
कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’ संस्था कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी सकारात्मक आहे, मात्र जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिचे पुनरागमन शक्य होणार नाही, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर पालकमंत्री आबिटकर यांनी 'वनतारा' संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘वनतारा संस्थेच्या सीईओंनी करवीर मठाच्या महास्वामींना स्पष्टपणे सांगितले आहे की, महादेवीला कोल्हापुरातून नेण्याच्या संपूर्ण प्रकरणात वनताराचा कोणताही थेट संबंध नाही. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र आहेत आणि याचा आदर करून आम्ही महादेवीला परत देण्यास तयार आहोत.’
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य
वनतारा संस्था महादेवीला परत देण्यास तयार असली तरी, या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यामध्ये न्यायालयाचे निर्देश आणि वनविभागाच्या परवानगी यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय महादेवीला कोल्हापुरात आणता येणार नाही, असेही आबिटकर यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.