाने घेतली आहे. त्यामुळे पशु-पक्षी आजारी पडलेत असे पाहिले आहेस का?”आईचे हे शब्द ऐकून सुशीलच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. त्याने आईला मिठी मारली आणि स्वतःच्याच हाताने पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. आता मलुल होऊन पडलेल्या पोपटाने मोकळा श्वास घेतला आणि आकाशाकडे उंच भरारी मारली. कदाचित आपल्या आईला भेटण्यासाठी, आपलं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी तसेच त्याच्या आवडत्या निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी...


तात्पर्य : खरं तर मुलांचे हे वय कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. त्यांना अनुभवातून शहाणपण येत असतं आणि ज्याचं त्याचं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या जागी, ज्याला त्याला प्रिय असते. हेच या गोष्टीवरून शिकायचं असतं.

Comments
Add Comment