
यवतमध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे शनिवार २ ऑगस्ट रोजी गावातील शाळांना बंद ठेवले आहे. गावातील सर्व दुकानं आणि व्यापार बंद आहे. नागरिकांनी घोळक्याने उभे राहू नये, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत. शुक्रवारी हिंसा करणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे.
शुक्रवारी सकाळी एका तरुणाने मध्यप्रदेश इथे एका ६० वर्षाच्या अध्यात्मिक गुरुने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असं एका चॅनेलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं. या स्टेटसवरुन यवतमध्ये शुक्रवारी हिंसा झाली होती. या हिंसेप्रकरणी पोलिसांनी २० पेक्षा जास्त नागरिकांना अटक केली आहे.
याआधी चार दिवसांपूर्वी यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी तपास करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याला अटक केल्यानंतर वातावरण शांत झाले होते. पण शुक्रवारी स्टेटसवरुन हिंसा झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.