Saturday, August 2, 2025

एक रंगमंच, दोन दीर्घांक आणि संयुक्त ‘प्रयोग’...

एक रंगमंच, दोन दीर्घांक आणि संयुक्त ‘प्रयोग’...

राजरंग : राज चिंचणकर


मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. यात प्रायोगिक रंगभूमीचा वाटा मोठा आहे. प्रायोगिक रंगभूमीने अनेक कलाकारांना आणि तंत्रज्ञांना व्यावसायिक रंगभूमीची दारे उघडून दिली आहेत. रंगभूमीचे व्यावसायिक आणि प्रायोगिक असे दोन प्रकार आहेत का, याबाबत मतमतांतरे असली, तरी नाट्यकृतींचे एकूणच आर्थिक गणित आणि डोलारा लक्षात घेता तसे दोन प्रकार पडलेले दिसून येतात. व्यावसायिक रंगभूमीवर निर्माता थेट नाटक उभे करतो. मात्र प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असलेली नाट्यवेडी मंडळी सगळा भार स्वतःच्या खांद्यावर वाहून नेत असतात आणि अडचणींवर यथाशक्ती मात करत त्यांचे नाटक हट्टाने रंगमंचावर उभे करतात. एखादे नाटक प्रायोगिक तत्त्वावर निर्माण करणे आणि त्याचे प्रयोग सातत्याने करत राहणे, यासाठी या रंगकर्मींना आटापिटा करावा लागतो. मात्र एकूणच आर्थिक गणिते, नाट्यगृहांच्या तारखा, त्यांची उपलब्धता आदी गोष्टी जुळवताना या मंडळींना बरीच कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर एक उदाहरण कायम होऊ शकेल, असे प्रायोगिक रंगभूमीवरचे दोन दीर्घांक सध्या लक्ष वेधून घेत आहेत.


प्रायोगिक रंगभूमीवर काही काळापूर्वी ‘अंधारदरी’ या दीर्घांकाने पाऊल टाकले आणि त्याचे प्रयोग सुरू झाले. तर दुसरीकडे, ‘लाईट गेलीय का?’ या दीर्घांकाने अलीकडेच प्रायोगिक रंगभूमीवर ‘एन्ट्री’ घेतली. आपापल्या परीने ही दोन्ही नाटकमंडळी त्यांच्या दीर्घांकांचे प्रयोग करत होती. पण आता या नाटकांच्या बाबतीत एक दखल घेण्याजोगी गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे सध्या या दोन्ही दीर्घांकाचे एकाच रंगमंचावर एकत्र प्रयोग केले जात आहेत. या मंडळींचा हा निर्णय उचित म्हणावा असा आहे. कारण संयुक्त प्रयोग करण्याने बऱ्याच गोष्टी साध्य होतात. आर्थिक भार वाटून घेतला जातो, रसिकजन एकगठ्ठा उपलब्ध होतात आणि एकमेकांना आवश्यक ती मदत होते. रसिकांच्या दृष्टीने पाहायचे तर यामुळे त्यांना दोन नाट्यकृतींचा एकत्र आस्वाद घेता येतो. तर, सध्या प्रायोगिक रंगभूमीवर ‘अंधारदरी’ आणि ‘लाईट गेलीय का?’ हे दीर्घांक दिमाखात त्यांचे प्रयोग संयुक्तपणे करताना दिसत आहेत.


‘अंधारदरी’ नाटकाचे लेखक व दिग्दर्शक महेंद्र डोंगरे आणि ‘लाईट गेलीय का?’ या नाटकाच्या लेखिका व दिग्दर्शिका वर्षा दांदळे, हे दोन रंगकर्मी या संयुक्त प्रयोगाच्या संकल्पनेमागे ठाम उभे आहेत. ‘अंधारदरी’ आणि ‘लाईट गेलीय का?’ या दोन्ही शीर्षकांतून ‘अंधार’ प्रतिबिंबित होत असल्याचे सूचन होत असले, तरी यातून प्रायोगिक रंगभूमीवर मात्र प्रकाशाचा नवा किरण निर्माण झाला आहे आणि ही दोन्ही कथासूत्रे सुद्धा काही संवेदनशीलपणे सांगू पाहत असल्याचे दिसून येत आहे.


‘लाईट गेलीय का?’ या दीर्घांकाच्या बाबतीत बोलताना वर्षा दांदळे सांगतात, “आमचा दीर्घांक साधा, सरळ, सोपा आहे. वयाची पन्नाशी पार केलेली सुमती डोळसपणे जगाकडे बघतेय. घरदार, मुले, स्वयंपाकपाणी करता करता ती एका टप्प्यावर आली आहे. जगाकडे आता मोकळ्या मनाने बघत असताना आणि त्याप्रमाणे जगत असताना तिला काही प्रश्न पडतात. तिला पडणारे प्रश्न तुमच्या-माझ्या मनातलेच आहेत. यातून आपण अंतर्मुख होतो. आपण तिच्यासोबत तिच्या जगामध्ये जातो. ती नेमकी कुठल्या जगातून तुमच्याशी बोलत आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल लेखकांना स्त्रियांची दुःख फक्त वय वर्षे २५ ते ३५ या वयोगातलीच दिसतात. पस्तिशीनंतरच्या स्त्रियांना सुखदुःख नसतात, असे समस्त लेखकांना वाटते. पण मोठ्या वयाच्या स्त्रियांचेही काही म्हणणे असू शकते आणि त्यांच्या मनातल्या गोष्टीही आपल्याला मांडता येऊ शकतात, असे मला वाटते. ज्यातून आपल्यालाही काहीतरी ‘लाईट’ मिळेल”.


‘अंधारदरी’चा विषय स्पष्ट करताना महेंद्र डोंगरे म्हणतात, “आपण नक्की काय करत आहोत, कुठे जाणार आहोत, याची जाण हरवलेला माणूस समाजातल्या विषमतेबद्दल या नाटकामुळे अंशतः तरी विचार करेल. यात समाजाच्या दोन टोकांमधली विषमता तौलनिक विचारांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.


काही वर्षांपूर्वी मुसळधार पावसात उघड्या राहिलेल्या मॅनहोलमध्ये बुडून एका डॉक्टरांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे सफाई कामगारांचे मॅनहोलमध्ये उतरून काम करताना झालेले मृत्यू माझ्या मनात फेर धरू लागले. याच सुमारास प्रणव सखदेव यांची, मॅनहोलमध्ये गुदमरून मरण पावलेल्या सफाई कामगारांचे मनोगत मांडणारी कथा वाचनात आली. त्यावरून हा दीर्घांक लिहून काढला. कलावंत म्हणून एका सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून मी हा दीर्घांक बसवला आहे.”

Comments
Add Comment