
मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टरवरील भयावह आणि गूढ चेहरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे, आणि यामुळे चित्रपटाच्या कथेबद्दलचे कुतूहल अधिकच वाढले आहे.
काळसर रंगाचे रौद्र रूप, लालसर डोळे आणि भेदक कटाक्ष असलेला हा चेहरा नेमका कोणाचा आहे, या प्रश्नाने अनेकांना वेड लावले आहे. काही प्रेक्षकांच्या मते हा चेहरा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. जर हा चेहरा त्यांचाच असेल, तर त्यांची ही वेगळी आणि रहस्यमय भूमिका नक्की कोणती असेल, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सुबोध खानोलकर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेला हा चित्रपट कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरेवर आधारित आहे, ज्यात रहस्यमय पार्श्वभूमीची जोड देण्यात आली आहे. पोस्टरवरूनच चित्रपटाची कथा काहीतरी वेगळे आणि अनपेक्षित असेल, असे संकेत मिळत आहेत. सध्या केवळ चेहऱ्याची झलक समोर आली असली तरी, त्यामागील खरी कथा आणि संदर्भ अजूनही गुलदस्त्यात आहे.
हे गूढ नेमके काय आहे आणि दिलीप प्रभावळकर यांची ही कोणती भूमिका असेल, याचा उलगडा १२ सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच होणार आहे. 'दशावतार' प्रेक्षकांना नक्कीच एका वेगळ्या आणि रोमांचक प्रवासावर घेऊन जाईल, यात शंका नाही. भविष्यात विस्ताराची योजना.