Sunday, August 3, 2025

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत


श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावर एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. अतिरिक्त सामान बाळगल्याबद्दल करण्यात आलेल्या कारवाईमुळे, संतप्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्याने, तेथे तैनात असलेल्या स्पाइसजेटच्या स्टाफना फ्रीस्टाइल मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत चार कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

स्पाइसजेटच्या निवेदनानुसार, ही घटना २६ जुलै रोजी घडली. दिल्लीला जाणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याकडे १६ किलो वजनाचे दोन केबिन सामान होते. देशांतर्गत उड्डाणांमध्ये ७ किलोपेक्षा जास्त वजनाच्या केबिन सामानावर अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा लष्करी अधिकाऱ्याला याची माहिती देण्यात आली तेव्हा त्याने अतिरिक्त शुल्क देण्यास नकार दिला आणि बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करता जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये प्रवेश केला. हे विमान सुरक्षा नियमावलीचे उल्लंघन आहे. कर्मचाऱ्यांनी लष्करी अधिकाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने जवळच ठेवलेल्या स्टीलच्या स्टँडने कर्मचाऱ्यावर हल्ला केला.


ग्राउंड स्टाफ अधिकाऱ्यांना जबर दुखापत


एअरलाइनने म्हटले आहे की, "सैन्य अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या चार ग्राउंड स्टाफ अधिकाऱ्यांवर हल्ला केला. आमच्या कर्मचाऱ्यांना वारंवार लाथा आणि ठोसे मारण्यात आले. एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली. स्पाइसजेटचा एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला, परंतु प्रवासी बेशुद्ध कर्मचाऱ्याला लाथा मारत राहिला."


लष्करी अधिकाऱ्याला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया


एअरलाइनने म्हटले आहे की, "दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या जबड्यावर जोरदार लाथ मारण्यात आली ज्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. तो जखमी कर्मचाऱ्याला मदत करण्यासाठी गेला होता, त्यामुळे त्याच्यावरही हल्ला झाला. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आले." एअरलाइनने म्हटले आहे की त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि लष्करी अधिकाऱ्याला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली आहे आणि तसेचग लष्करी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात विमानमानतळ अधिकाऱ्यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत.
Comments
Add Comment