साक्षी माने
येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा मान आपल्यालाच मिळावा यासाठी गोविंदा पथकांची धडपड सुरू झाली आहे. बाल गोपाळ एकमेकांच्या साथीने उंचच्या उंच मानवी मनोरे रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकूणच यानिमित्ताने गोविंदा पथकाचे नेत्रसुखद थर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर आणि अबालवृद्धांचा उत्साह पुन्हा अनुभवता येणार आहे. हे थरावर थर उभे करण्यासाठी प्रत्येक गोविंदा पथक महिनाभर कष्ट, साहस आणि चिकाटीने सराव करतात. महिनाभराचा त्यांचा सराव, अनुभव, दृढ इच्छाशक्ती काही औरच असते. या आनंदोत्सवानिमित्त त्यांच्या समस्या, अनुभव आणि भूमिका अशा अनेक मुद्द्यांवर गोविंदांशी संवाद साधण्याचा प्रयत्न.

‘बोल बोल बोल बोल, जागेवाले की जय’, गोविंदा रे गोपाळा या घोषणांनी अनेक परिसर दुमदुमू लागले आहेत. थरथरणारी पावलं आता पुन्हा सावरू लागली आहेत. नभाची उंची गाठायला बालगोपाळ मंडळाची लगबग सुरू झाली असून एक वेगळाच उत्साह जागोजागी दिसतो आहे. या बालगोपाळांची चिकाटी, उत्साह इतका सकारात्मक असतो की, दिवसभर कितीही थकलेलो असो, सराव मात्र चुकता कामा नये ही जिद्द त्यांना कुठल्याही कारणाने थांबू देत नाही.
वयाच्या २४ व्या वर्षांत एका प्रशिक्षकांची भूमिका बजावताना येणाऱ्या अनुभवाविषयी बोलताना गोरेगाव पश्चिमेच्या ‘श्रीराम गोविंद पथका’चा प्रशिक्षक रोहन घोले म्हणाला, हे सहज शक्य नव्हतं पण, अशक्यही नव्हतं. लहानपणी मित्रांसोबत आनंद म्हणून दहीहंडी पाहायला जायचो. तेव्हा पाहिलेलं स्वप्न म्हणजे, मलाही कधी या बालगोपाळ मंडळींप्रमाणे थरावर चढता येईल का? मी कधी माझ्या मित्रांना सोबत घेऊन असं प्रदर्शन करू शकेल का? कदाचित त्या वयात माझ्यासाठी या फार अचंबित करणाऱ्या गोष्टी होत्या. कारण, लहान वयात एखादी गोष्ट आपल्याला सहज आकर्षित करून जाते. मला कधी हे करता येईल का? असा विचार करणाऱ्या माझ्याकडून गेल्या वर्षी आठ थर लावले गेले, यंदा ९ थर लावूच, असा निर्धार आहे. बालगोपाळ मंडळींना मी प्रोत्साहन देणाऱ्या प्रशिक्षकाची भूमिका बजावतो आहे. अर्थात यामध्ये वैभव पोस्टुरेचीही मला प्रशिक्षक म्हणून साथ लाभली आहे. प्रत्येक गोविंदाचं योगदान मोलाचं आहे.
‘गोरेगावाची शान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पथकाचा प्रवास सांगताना रोहनने २०१६ पासूनच्या त्यांच्या वाटचालीचा आढावाच घेतला. तो म्हणाला, इकडून तिकडून जमणाऱ्या १५/१६ गोविंदांचा आकडा आता वाढला असला, तरी हा आकडा वाढायला खूप मेहनत घ्यावी लागली. काही बऱ्यावाईट गोष्टींचा अनुभव यादरम्यान घेतला. पण, कधीही कुठे थांबलो नाही. आमच्या पथकाची शान सात-आठ वर्षांची चिमुकली तनिष्का बुबना म्हणजे आमची ‘हिरकणी’ आहे. आणखी आवर्जून सांगावसं वाटतं, ते अंश भगतबद्दल. हा आमचा टॉपर असून अंश जेव्हा मनोऱ्याच्या सर्वात वरच्या टोकाला जाऊन दहीहंडी फोडतो, तेव्हा आमच्या पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचा अभिमान आम्हाला वाटतो.
माटुंग्याच्या ‘नयन फाऊंडेशन’चे, दृष्टीहिन गोविंदांचे ‘जनक पथक’ हे महाराष्ट्रातलं पहिलं दृष्टीहिन पथक आहे. या गोविंदा पथकाचे सचिव शार्दुल म्हाडगुत यांनी त्यांच्या गोविंदांच्या चिकाटीचं, मेहनतीचं वर्णन केलं. नयन फाऊंडेशनचे संस्थापक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पथकाची सुरुवात २०१४ झाली. यात अंध मुला-मुलींचा सहभाग आहे. पोन्नलगर देवेंद्र हे स्वतः अंध असून या पथकाचे सर्वेसर्वा आहेत. बारा वर्षांच्या प्रवासात थर लावताना फक्त आवाजावर अवलंबून सगळं काही करणं आव्हानात्मक असूनही ‘आम्हाला कोणतंही सांत्वन नको, तर प्रोत्साहन द्या’ हीच या गोविंदांची अपेक्षा आहे. जेव्हा ते मनोरा रचतात, तेव्हा त्यांना येणाऱ्या अनुभवाविषयी माहिती देताना म्हाडगुत म्हणाले, जेव्हा आमचे गोविंदा मनोरा रचतात, तेव्हा पूर्ण शांतता प्रस्थापित केली जाते. फक्त प्रशिक्षकांच्या, अर्थात नंदू धनावडे, प्रसाद गायकवाड यांसह अन्य प्रशिक्षकांच्या सूचनेवर लक्ष ठेवून फक्त त्याच आवाजाच्या सहाय्याने आमचे गोविंदा पाच थरांचा मनोरा रचतात. दहीहंडीच्या दिवशी इतर पथकंही आम्हाला सहकार्य करतात. विशेष सांगायचं, तर ‘अधारिका फाऊंडेशन’चं आम्हाला खूप सहकार्य लाभतं. आपल्याकडे एखाद्यी वस्तू, गोष्ट नसली की आपण हळहळ व्यक्त करतो. पण हे अंध गोविंदा हे सुंदर विश्व पाहू शकत नसले तरी त्याविषयी कधीही दुःख न करता आपल्याकडे असलेल्या कौशल्याच्या बळावर आम्ही कुठेही कमी नाही, हे दाखवून देतात, असं म्हाडगुत यांनी सांगितलं.
दहीहंडीच्या दिवशी आयोजनस्थळी अलोट गर्दी लोटते. ही गर्दी फक्त पुरुष गोविंदाचीच नसते. महिला गोपिकांचीही असते. तसं म्हणायला गेलं, तर महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाला गवसणी घालतात. अशाच ‘कर्तृत्व राज्ञी’चा दहीहंडीत असलेल्या सहभागावर बोलताना प्रशिक्षक जोगेंद्र वारीष यांनी त्यांच्या ‘श्री शिवसाई महिला गोविंदा पथक’ विरार (पूर्व), या पथकाचा प्रवास सांगितला. दिवसभर पदर खोचून काम करणारी स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्यावरच सीमित न राहता आपल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडते. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना तिची भूमिका ही नेहमीच संघर्षमय असते. धकाधकीच्या जीवनात स्वतःचा छंद जोपासण्यासाठी का होईना, पण काही महिला दहीहंडी उत्सवात सहभागी होतात. आमचं महिला पथक अतिशय उत्साही असून मुंबईसह उपनगरातील दहीहंडी फोडण्यासाठी कायम पुढे असतं. या गोपिका रोजचा दिवसभराचा डोलारा सावरत न चुकता सरावासाठी वेळ काढतात. कोणतंही भय न बाळगता ‘जिजाऊंच्या लेकी आम्ही, आम्हास नाही भीती कोणाची’ या ओळींचा प्रत्यय देणारं प्रदर्शन करतात. या मेहनती नारीशक्तीला प्रत्येकाने सलाम केला पाहिजे, असं वारीष यांचं म्हणणं.
दहीहंडीचा खेळ वर्षातून एकदाच खेळला जातो. त्याच काळात केवळ सराव केला जातो. पण, यानिमित्ताने जमणाऱ्या गोविंदांचे ऋणानुबंध कायम टिकतात. त्यांच्यात असलेलं ऐक्य वाखाणण्याजोगं असतं. अशाच एकीचे उदाहरण म्हणजे ‘अमर भारत सेवा मंडळ’. १९६५ पासून कार्यरत असणारं, सात रस्ता भागातील हे अतिशय नावाजलेलं पथक. ‘अनुभवाचे धनी’ असणाऱ्या या मंडळाविषयी सांगताना सतीश नकाशे म्हणाले, सर्वसाधारणपणे सर्वच गोविंदा पथकांचा सराव हा गुरू पौर्णिमेपासून सुरू होतो. सव्वा महिन्याच्या काळात थरावर थर रचण्यासाठी आमचे गोविंदा कसून सराव करतात. सगळेजण आपापल्या घरातील जबाबदाऱ्या, नोकरी सांभाळून हौसेने आणि जिद्दीने दरवर्षी सहभाग घेतात. उत्सवाच्या दिवशी आयोजक सेलिब्रिटींच्या स्वागतात गर्क झालेले असतात. त्या दिवसाचा जेवणाचा, पाण्याचा खर्च हा पथकाला करावा लागतो. आपल्या पथकाची संपूर्ण जबाबदारी त्या मंडळाची असते. या जबाबदारीतून कधीही अंग झटकलं नाही. गोविंदा पथकांना गर्दीचा सामना करत खेळ खेळावा लागतो. काही दहीहंडी स्पर्धा आयोजक गोविंदा पथकांना अक्षरश: वेठीस धरतात. अशा घाईच्या वेळी आपल्या गोविंदांची काळजी घेणं हे एक आव्हान असतं. पण येणाऱ्या प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आमच्या गोविंदांमध्ये आहे, असं त्यांनी मोठ्या विश्वासाने सांगितलं.
ठाणे शहर परिसरात अनेक मानाच्या ‘दहीहंडी’चं आयोजन केलं जातं. याच ठाणे परिसरातील ‘आओ साई गोविंदा पथका’ची शहरभर प्रसिद्धी आहे. या पथकाविषयी मनसे प्रभाग अध्यक्ष प्रशांत पालांडे म्हणाले, आमचं गोविंदा पथक हे विशेष विषयावर आधारित थर लावतं. आपल्या सणांचं महत्त्व कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतं. यंदा मराठी भाषेचा जागर, आपल्या मातृभाषेच्या सन्मानार्थ आम्ही आमच्या गोविंदांमार्फत प्रसार करू. मराठी भाषा ही आपली जननी आहे आणि या जननीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. फक्त रोख रकमेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी आम्ही हा सण साजरा करत नाही. नेहमी यशच मिळावं ही आशा न करता फक्त आनंद मिळेल या निःस्वार्थ हेतूने आम्ही या सणामध्ये सहभागी होतो, असंही पालांडे यांनी आवर्जून सांगितलं.
आपण साजरा करत असलेला प्रत्येक सण हा समाजाला एकत्र आणण्याचं काम करत असतो. संस्कृती, परंपरांशी असलेले आपलं नातं घट्ट करत असतो. संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी ही मंडळी किती उत्साही आहेत, हे या गोविंदांसोबत संवाद साधताना जाणवत होतं.