तुळजापूर: तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्र पूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाली आहे, असे स्थानिक पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. पुजाऱ्यांच्या मते, पद्मश्री गणेश द्रविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या तलवारीचे विधीवत पूजन करण्यात आले होते. त्यांनी तलवारीमध्ये शस्त्रातील तत्त्व आणि देवीची शक्ती संचारित केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही तलवार केवळ धार्मिकच नव्हे, तर अध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाची मानली जाते.
तलवार खजिना खोलीतून नेमकी कशी गायब झाली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, भक्तांना दर्शन घेण्यासाठी गहाळ झालेली तलवार तुळजाभवानी देवीजवळ किंवा मंदिरात कुठेही ठेवावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे. श्री तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला माहिती न देता द्रविडशास्त्रींच्या मार्फत मंदिर संस्थानी होम हवन विधी केल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे. तसेच या द्वारे तुळजाभवानीची शक्ती तलवारीमध्ये काढून घेतल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काहीही करून लवकरात लवकर ती तलवार आई भवानीच्या चरणी पुन्हा आणून ठेवावी अशी मागणी मंदिर पुजारी करत आहे.