Saturday, August 2, 2025

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका


नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून, या पुरस्कार सोहळ्यावर मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा आपली मजबूत मोहोर उमटवली आहे.


ज्येष्ठ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने जाहीर केलेल्या या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ने पटकावला, तर बालकलाकार आणि तांत्रिक पुरस्कारांवरही मराठी कलावंतांनी आपले नाव कोरले आहे.


साने गुरुजींच्या अजरामर कलाकृतीला चित्रपटरूपात साकारणाऱ्या दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या 'श्यामची आई' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मराठी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणे हे प्रत्येक दिग्दर्शकाचे स्वप्न असते. हे स्वप्न दिग्दर्शक आशीष भेंडे यांनी सत्यात उतरवले आहे. त्यांच्या 'आत्मपँफ्लेट' या चित्रपटाला दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा (इंदिरा गांधी) पुरस्कार जाहीर झाला आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘नाळ २’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दुहेरी यश मिळवले आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.


याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्रिशा, श्रीनिवास आणि भार्गव या तिन्ही बालकलाकारांना विभागून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याच श्रेणीत ‘जिप्सी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी कबीर खंडारे यालाही सर्वोत्कृष्ट बालकलाकाराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मराठी चित्रपटांच्या यशाची या सोहळ्यामध्ये चर्चा सुरू होती.

Comments
Add Comment