
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप
वाराणसी : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे गुन्हेगार देखील मारले गेले आहेत. दहशतवाद्यांना मारण्यासाठी तुम्हाला फोन करून विचारायचे का? त्यांना पळून जाण्याची संधी द्यायची का?, अशा थेट आणि बोचऱ्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाराणसी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत २,१८३ कोटी रुपयांच्या ५२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या प्रकल्पांमध्ये रस्ते बांधकाम आणि रुंदीकरण, रुग्णालयांचे आधुनिकीकरण, शैक्षणिक संस्थांमध्ये सुधारणा, धार्मिक पर्यटनासाठी पक्क्या घाटांचे बांधकाम, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज आणि पार्किंग सुविधांचा विस्तार, तलावांचे नूतनीकरण, ग्रंथालये आणि प्राणी रुग्णालयांची स्थापना अशा कामांचा समावेश आहे.
पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधितही केले. मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना ठार मारण्याच्या वेळेवरून अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरनंतर मी प्रथमच वाराणसीला आलो आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मी बाबा विश्वनाथ यांच्याकडे केली होती.
त्यावेळी मी हल्ल्याचा बदला घेण्याचे वचन दिले होते. ते वचन मी पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे काशी विश्वेश्वराला समर्पित असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.