Saturday, August 2, 2025

“दिल मिले या न मिले...”

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या फिल्मफेयरच्या ७ पुरस्कारांपैकी ६ पुरस्कार पटकावणारा हा सिनेमा. त्या वर्षीच्या सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या १० सिनेमांपैकी एक ठरला. सर्वोत्कृष्ट सिनेमा, (ताराचंद बडजात्या), सर्वोत्कृष्ट संगीतकार (लक्ष्मीकांत प्यारेलाल), सर्वोत्कृष्ट कथानक (बान भट्ट), सर्वोत्कृष्ट संवादलेखन (गोविंद मुनीस) सर्वोत्कृष्ट गायक (‘चाहुंगा मैं तुझे सांज सवेरे’साठी महम्मद रफी) आणि याच गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मजरूह सूलतानपुरी यांना १९६४ चा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.


आजच्या ‘जागतिक मैत्री दिनी’ या सिनेमाची आठवण येण्याचे कारण म्हणजे मानवी संबंधांचे आजचे आमुलाग्र बदललेले रूप! वृत्तपत्रातील बातम्या वाचल्या तरी आज मैत्रीबद्दल आणि त्यासंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांबद्दल जे वाचायला मिळते त्यावरून मैत्रीच्या संकल्पनेचा आणि एकंदरच नात्यांचा किती ऱ्हास झाला आहे ते लक्षात येते आणि अतिशय वाईट वाटते, पण हिंदी सिनेमाने मात्र मैत्रीचे ते आगळे नाते खूप उत्कटतेने गौरविले होते, साजरे केले होते! त्यात अनेक सुंदर सिनेमांपैकी दिलीपकुमारचा ‘दिल एक मंदिर’ (१९६३), राज कपूरचा ‘संगम’ (१९६४), धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिंहाचा ‘दोस्त’(१९७४), अमिताभ आणि धर्मेंद्रचा ‘शोले’ (१९७५) असे मैत्रीच्या नात्याचे अतिशय लोभस रूप दाखवणारे सिनेमा येऊन गेले. या नात्याचा गौरव करणाऱ्या अनेक कथा आल्या होत्या. दिग्दर्शकांनी त्याचे महत्त्व अशा सिनेमांतून अधोरेखित केले. तरीही मैत्रीच्या नात्याला अविस्मरणीय करून टाकले ते आपल्या गीतकारांनी!


‘दोस्ती’ हा सिनेमा तशी दोन मित्रांची कथा, एक दृष्टीहिन आणि एक श्रवणबधिर. दोघांना एकत्र आणले ते मुंबईच्या फुटपाथने आणि गरिबीने! दोघांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक दुर्घटनांमुळे त्यांच्या जीवनाची वाताहात होते आणि ते मैत्रीच्या घट्ट नात्यात बांधले जातात. तरीही त्यांच्यातील उदारपणामुळे एका छोट्या मुलीला मदत करण्यासाठी रस्त्यावर अक्षरश: भीक मागतात अशी त्यांच्या दोस्तीची कथा. त्या कथेत प्रेक्षकांना रडवणारे अनेक प्रसंग होते. त्याकाळी एकंदर समाजच खूप संवेदनशील, निरागस आणि भावनिक होता. त्यामुळे पडद्यावर दिसणाऱ्या काल्पनिक पात्रांवर बेतलेल्या प्रसंगानेही प्रेक्षकांचे डोळे पाणावत असत. महिला आणि लहान मुले तर स्फुंदून स्फुंदून रडत असत.


‘रामू’ (सुशील कुमार सोमय्या) उत्तम बाजा वाजवत असतो, तर ‘मोहन’ (सुधीर कुमार सावंत) एक उत्तम गायक असतो. एकमेकांच्या साहाय्याने लंगडत लंगडत चालताना ते गाणी म्हणून लोकांचे मनोरंजन करत असतात आणि लोक उदारपणे त्यांना पैसे देत असतात.


दोस्तीमधला एक प्रसंग असा होता की या जिवलग मित्रांमध्ये एकदा दुरावा निर्माण होतो. दोघांमधली मैत्री, प्रेम अबाधित असते पण रामूला त्याचे शिक्षक त्याची शिकण्यातली आवड बघून स्वत:च्या घरी राहायला नेतात आणि मोहन झोपडपट्टीतील त्याच्या घरात एकटा पडतो. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावरून एकटाच फिरताना मोहन जे गाणे म्हणतो त्याचे हृदयस्पर्शी शब्द होते -


“चाहुंगा मैं तुझे साँझ सवेरे,
फिर भी कभी अब नाम को तेरे,
आवाज मैं न दुंगा,
आवाज मैं न दुंगा.”
मित्राला पुढे नेऊ इच्छिणाऱ्यांना जर त्याचे आपल्याशी असलेले नाते खुपत असेल, ते तोडल्याने जर त्याची प्रगती होत असेल तर ते संपवायलाच हवे असे मोहनमधल्या मित्राला वाटते पण त्याचे निरागस प्रेम अतूट असते. तो आपल्या दुरावलेल्या मित्राशी या गाण्यातून जणू मनातल्या मनात एक संवादच साधत असतो. तुला माझ्या मनाची सगळी अवस्था ठाऊक आहे. तुला सर्व जाणवतच असणार. तरीही काळजी करू नकोस, मी तुला आता कधीही हाक मारणार नाही.


‘देख मुझे सब है पता,
सुनता है तू मन की सदा.
मितवा,
मेरे यार तुझको बार-बार,
आवाज मैं न दूँगा...’


माझ्या आयुष्यात आपल्यातला आलेला दुरावा हेच एक दु:ख आहे रे आणि माझा दिलासाही तूच आहेस. मला हे सुंदर जग दिसत नाही, तूच माझी दृष्टी होतास. तूच तर माझे डोळे झाला होतास. पण आता माझा मी मनातच तुला पाहत जाईन.
‘दर्द भी तू, चैन भी तू,
दरस भी तू, नैन भी तू.
मितवा,
मेरे यार तुझको बार-बार,
आवाज मैं ना दूँगा...’


दोस्तीमधली सगळीच गाणी जबरदस्त गाजली. त्यात दिसणारी जुनी साधीसरळ मुंबई, लोकांची साधी वेशभूषा, जुन्या वत्सल चाळी, शांत प्रशस्त बंगले, मोकळे समुद्रकिनारे अजूनही पुन्हापुन्हा पाहावेसे वाटतात. रफी साहेबांच्या रेशमी आवाजातले हे गाणे आजही एखाद्या कायमच्या दुरावलेल्या मित्राच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यांत टचकन पाणी आणते.
‘दर्द भी तू, चैन भी तू, दरस भी तू, नैन भी तू.’ या ओळी एका अंध व्यक्तीच्या प्रेमाची अगतिकता किती सुंदरपणे स्पष्ट करीत! म्हणजे तूच माझे दु:ख आणि तूच दिलासा आहेस. तूच माझे डोळे आणि तूच त्यांनी दिसणारी सृष्टी आहेस हे जेव्हा एक आंधळा मित्र त्याला साथ देणाऱ्या लंगड्या मित्राला म्हणतो तेव्हा मन गलबलून जायचे.
अशी कविता रचताना कवी या काल्पनिक प्रसंगाशी किती एकरूप झाला असेल ते सहज लक्षात येते. पण गेले तसे सिनेमा, संपले ते गीतकार आणि स्वर्गवासी झाले आता रफीसाहेबांसारखे गायक!


असेच प्रसिद्ध गीतकार निदा फाझली १९८९ साली प्रथमच अमेरिकेत गेले होते. तिथे ‘सर सय्यद स्मृतीदिनानिमित्त’ आयोजित एका मुशायऱ्यात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एक जबरदस्त शेर सादर केला होता.


“बात कम कीजे, जेहानत को छुपाए रहिए,
अजनबी शहर है ये, दोस्त बनाए रहिए,
दुश्मनी लाख सही, खत्म न कीजे रिश्ता
दिल मिले या न मिले, हाथ मिलाए रहिए.”
आणि ते ही खरेच नाही का? ‘व्यक्तीस्वातंत्र्य’, ‘आझादी’, ‘माझी स्पेस’ ‘तुझी स्पेस’ अशा माणसाला एकटेच नाही तर अगदी एककलकोंडे करून टाकणाऱ्या पाश्चिमात्य संकल्पना आज भारतीय समाजावर हुकुमत गाजवत आहेत. अशावेळी, निदा फाझली साहेबांचे धोरणच योग्य वाटू लागते.
“दिल मिले या न मिले,
हाथ मिलाते रहिए.”

Comments
Add Comment