साई सुदर्शन बाद झाल्यावर शुभमन गिल फलंदाजीसाठी येणे अपेक्षित होते. पण नाईट वॉचमन म्हणून आकाशदीप मैदानात आला. आकाशदीप थोडा वेळ चेंडू तटवणार आणि वेळ काढणार असेच अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात आकाशदीपने चौकार मारत धावा वेगाने वाढवल्या. यशस्वी जयस्वाल सावध खेळी करत असताना आकाशदीप आक्रमकपणे खेळत होता. त्याने वेगाने अर्धशतक साकार केले.
नाईट वॉचमन म्हणजे केवळ काही चेंडू खेळून वेळ घालवणे आणि जमल्यास धावा वाढवणे ही कसोटी क्रिकेटमधील प्रचलित संकल्पना आहे. अनेकदा दिवस संपण्याच्या सुमारास अथवा उपहाराची वेळ जवळ आली असताना महत्त्वाच्या फलंदाजावर दबाव येऊ नये म्हणून एखादा फलंदाज बाद झाल्यावर नाईट वॉचमन म्हणून एखाद्या फलंदाजाला पुढे करतात. हा साधारपणे मुख्य फलंदाज नसतो. याच दृष्टीने इंग्लंडने आकाशदीपकडे बघितले आणि त्याला लवकर बाद करुन भारतावरील दबाव वाढवण्याचे नियोजन सुरू केले. प्रत्यक्षात आकाशदीपच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडच्या खेळाडूंवरील दबाव वाढला. आकाशदीपच्या खेळीमुळे भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली.