
पुणे: पुण्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ते स्कूटरवरून जात असताना त्यांची स्कूटर खड्ड्यात घसरली आणि ते तेथून जाणाऱ्या चारचाकी वाहनाच्या खाली आले. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ जवळच्या हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा खड्डा रस्ते बांधणाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचंद सांगितले जात आहे, कारण त्यांनी पदपथ आणि सिमेंट रस्त्यामध्ये अंतर सोडले होते. आणि त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्याने जीव घेतला.
पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ६१) असं मृत व्यक्तीचे नाव होते. रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्यामध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून त्यांची दुचाकी घसरली. यामुळे त्यांचा तोल गेला. मात्र तेवढ्यात मागून आलेल्या कारच्या खाली ते चिरडले गेले. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये सदर व्यक्तीने हेलमेट घातली नसल्याचे देखील निदर्शनास आलं आहे. त्यामुळे हेलमेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, असे सूर देखील उमटत आहे. मात्र, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे जाणारे अनेक जीव आजही मोठी समस्या आहे.
त्यामुळे या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर थेट सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.