
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले होते. त्या सागरात शेषशय्येवर भगवान श्री नारायण योगनिद्रेत होते. निर्मिती काल आल्यावर पुन्हा जागण्यासाठी केवळ काल शक्तीला जागे ठेवून ते निद्रिस्त झाले होते. निर्मितीचा काल येताच काळाने त्यांच्या नाभीतून कर्मशक्तीला जागृत करून आकाशव्यापी कमळ निर्माण केले. त्यातून सर्व वेद जाणणारे वेदमूर्ती ब्रह्मदेव प्रगट झाले. ते स्वतःच प्रगट झाल्यामुळे त्यांना स्वयंभू म्हणतात.
त्यांनी चारही दिशांना पाहिले तर त्यांना कोणीच दिसले नाही. त्यांनी चारही दिशांना पाहिल्यामुळे त्यांना चार तोंडे उत्पन्न झाली. मी एकटाच कसा? व या पाण्यात हे कमळ कुठून आले? हे पाहण्यासाठी ते कमळाच्या देठातील सूक्ष्म छिद्रातून पाण्यात शिरले. देठाद्वारे ते नाभीपर्यंत गेले; परंतु त्यांना काहीही दिसले नाही. शेवटी ते माघारी फिरले. त्यांना कमळ, जल, आकाश, पाणी व स्वतःच्या शरीराशिवाय काहीच दिसले नाही. त्यामुळे ते कमळावर बसून समाधीस्थ झाले.
बऱ्याच कालावधीनंतर त्यांना त्यांच्या अंतःकरणात दिसले की सागरामध्ये शेषशय्येवर भगवान पुरुषोत्तम पहुडले असून त्यांच्या नाभीतून निघालेल्या कमळावर आपण विराजमान आहोत. ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीची इच्छा झाल्याने त्यांनी भगवान पुरुषोत्तमाची स्तुती केली. भगवंताने त्यांना पुन्हा एकदा तप करून ज्ञानाचे अनुष्ठान करण्यास सांगितले. त्यायोगे तू माझ्यामध्ये संपूर्ण लोक व तू आहेस हे पाहशील. या सर्वांची तू पूर्वकल्पाप्रमाणेच माझ्यापासून उत्पत्ती कर. त्याप्रमाणे प्रथम त्यांनी तम (अविद्या), मोह (अस्मिता), महामोह (राग), तामिस्त्र(द्वेष), अंधातामित्र (अभिनिवेश) या अज्ञानाच्या पाच वृत्ती निर्माण केल्या; परंतु ही तामसमय सृष्टी पाहून ते असंतुष्ट होते.
तेव्हा त्यांनी प्रथम भगवंताचे ध्यान करून मन पवित्र केले व दुसऱ्या सृष्टीची रचना केली. यात ब्रह्मदेवांनी सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार या चार मुलांची उत्पत्ती केली. हे मुनी ज्ञानी असले तरी ते सदैव नेहमी आठ वर्षांच्या मुलासारखेच लहान दिसतात. त्या चौघांनाही सनकादिक या एका नावानेही ओळखतात. ब्रह्मदेवांकडून उत्पत्तीची अपेक्षा होती. मात्र हे जन्मतःच अध्यात्मिक वृत्तीचे व ब्रह्मचर्य पालन करून जप तपात मग्न असल्याने प्रजा उत्पत्तीची त्यांची इच्छा नव्हती. हे पाहून ब्रह्माला क्रोध आला. तो क्रोध ब्रह्मदेवाच्या भुवयाच्या मध्यामधून बालकाच्या रूपाने बाहेर पडला. ते हे बालक म्हणजेच देवतांचे रुद्र. जन्मतः ते बालक स्पंदून स्पंदून रडू लागले. म्हणून त्यांचे नाव रुद्र ठेवले. त्यांनी आपल्या निवासाच्या जागा विचारल्या तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना हृदय, इंद्रिये, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप आधी ठिकाणे दिली. तसेच तू मन्यू, मनू, महिनय, शिव, ऋतध्वज, उग्ररेतर, भव, काल, वामदेव व ध्रुतव्रत व अन्य आदी नावानेही ओळखले जाल असेही सांगितले. तसेच रुद्राच्या पत्नींची नावे घी, वृत्ती, उशना, उमा, नियूत, सर्पी, ईला, अंबिका, इरावती, सुधा, दिक्षा अशी आहेत. या पत्नीद्वारे रुद्राने आपल्यासारख्याच आकाराची व बलशाली प्रजा उत्पन्न केली. मात्र ही सर्व रुद्र प्रजा सृष्टीचेच भक्षण करू लागल्याचे पाहून ब्रह्मदेवाने रूद्राला अशी प्रजनन निर्माण न करण्याचा आदेश दिला. तसेच तपाचरण करून प्रथम सर्व प्राण्यांना सुखी करण्याची शक्ती प्राप्त कर व पुन्हा सृष्टी निर्माण करण्याचा सल्ला दिला. रुद्र ब्रह्मदेवांच्या आज्ञेने तपश्चर्या करण्यास निघून गेले.